हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात ४ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा !
सोलापूर – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील सात रस्ता भागातील उपलप मंगल कार्यालय आणि एम्.आय.डी.सी. वसाहत येथील ‘पद्मावती कन्व्हेन्शन हॉल’ या ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यासमवेतच जिल्ह्यातील अकलूज आणि बार्शी येथेही गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडले. या सर्व महोत्सवांचा १ सहस्र ५५० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला. या महोत्सवांत लाभलेल्या मार्गदर्शनातून उपस्थित जिज्ञासूंनी रामराज्याच्या स्थापनेसाठी सिद्ध होण्याची प्रेरणा घेतली.
साधना केल्याने व्यक्तीमध्ये सकारात्मक परिवर्तन घडते ! – प्रसाद पंडित
उपलप मंगल कार्यालय (सोलापूर) येथे बोलतांना ‘अक्कलकोट प्रज्ञापीठ’चे अध्यक्ष श्री. प्रसाद पंडित म्हणाले, ‘‘हिंदूंनी सामाजिक माध्यमांवरील व्हिडिओ पहाण्यात वेळ घालवण्याऐवजी साधना करण्यासाठी वेळ द्यावा. साधना केल्याने व्यक्तीमध्ये सकारात्मक परिवर्तन घडते. प्रतिदिन कुलदेवतेची उपासना केल्याने दैनंदिन जीवनातील अडथळे दूर होण्यास प्रारंभ होतो.’’
हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांनीही या वेळी मार्गदर्शन केले.
प्रत्येक हिंदूने समाजातील लोकांना धर्मशिक्षित होण्यासाठी साहाय्य करावे ! – वेणुगोपाल जिल्ला पंतुलु
पद्मावती कन्व्हेन्शन हॉल (सोलापूर) येथे महोत्सवात ‘अखिल भारत पद्मशाली पुरोहित संघम्’चे अध्यक्ष श्री. वेणुगोपाल जिल्ला पंतुल म्हणाले की, धर्माचरण आणि धर्मरक्षण यांमुळे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास न्यून होतात, असे धर्मशास्त्रात उल्लेख आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूने समाजातील लोकांना धर्मशिक्षित होण्यासाठी साहाय्य करावे.
हिंदु जनजागृती समितीच्या कु. वर्षा जेवळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्र हाच उपाय ! – अधिवक्ता प्रशांत बिचकुले, सदस्य, बार असोसिएशन
अकलूज येथील महोत्सवात माळशिरस (सोलापूर) येथील ‘बार असोसिएशन’चे सदस्य अधिवक्ता प्रशांत बिचकुले म्हणाले की, पूर्वीच्या काळी हिंदु कुटुंबे सुसंस्कारित असल्याने संघटित होती. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे नवीन पिढीत सर्वधर्मसमभाव वाढून हिंदु धर्माला गौण ठरवण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे अन्य धर्मियांच्या आक्रमणाला हिंदु समाज सहज फसत आहे. हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना होणे, ही काळाची आवश्यकता बनली आहे.
बार्शी येथील महोत्सवात समितीच्या सौ. अनिता बुणगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विशेष१. महोत्सवाच्या ठिकाणच्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद लाभला. २. कार्यक्रमानंतर अनेक जिज्ञासूंनी वक्त्यांशी चर्चा करून शंकानिरसन करून घेतले. ३. पद्मावती कन्व्हेन्शन हॉल येथील गुरुपौर्णिमेला सनातन संस्थेच्या पू. (कु.) दीपाली मतकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. |