साधिका घरी असतांना गुरुदेवांच्या कृपेने तिच्याकडून झालेले साधनेचे प्रयत्न आणि तिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आलेल्या अनुभूती
कु. आरती सुतार यांना घरी असतांना आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. साधिका घरी असतांना गुरुदेवांच्या कृपेने तिच्याकडून साधनेचे प्रयत्न होणे
‘मी घरी असतांना कर्तव्य म्हणून घरातील सर्वकाही करत होते. देवच माझ्याकडून करून घेत होता. माझी प्रत्येक कृती गुरूंना अपेक्षित अशीच होत होती. मी वर्ष २०१९ पासून नामजप लिहित आहे. ‘या जिवाचे गुरूंशी असलेले नाते कायम रहावे’, यासाठी देवाने मला प्रतिदिन नामजप लिहायला सुचवले. माझ्याकडून भावपूर्ण नामजप लिहिण्याचा प्रयत्न झाला. मी प्रतिदिन नामजप लिहित असतांना ‘स्वभावदोष निर्मूलनासाठीची सारणी लिहित आहे’, असे मला वाटत असे. गुरुदेव मला आनंदी ठेवत होते. मी पुष्कळ वेळा चुकत होते; पण गुरु जे उपाय सुचवत होते, ते मी करत होते. ‘गुरूंनीच माझ्याकडून साधना करून घेतली’, असे मला वाटते.
२. साधिकेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाणे
२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याच्या नियोजनाच्या एक दिवस आधी आश्रमात जाणे : आमचे दुकान बंद असल्याने मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जायचे ठरवले होते. परात्पर गुरु डॉ. आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्याच कृपेने मी २७ ऐवजी २६.१२.२०२० च्या रात्री आश्रमात पोचले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने माझी आश्रमात जाण्याची पूर्वसिद्धता आधीच झाली असल्याने मला लगेच आश्रमात जाता आले.
२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पत्र लिहिणे आणि एका साधकाच्या माध्यमातून त्यांचा निरोप आल्यावर ‘श्रीकृष्णानेच निरोप दिला’, असे साधिकेला जाणवणे : मला साधनेतील एका गोष्टीचा निर्णय घ्यायचा होता. मला माझ्या मनाप्रमाणे करायचे नव्हते. माझ्या मनाला जे वाटते, ते परात्पर गुरुदेवांना सांगून त्यांना जसे अपेक्षित आहे, तसेच मला करायचे होते; म्हणून मी त्यांना पत्र लिहिले.
माझे पत्र लिहून झाल्यावर मी त्यांना मनातच म्हटले, ‘मला ५ दिवसांत निरोप द्याल का ?’ मी पत्र लिहिल्यानंतर चौथ्या दिवशी मला आवाज ऐकू आला, ‘तुझे पत्र मला मिळाले बरं !’ तेव्हा मला खरेच वाटले नाही; परंतु त्याच दिवशी संध्याकाळी मला एका साधकाने पत्राविषयीचा निरोप दिला. मी परात्पर गुरु डॉक्टरांना मनातून सांगितल्याप्रमाणे मला ५ दिवसांच्या आत निरोपही आला. माझे डोळे भरून आले आणि माझ्याकडून मनापासून कृतज्ञता व्यक्त झाली. मला ‘श्रीकृष्णानेच निरोप दिला’, असे जाणवले.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी नामजप लिहिलेली वही पाहिल्यावर ‘‘पुष्कळ भाव जाणवतो’’, असे सांगणे
काही दिवसांनी मी लिहीत असलेल्या नामजपाची वही श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडे दिली. त्यांनी वही उघडून पाहिली आणि त्या म्हणाल्या, ‘‘पुष्कळ भाव जाणवतो. छान आहे.’’ त्यांनी माझ्यासाठी खाऊ पाठवला. तेव्हा ‘निरपेक्ष राहिल्याने आणि योग्य विचार केल्याने देव इच्छा पूर्ण करतो’, हे मला शिकायला मिळाले. – कु. आरती नारायण सुतार, म्हापसा, गोवा.
