‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !
कोल्हापूर, २८ जुलै (वार्ता.) – २४ ते ३० जून या कालावधीत फोंडा, गोवा येथे झालेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवासाठी गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांची २६ जुलैला राधाकृष्ण मंदिराच्या सभागृहात एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून वर्षभर राष्ट्र आणि धर्म कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली. कोल्हापूर येथे मोठ्या प्रमाणात पाऊस असूनही या बैठकीसाठी २० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘येणारा आपत्काळ हा पंचमहाभूतांच्या माध्यमातून प्रकोप निर्माण करणारा असून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होणार आहे, असे अनेक संतांनी सांगितले आहे. महापूर, कोरोना महामारीच्या माध्यमातून आपण ते अनुभवलेले आहे. यातून साधनाच आपल्याला तारणार असून आपण स्वत:च्या साधनेसह कुटुंबाच्या साधनेचे दायित्वही घेतले पाहिजे. साधना जलद गतीने होण्यासाठी स्वभावदोष आणि अहंनिर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यास प्रगती लवकर होईल.’’
या प्रसंगी विविध हिंदुत्वनिष्ठांनी महोत्सवात जाऊन आल्यामुळे त्यांना झालेले लाभ, त्यांच्यातील पालट, तसेच यापुढील काळात धर्मकार्य कशा प्रकारे करणार ? हे सांगितले.