‘भगवद्गीता’ पाठांतर स्पर्धेत सोनई (अहिल्यानगर) येथील रजनी बेल्हेकर यांचा देशात प्रथम क्रमांक !
सोनई (जिल्हा अहिल्यानगर) – कर्नाटक राज्यातील शृंगेरी शक्तीपिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या भगवद्गीता पाठांतर विषयांवरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत सोनई येथील रजनी बेल्हेकर यांनी देशात पहिला क्रमांक मिळवला. प्रशस्तीपत्रक आणि २१ सहस्र रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. त्यांनी मागील वर्षी गीता परिवार आयोजित स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. बेल्हेकर मुळा एज्युकेशन संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षिका आहेत.
अयोध्या मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या संकल्पनेतून सिद्ध झालेल्या गीता परिवाराचे कार्य जगातील ११० देशांत आणि १३ भाषांत चालू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात परिवाराचे कार्याध्यक्ष संजय मालपाणी काम पहात आहेत. कोरोना काळात ‘झूम ॲप’ अधिक प्रसिद्ध झाल्यानंतर रजनी बेल्हेकर यांनी गीता परिवारात सहभाग घेऊन श्लोक पाठांतर करण्यास चालू केले होते. ३ वर्षांनंतर त्यांनी पूर्ण भगवद्गीता पाठांतर करून ऑनलाईन स्पर्धेत ६०० पैकी ६०० गुण प्राप्त केले होते. यामध्ये त्यांना सुवर्णपदक देण्यात आले होते. गीता परिवाराचा पहिला टप्पा झाल्यानंतर त्यांनी शृंगेरी शक्तीपीठ आयोजित स्पर्धेत भाग घेतला. ७ जुलै २०२४ या दिवशी ऑनलाईन झालेल्या परीक्षेत त्यांनी विचारलेल्या अध्यायातील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. स्पर्धेचा निकाल घोषित होऊन त्यांना नुकतेच जगदगुरु शंकराचार्य विदूशेखर भारती यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि २१ सहस्र रुपयांचा धनादेश देण्यात आला.