परात्पर गुरु डॉक्टरांचा लाभलेला दिव्य सत्संग, त्यांनी करून घेतलेले विविध प्रयोग आणि त्यातून त्यांच्या अवतारत्वाची आलेली प्रचीती !
‘वर्ष १९९४ पासून मला परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला. या ३० वर्षांत विष्णुस्वरूप गुरुदेवांनी कधीही स्वतःतील देवत्व साधकांसमोर स्वीकारले नाही, तरी सहस्रो जिवांना त्यांच्या संदर्भात अनुभूती आल्या आहेत आणि त्यांचे अवतारत्व सिद्ध झाले आहे. त्यांचे अवतारत्व वर्णन करणे हे शब्दांच्या पलीकडले आहे. या लेखातील काही भाग २७ जुलै या दिवशी पाहिला. आज अंतिम भाग पाहूया. (भाग ३)
या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/818458.html
७. अन्य संत करत असलेल्या चमत्कारांप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेला संशोधनात्मक प्रयोग !
७ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी वाटीतील नळाच्या पाण्यात हाताची बोटे बुडवल्यावर ते पाणी साखर घातल्याप्रमाणे गोड होणे आणि त्यांनी ‘गोडबाबा करतात, तसे जमते का ?, हे पहायचे होते’, असे सांगणे : वर्ष २००४ मध्ये एक दिवस परात्पर गुरु डॉक्टरांनी मला सूक्ष्मातील एक प्रयोग करण्यासाठी बोलावले. त्यांनी मला एका वाटीत नळाचे पाणी आणायला सांगितले आणि स्वतःच्या उजव्या हाताची पाचही बोटे त्यांनी वाटीतील पाण्यात बुडवली. त्यांनी २ मिनिटांनी बोटे पाण्यातून बाहेर काढली आणि वाटी माझ्याकडे दिली. त्यांनी मला वाटीतील पाण्याची चव बघायला सांगितली. ते पाणी साखर घातल्याप्रमाणे गोड झाले होते. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला.
माझ्या मनात ‘आश्रमातील सर्व साधकांना याविषयी सांगून एकेक थेंब पाणी पिण्यास देऊया’, असा विचार तीव्रतेने आला. त्या क्षणी गुरुदेवांनी मला ते पाणी हस्तप्रक्षालन पात्रात (‘सिंक’मध्ये) ओतायला सांगितले. ते मला म्हणाले, ‘‘गोडबाबा करतात, तसे जमते का ?’, एवढेच पहायचे होते. आपल्यालाही ते जमले; पण आपल्याला यामध्ये अडकायचे नाही. पुढची पुढची साधना करायची आहे.’’ (परात्पर गुरु डॉक्टरांची ‘गोडबाबा’ नावाच्या एका संतांशी भेट झाली होती. गोडबाबा ज्या वस्तूला हात लावत, ती वस्तू गोड होत असे; म्हणून त्यांना ‘गोडबाबा’, असे म्हणत असत.)
८. ए ४ आकाराच्या कागदावर छापलेले साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे लिखाण काही सेकंदात वाचून त्यातील अतिशय बारीक अक्षरांतील चुकाही क्षणार्धात शोधणारे परात्पर गुरु डॉक्टर ! : मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा करत असतांना अंक अंतिम झाला की, त्याची ए ४ (वृत्तपत्राचे पाव पान) आकाराच्या कागदावर छपाई करून ती प्रत गुरुदेवांकडे पडताळण्यासाठी घेऊन जात असे. या प्रतीवरील अक्षर एवढे बारीक असते की, ते वाचायला वेळ लागतो. विशेषतः चष्मा नसेल, तर अधिकच वेळ लागतो. गुरुदेवांच्या पटलावर ही प्रत ठेवली की, ते काही सेकंदांत आसंदी पुढे ओढता ओढताच लिखाणातील चुकांवर खुणा करून देत असत. ते पुढच्या पानांवरही दृष्टी फिरवत चुकांवर खुणा करत वाचत. विशेष म्हणजे ‘ते एवढ्या लवकर सर्व वाचून पडताळू शकत नाहीत’, हे मला बुद्धीने कळायचे, तसेच ते वाचत असतांना मला त्या लिखाणात माझी चूक दिसली असेल, तर ती चूक ते दाखवून देत नसत. तेव्हा मला पुष्कळ नवल वाटत असे. एक दिवस मी त्यांना विचारले, ‘‘आपल्याला न वाचताही या चुका कशा लक्षात येतात ?’’ त्यावर त्यांनी स्मितहास्य करून सांगितले, ‘‘साधना करतांना आपण १०० टक्के बुद्धी गुरुकार्यात अर्पण केली की, शास्त्र असे असते की, ५० टक्के बुद्धीचा भाग असतो आणि ५० टक्के सूक्ष्मातील. आपण आपली १०० टक्के बुद्धी उत्तमात उत्तम सेवा होण्यासाठी वापरली की, देवच पुढचे ५० टक्के कार्य करतो.’’ त्यांनी मला त्या वेळी विस्तृतपणे खालील सूत्रे सांगितली.
अ. ‘लिखाण वाचतांना मी माझी पेन्सिल या प्रतीवरून फिरवतो. जिथे चूक असते, तिथे पेन्सिल आपोआप थांबते.
आ. ज्या चुका तुमच्या लक्षात आल्या, त्या परत दाखवण्यात देव त्याची ऊर्जा वाया घालवत नाही.
इ. मी क्रियमाण १०० टक्के वापरतो; म्हणून देवच शेष सर्व करतो, उदा. मी खोलीतून आश्रमाचे बांधकाम बघायला निघालो की, ‘कुठल्या दिशेने जायचे ?’, हे ठरवत नाही. देवच मला विशिष्ट दिशेने नेतो आणि प्रत्यक्षात तिथे काहीतरी चूक घडलेली असते. देव ती मला दाखवून देतो; कारण मी सर्व अचूक आणि सात्त्विक करण्यासाठी १०० टक्के बुद्धी वापरतो अन् प्रयत्न करतो.
ई. मला आता ‘आधी कळस मग पाया’ ही अनुभूती येते. माझ्याकडून कृती आधी घडते आणि नंतर मला त्याचा कार्यकारणभाव कळतो.’
कृतज्ञता
‘हे कृपासिंधू गुरुराया, आमच्या सर्वांच्या अनेक जन्मांचे पुण्य फळाला आले आणि आपल्या अवतारत्वाची लहानशी चुणूक आम्ही अनुभवली. आपला महिमा वर्णन करायची माझी पात्रता आणि क्षमता नाही, तरीही विविध आध्यात्मिक प्रयोगांमध्ये मी आपले अवतारत्व ‘याची देही, याची डोळा’ अनुभवले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची माझी क्षमता नाही.’ (समाप्त)
– सौ. मंगला मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|