पाऊस ओसरल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत संथगतीने उतार !
अद्यापही १० राज्यमार्ग बंद !
कोल्हापूर, २८ जुलै (वार्ता.) – गेले आठवडाभर चालू असलेल्या पावसाने कालपासून काहीशी उसंत घेतली, यामुळे ४७ फूट ८ इंच इतकी पाणीपातळी गाठल्यानंतर पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत संथगतीने उतार होण्यास प्रारंभ झाला. असे असले, तरी अद्याप अनेक रस्त्यांवर पाणी असल्याने जिल्ह्यातील १० राज्यमार्ग आणि ५३ प्रमुख जिल्हामार्ग बंद आहेत. कोल्हापूर शहरात अनेक उपनगरांमध्ये पाणी असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मांगूर फाट्याजवळ पाणी आल्याने एकेरी वाहतूक चालू होती. रस्त्यावरील पाणी अल्प झाल्याने या मार्गावरील दुहेरी वाहतूक आता चालू करण्यात आली आहे.
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अल्प झाल्याने वारणा धरणातून चालू असलेला १६ सहस्र ९७६ घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग अल्प करून तो १० सहस्र ८८५ घनफूट प्रतिसेकंद करण्यात आला आहे. राधानगरी धरणात ८.२४ टी.एम्.सी. पाणीसाठा असून ६ आणि ७ हे दोन द्वार खुले असून त्याद्वारे ४ सहस्र ३५६ घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग चालू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ६० सहस्र हेक्टर शेती पाण्याखाली !
जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आल्याने या नठीकाठी असलेली पिके पाण्याखाली गेली आहेत. ऊस, भात, सोयाबीन यांसह अन्य अशी ६० सहस्र हेक्टर शेती पाण्याखाली आहे. ऊस आठवड्यापेक्षा अधिक काळ पाण्याखाली राहिल्यास मोठ्या प्रमाणात हानी होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत लोकांना सर्वतोपरी साहाय्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश !
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि पावसाविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली अन् आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने साहाय्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. बचावकार्याची आवश्यकता वाटल्यास तिथे ‘एन्.डी.आर्.एफ्.’च्या (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या) तुकड्या पाठवण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास सेनादलाचे साहाय्य घेण्यात यावे. आलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी दिल्या.
अनेक भागांत वीजपुरवठा बंद !
पुराचे पाणी वाढल्याने अनेक उपनगरांमधील वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. वीज नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. वीजपुरवठा बंद केल्याने शहरातील काही रुग्णालयांमधील रुग्णांनाही स्थलांतरित करण्यात आले आहे.