३. रामनाथी आश्रमात असतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
३ अ. मी रामनाथी आश्रमात आल्यापासून ‘मी पृथ्वीवर आहे’, असे मला वाटलेच नाही. ‘मी कृष्णलोकात आहे’, असे मला वाटत होते. मला पुष्कळ वेगळे जाणवत होते.
३ आ. सेवा करतांना आलेल्या अनुभूती
३ आ १. थंडावा जाणवणे : आश्रमात सेवा करतांना मला माझ्या डोक्यावर थंडावा जाणवून चांगले वाटायचे. माझ्याकडून सेवाही चांगल्या प्रकारे होत होती.
३ आ २. ‘संगणक बोलत आहे’, असे जाणवणे : एकदा सेवा चालू करण्यापूर्वी मी मनात ‘आता काय करायचे ?’, असे म्हणाले. तेव्हा अकस्मात् संगणक माझ्याशी बोलू लागला, ‘आधी मला पूस. नंतर सेवा चालू कर.’’ संगणक माझ्याशी बोलू लागलेला पाहून मला फारच कौतुक वाटले.
३ इ. सुगंधाची अनुभूती येणे : एकदा मी सेवा झाल्यावर खोलीत जात असतांना दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात गेल्यावर मला उदबत्तीचा सुगंध आला. मी तेथून बाहेर आल्यावर मला सुगंध आला नाही. मी अन्य एका साधिकेला त्याविषयी विचारले असता तिला तो सुगंध येत नव्हता.
३ ई. ध्यानमंदिरात बसून नामजप लिहितांना प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे :
१. मी ध्यानमंदिरात बसून नामजप लिहीत होते. तेव्हा नामजप लिहितांना मला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आले आहेत. ते मला पहात आहेत’, असे जाणवत असे.
२. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पहातांना ‘प.पू. बाबा प्रत्यक्षात तेथे आहेत. मी ज्या ठिकाणी बसत असे, त्या ठिकाणी त्यांचे डोळे फिरत असून त्यांचे माझ्यावर लक्ष आहे’, असे मला जाणवत असे.
३ उ. प्रतिदिन नामजप लिहीत असलेल्या वहीविषयी आलेल्या अनुभूती
३ उ १. नामजप आपोआप लिहिला जात असल्याचे जाणवणे : त्याच दिवशी मला नामजप लिहितांना पुष्कळ चैतन्य जाणवून ‘माझ्याकडून नामजप आपोआपच लिहिला जात आहे’, असे मला जाणवत होते. मला नामजप लिहितांना चांगले वाटत होते.
३ उ २. एका साधिकेला नामजपाची वही हातात घेतल्यावर सुगंध येणे : मी सौ.वैशाली राजहंस (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६७ वर्षे) यांना माझी नामजप लिहिलेली वही दिली. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘आधी छान सुगंध आला. बोटांमधील शिरांमध्ये (नसांमध्ये) काहीतरी जात आहे’, असे मला जाणवले. छान वाटले.’’
हे सर्व केवळ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी हातात माझी वही घेतल्यामुळे जाणवले. ‘त्यांच्यामधील चैतन्य माझ्या वहीत आल्यामुळे अशी अनुभूती आली’, असे मला वाटले.
३ ऊ. आश्रमात आल्यापासून साधिकेला मायेविषयी ओढ न वाटणे आणि सर्वत्र केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले दिसणे : मी आश्रमात आल्यापासून मला वेगळे जाणवत होते. मला मायेची ओढ वाटत नव्हती. मला घरी जावेसे वाटत नव्हते. मला सर्वत्र केवळ परात्पर गुरुदेव दिसत होते. ‘त्यांनी माझे दायित्व घेतले आहे’, हे पाहून मला मायेविषयी विशेष काही वाटेनासे झाले.’
– गुरुदेवांची लेक, कु. आरती नारायण सुतार, म्हापसा, गोवा.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |