नृसिंहवाडीत ‘देव गावात आल्या’चा भावपूर्ण उत्सव !
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी : येथे २७ जुलैला रात्री ११.४५ वाजता दत्त मंदिरातील टेंबे स्वामी मंदिराच्या कट्ट्यावरील पायरीवर कृष्णा-पंचगंगा नदीचे पाणी पोचले. यानंतर ‘श्री गुरुदेव दत्त’च्या जयघोषात देव (‘श्रीं’ची उत्सवमूर्ती) गावात आणण्यात आले. येथील श्री दत्तगुरूंच्या पादुका या पाषाणाच्या स्थिर आणि अचल आहेत. पंचगंगा नदीचे पाणी वाढल्यावर दक्षिणद्वार सोहळा होतो. यानंतर तेथील उत्सवमूर्ती प.प. नारायणस्वामी मंदिरात ठेवली जाते. पाणी आणखी वाढल्यावर तेथील पूजा होऊन उत्सवमूर्ती प.पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज मठात आणण्यात येते. यानंतरही पाणी वाढल्यास श्रींची उत्सवमूर्ती त्या दिवशीच्या हक्कदार पुजार्यांच्या घरात आणली जाते. यालाच ‘देव गावात आला’, असे म्हटले जाते. भक्तांसाठी ही एक मोठी पर्वणी असते.
एवढी रात्र असतांनाही मार्गावर रांगोळ्या घालण्यात आल्या आणि घंटेच्या नादाच्या लयीत आरत्या, पदे म्हणत मानकरी दिगंबर खातेदार यांच्या घरी देव आले. यासाठी गावातील आणि परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भावभक्तीने ओथंबलेला हा नयमरम्य सोहळा भक्तांनी डोळ्यांत साठवून ठेवला होता.