श्रुति ते रहमत आणि परत श्रुति – प्रवास एका प्रत्यावर्तनाचा !
१४ जुलै या दिवशी पुण्यात एका आगळ्यावेगळ्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन झाले. ‘ओ. श्रुति’ नावाची केरळमधील कासरगोड येथील हव्यक ब्राह्मण कुटुंबातील एक हिंदु मुलगी काही वर्षांपूर्वी इस्लामी ‘प्रपोगंडा’ला (प्रचाराला) फसून मुसलमान झाली आणि श्रुतीची ‘रहमत’ बनली; परंतु काही काळानंतर ‘आर्ष विद्या समाजम्’ या हिंदु संघटनेचे आचार्य श्री मनोज यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पुन्हा स्वखुशीने स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. ‘श्रुति ते रहमत आणि परत श्रुति’, हा तिचा प्रवास कसा घडला, याविषयी तिने एक छोटे पुस्तक लिहिलेले आहे. ‘ओरू परावर्तनतींटे कथा’ या शीर्षकाचे हे आत्मचरित्रपर पुस्तक श्रुतीने तिची मातृभाषा मल्याळम्मध्ये लिहून वर्ष २०१८ मध्ये केरळ येथे प्रथम प्रकाशित केले होते. केरळमध्ये हे पुस्तक प्रचंड लोकप्रियही झाले होते; पण ते पुस्तक मल्याळम्मध्ये असल्यामुळे केरळच्या बाहेर फारसे कुणाला या पुस्तकाविषयी फारशी माहिती नव्हती. यानंतर ‘स्टोरी ऑफ अ रिव्हर्शन’ या नावाने या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला आणि १४ जुलै या दिवशी भाजप नेत्या आणि राज्यसभा खासदार डॉ. प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी अन् ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते ‘कथा एका प्रत्यावर्तनाची’ या नावाने हे पुस्तक मराठी भाषेतही प्रसिद्ध झाले.
१. सर्वसामान्य हिंदूंची धर्माविषयीची स्थिती
साध्या-सोप्या भाषेत लिहिलेल्या या पुस्तकातून इस्लामी मतप्रसाराविषयीच्या अनेक गोष्टी उघड होतात, ‘अनेक मिथकांना छेद देणारे’, असे हे पुस्तक आहे. ‘जातीभेदाला आणि गरिबीला कंटाळून हिंदू लोक मुसलमान होतात’, असा एक तथाकथित पुरोगाम्यांचा लाडका सिद्धांत आहे; पण ते खरे नाही. इस्लाम ही एक ‘प्रिडेटरी’ (शिकारी) विचारसरणी आहे जी सतत भक्ष्याच्या शोधात असते. गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष, खालची-वरची जात यांतील कुणीही हिंदु कधीही इस्लामी विचारसरणीची शिकार होऊ शकतो; कारण सर्वसामान्य हिंदु व्यक्तीला आपला धर्म, त्यातील तत्त्वे यांची इतकी अल्प माहिती असते की, तो किंवा ती स्वतःचा बचाव करू शकत नाही आणि अब्राहमीक (एका ईश्वराला मानणारे) विचारसरणीविषयीचे स्वतःचे अज्ञान इतके अगाध असते की, आपण त्यांच्या विचारसरणीवर मुद्देसूदपणे प्रत्युत्तर देऊ शकत नाही.
२. श्रुति हिच्यावर इस्लामचा प्रभाव वाढण्यामागील कारण आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी सुनियोजित प्रणाली उपलब्ध नसणे
आपली घरे, शाळा, धार्मिक संस्था यांमधून सुद्धा आपण आपल्या मुलांना हिंदु धर्माविषयी शास्त्रशुद्ध ज्ञान देतच नाही. त्यामुळे तरुणांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. मिशनरी आणि इस्लामवादी यांनी याच वैचारिक गोंधळाचा लाभ घेतला अन् त्यांच्या मते ‘काफिर’ (इस्लामेतर) असलेल्या व्यक्तींना इस्लाम स्वीकारायला प्रवृत्त करतात. श्रुतीचे नेमके तेच झाले. एकीकडे तिच्या कुटुंबात तिला ‘सर्व धर्म सारखे’, ही शिकवण दिली गेली; पण त्यासह स्वतःच्या धर्माविषयी नीटसे काहीच सांगितले गेले नाही. दुसरीकडे ती शिक्षणासाठी घरापासून दूर रहातांना तिच्या समवेतच्या मुसलमान मैत्रिणी आणि त्यांचे कुटुंबीय यांनी ठरवून विचारपूर्वक इस्लामविषयी सतत इतकी सकारात्मक माहिती दिली की, स्वतःच्या हिंदु असण्याविषयी आधीच संभ्रमित असलेली श्रुति तिच्याही नकळत इस्लामच्या प्रभावाखाली आली. विशेष म्हणजे कुणा मुसलमान मुलाच्या प्रेमात पडून श्रुति इस्लामकडे आकर्षित झाली नाही, तर स्वधर्माविषयीचे अज्ञान आणि इस्लामविषयी सतत देण्यात येणारे, वरवर तार्किक वाटणारे ज्ञान या २ गोष्टींचा एकत्रित प्रभाव तिच्यावर पडून ती मुसलमान झाली. हा सर्व प्रवास तिने प्रांजळपणे या पुस्तकात मांडला आहे.
