महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी.पी. राधाकृष्णन् यांची नियुक्ती
मुंबई – महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तमिळनाडू येथील सी.पी. राधाकृष्णन् यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सी.पी. राधाकृष्णन् हे झारखंडच्या राज्यपालपदावर होते. झारखंडसह त्यांच्याकडे तेलंगाणा राज्याचाही अतिरिक्त कार्यभार होता. यापूर्वी रमेश बैस हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
राष्ट्रपती भवनाने २७ जुलै या दिवशी सायंकाळी यासंबंधीचा आदेश काढला. त्यानुसार १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती होणार आहे. सी.पी. राधाकृष्णन् हे दक्षिण भारतातील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. तमिळनाडू राज्यातील कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते २ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तमिळनाडूमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. सी.पी. राधाकृष्णन् हे तमिळनाडूमधील तिरूपूर जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील आहेत. वर्ष १९७३ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रवेश केला.
भाजपचे वरिष्ठ नेते हरिभाऊ बागडे राजस्थानच्या राज्यपालपदी !
महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे वरिष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्त केली जाणार आहे. सध्या हरिभाऊ बागडे भाजपचे आमदार आहेत.