तिसरे म्हणजे इस्लामचा योजनाबद्ध रितीने प्रसार-प्रचार करण्यासाठी विविध भारतीय भाषांमधून मोठ्या प्रमाणात लिखित, ऑडिओ-व्हिज्युअल क्लिप्स (दृकश्राव्य चित्रफिती), पुस्तके वगैरे साहित्य सहज उपलब्ध आहेत की, जे इस्लामची केवळ चांगलीच बाजू मांडतात. एकदा एखाद्या हिंदु व्यक्तीने इस्लाम स्वीकारला की, मगच इस्लामचे कठोर वास्तव त्यांच्या समोर येते; पण तोपर्यंत पुष्कळ उशीर झालेला असतो. अनेकदा असे अनेक हिंदू जे चुकीच्या समजुतीमुळे किंवा समजुतीच्या अभावामुळे इस्लाम धर्म स्वीकारतात, ते पुन्हा त्यांच्या हिंदु धर्मात परत येऊ इच्छितात; परंतु त्यांना योग्य वेळेला योग्य ते साहाय्य करणारी सुनियोजित प्रणाली (सपोर्ट सिस्टीम) हिंदूंमध्ये अजून म्हणावी तशी मोठ्या प्रमाणावर सर्वत्र उपलब्ध नाही. श्रुतीच्या सुदैवाने तिला योग्य वेळी ‘आर्ष विद्या समाजम्’ ही संस्था सापडली आणि तिचे प्रत्यावर्तन यशस्वी झाले.
३. श्रुति कशा प्रकारे इस्लामकडे वळली ?
पुस्तक प्रकाशनाच्या वेळी केलेल्या भाषणात श्रुति म्हणाली, ‘‘हिंदु म्हणून जन्मले असूनही मला माझ्या धर्माविषयी विश्वास, विधी किंवा दैवी संकल्पना यांविषयी कोणतीही निष्ठा नव्हती. मला मिळालेले इतिहासाचे ज्ञान शाळेत शिकलेल्या गोष्टींपुरतेच मर्यादित होते. माझ्या मुसलमान मित्रांनी मला त्यांचा इतिहास शिकवला. त्यांनी मला इस्लामी तत्त्वज्ञान तर शिकवलेच; पण माझ्या धर्मावर टीका करतांना त्यांना मी जेव्हा ऐकले, तेव्हा त्यांना माझ्या धर्माविषयी माझ्यापेक्षा किती अधिक माहिती होती, हे पाहून मी थक्क झाले.’’
सततच्या ‘ब्रेन वॉशिंग’मुळे श्रुति ही मंदिरे, मूर्तीपूजा आणि हिंदु रितीरिवाज यांच्यापासून हळूहळू दूर जाऊ लागली, ज्यामध्ये तिच्या मुसलमान मित्र-मैत्रिणींनी दिलेले मूर्तीपूजेविरुद्धचे प्रचार साहित्य महत्त्वाचे ठरले. त्यासह इस्लाम हा सर्व विषयांमध्ये कसा श्रेष्ठ आहे, हेही तिच्या मनावर बिंबवले जात होतेच. या द्विधा मनःस्थितीत असतांना श्रुति तिच्या घरी कासरगोडला गेली की, तिचे आपल्या आई-वडिलांशी खटके उडत (वाद होत). त्यांना पूजा करतांना बघितले की, श्रुतीला त्यांची चीड येई. एकांतात ती नमाज पढत असे. मानसिकदृष्ट्या तिचे मतांतर पूर्ण झाले होते, तरी तिला ‘ब्रेनवॉश’ करणारे लोक खूश नव्हते. त्यांनी श्रुतीला औपचारिकरित्या मुसलमान व्हायचा सल्ला दिला.
४. श्रुति यांना इस्लाम स्वीकारतांना आलेला अनुभव आणि त्या वेळची अन्य सूत्रे
ऑक्टोबर २०१३ मध्ये श्रुति तिचे घर सोडून मल्लपुरम् येथे गेली आणि ‘मौनथुल इस्लाम सभा’ येथे तिने औपचारिकपणे इस्लाम स्वीकारला. तो विधीही अगदीच सोपा आणि सुटसुटीत होता, असे ती म्हणते. ती म्हणाली, ‘‘एका बाईने माझ्या डोक्यावर ३ वेळा पाणी ओतले आणि मला काही अरबी वाक्ये तिच्या पाठोपाठ म्हणायला लावली अन् मी मुसलमान झाले. मी रहमत हे नाव स्वीकारले. मी माझ्या पालकांनी दिलेले श्रुति हे नाव, ज्याचा अर्थ ‘वेद’ आहे, ते मी नाकारले.’’ पुढे ती म्हणते, ‘‘त्या संस्थेत धर्मांतरासाठी आलेल्या ६५ महिला होत्या. त्यात वृद्ध, पूर्ण गर्भवती महिला, १६-१७ वर्षांच्या मुली आणि २ मुली असलेल्या महिला अशा सर्व महिलांचा समावेश होता अन् सर्व हिंदु होत्या. त्यांच्यापैकी फार कमी स्त्रिया श्रुतिसारख्या इस्लाम पटला म्हणून आल्या होत्या. बाकीच्यांना काही आर्थिक प्रलोभने तरी दिली गेली होती किंवा त्यांच्या मुसलमान पतींनी अथवा प्रियकरांनी त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाडले होते.
५. श्रुति यांना स्वधर्मात आणण्याविषयी करण्यात आलेले यशस्वी प्रयत्न
तिच्या आईवडिलांना जेव्हा हे समजले, तेव्हा त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. श्रुतीला न्यायालयाच्या आदेशानुसार कासारगोडमध्ये परत आणले गेले, तेव्हा तिला ‘मौनथुल इस्लाम’वाल्या लोकांनी तिच्या नव्या विचारांवर ठाम रहायचा सल्ला दिला. ‘आई-वडील आजारी पडले वा त्यांनी जीव द्यायची धमकी दिली, तरी त्यांचे ऐकू नको’, असे तिला सांगितले गेले. श्रुतीच्या सुदैवाने काही हिंदु संघटनांच्या साहाय्याने तिला ‘आर्ष विद्या समाजम्’ या संस्थेत पाठवले गेले, जिथे आचार्य मनोज या तेथील गुरूंनी तिच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देऊन तिच्याशी तार्किकपणे वाद घालून तिला हिंदु धर्माची थोरवी पटवून दिली. ‘इस्लामचा स्त्रियांसंबंधीचा दृष्टीकोन काय आहे ?’, हेही तिला पुरावे देऊन पटवले गेले. हे सर्व वाद आणि पुरावे तिने या पुस्तकात दिलेले आहेत.
रहमत बनलेली श्रुति पुन्हा एकदा ‘श्रुति’ बनून स्वगृही तर परतलीच, त्यासह ती ‘ए.व्ही.एस्.’ची (‘आर्ष विद्या समाजम्’ची) पहिली पूर्णवेळ महिला कार्यकर्ती बनली. आज तिच्यासारख्याच ‘ब्रेनवॉशिंग’ला (बुद्धीभेदाला) फसून इस्लाम आणि ख्रिस्ती बनलेल्या सहस्रो हिंदु मुलींना त्यांच्या मूळ धर्मात परत आणण्याच्या कामाला तिने स्वतःला वाहून घेतलेले आहे.
श्रुतीचे हे पुस्तक, म्हणजे केवळ घटनांचे वर्णन नाही, तर हिंदु धर्मातील अध्यात्म आणि इस्लामी कट्टरतावाद यांविषयीच्या मुद्यांचा सखोल अभ्यास आहे. एका बैठकीत सहज वाचून होणारे हे पुस्तक वाचकांना अनेक धक्के देते. ‘स्वधर्माविषयी जागरूक सर्व हिंदूंनी नुसते वाचावेच’, असे नाही, तर ५ प्रती विकत घेऊन इतरांना भेट म्हणून द्यावे इतके मोलाचे हे पुस्तक आहे.
– शेफाली वैद्य, पुणे (१६.७.२०२४)
पुस्तकाचे मुखपृष्ठपुस्तक विकत घेण्यासाठीची लिंक : https://arshaworld.org/avs/product/katha-eka-pratyavarthanachi/ संपर्क क्र : ७३५६६ १३४८८ |