स्वतःच्या लेखनशैलीने वृत्तपत्रक्षेत्रात स्थान निर्माण करणारे आणि सेवेची तळमळ असलेले मुंबई येथील कै. जयेश राणे (वय ४१ वर्षे) !
‘१८.७.२०२४ या दिवशी जयेश राणे यांचे प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ४१ वर्षे होते. ते अनेक वर्षे दैनिक ‘सनातन प्रभात’, तसेच अन्य वर्तमानपत्रे यांत पत्रे आणि लेख लिहिण्याची सेवा करत होते. २९.७.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त साधकाला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. स्वतःच्या लेखनशैलीने वृत्तपत्रक्षेत्रात स्थान निर्माण करणारे जयेश राणे !
१ अ. ज्वलंत विषयावर अभ्यासपूर्ण लेख लिहिणे आणि लेख वाचून वाचक अंतर्मुख होत असणे : जयेशदादा सातत्याने दैनिक ‘सनातन प्रभात’, तसेच अन्य वृत्तपत्रे यांत अभ्यासपूर्ण पत्रे आणि लेख लिहिण्याची सेवा करत होते. त्यांनी वृत्तपत्र क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले होते. त्यांनी वर्तमान परिस्थितीवर लिहिलेले लेख मोठी वृत्तपत्रे लगेच प्रसिद्ध करत असत, उदा. गणेशोत्सवातील अपप्रकार, सामाजिक समस्या. ते ज्वलंत विषयावरही अभ्यासपूर्ण लेखन करत. त्यांच्या लेखात राष्ट्रहिताचे दृष्टीकोन असत. त्यांचे लेख वाचून वाचकही अंतर्मुख होत.
१ आ. मराठी, तसेच हिंदी आणि इंग्रजी या भाषांतही लेख अन् पत्रे लिहिणे आणि त्यांचे लेख अनेक राज्यांतील मोठ्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत असणे : जयेशदादांमध्ये पत्रे आणि लेख लिहिण्याची उत्कृष्ट हातोटी होती. ते प्रत्येक सप्ताहात विविध वृत्तपत्रांना लेख पाठवत असत. एका सप्ताहात त्यांचे अन्य वृत्तपत्रांत १०० किंवा त्याहून अधिक लेख प्रसिद्ध होत असत. अन्य साधकांच्या लेखांना इतक्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत नव्हती. दादा पत्रे किंवा लेख केवळ मराठी भाषेतच लिहीत नसून ते हिंदी आणि इंग्रजी या भाषांतही लेख लिहीत असत. त्यांचे लेख आणि पत्रे देहली, पंजाब, उत्तर भारत, आसाम या राज्यांसह अनेक राज्यांतील मोठ्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत असत.
१ इ. राष्ट्रीय वृत्तपत्रांच्या कार्यालयातून भ्रमणभाषवर पत्रलेखनाविषयी प्रतिसाद कळवला जात असणे : खरेतर जवळच्या जिल्ह्यातील एका वृत्तपत्रात लेख प्रसिद्ध होणे, तसे कठीण असते. त्या तुलनेत राज्यस्तरीय, तसेच मोठ्या आणि राष्ट्रीय स्तरांवरील वृत्तपत्रांत पत्रे आणि लेख प्रसिद्ध होणे अतिशय कठीण असते. जयेशदादांची ‘प्रसिद्ध लेखक’ किंवा ‘नामवंत व्यक्ती’ अशी ओळख नसतांनाही त्यांच्या लेखांना प्रसिद्धी मिळत होती. यातून त्यांच्या लेखनशैलीचे महत्त्व लक्षात येते. त्यांना राष्ट्रीय वृत्तपत्रांच्या कार्यालयातून भ्रमणभाषवर त्यांच्या पत्रलेखनाविषयी प्रतिसादही कळवला जात असे.
२. सेवेची तळमळ
२ अ. रुग्णाईत असूनही शेवटच्या क्षणापर्यंत पत्रे आणि लेख लिहिण्याची सेवा करणे : काही वर्षांपूर्वी जयेश यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्यामुळे ते बाहेर जाऊ शकत नव्हते. त्यांना अधून-मधून ‘डायलिसिस’ (टीप) करण्यासाठी जावे लागत होते. त्यांना जेवणात अनेक पथ्ये होती. त्यांनी अनेक वर्षे सर्व पथ्ये पाळून घरी राहून शेवटच्या क्षणापर्यंत पत्रे आणि लेख लिहिण्याची सेवा केली. ते अन्य सेवाही पुढाकार घेऊन करत असत.
(टीप – डायलिसिस : मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया)
२ आ. अभ्यासवर्गांत अभ्यासपूर्ण विषय मांडून साधकांना लेख लिहिण्यासाठी प्रोत्साहित करणे : त्यांचा ‘अभ्यास आणि अनुभव’ यांचा अन्य साधकांना लाभ व्हावा’, यासाठी अभ्यासवर्गांचे आयोजन वेळोवेळी करण्यात आले. त्यातही ते अभ्यासपूर्ण विषय मांडून साधकांना लेख लिहिण्यासाठी प्रोत्साहित करत असत. ते एका शिबिरातही सहभागी झाले होते. त्यांनी शिबिरात ‘पत्रलेखन कसे करावे ?’, या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. ते साधकांना सांगत, ‘‘आपण ज्वलंत विषयावर तत्परतेने समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या दृष्टीने जागृती करणारे पत्र लिहिले की, त्याला वृत्तपत्राकडून प्रतिसाद मिळतो. अशी पत्रे लगेच छापली जातात. आपण केवळ धार्मिक किंवा राष्ट्रीय विषय यांवरच पत्रे न लिहिता सामाजिक विषयांवरही पत्रे लिहायला हवीत.’’
३. गुरुदेवांनी जयेशदादांचे केलेले कौतुक
जयेशदादांनी लिहिलेली पत्रे आणि लेख नामांकित वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होत असत. पूर्वी गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) अन्य वृत्तपत्रे वाचत असतांना त्यातील जयेशदादांचे लेख वाचून ‘हे आपले साधक आहेत’, अशी त्यावर खूण करून ते लिखाण संदर्भासाठी पुढे देत असत.’
– श्री. अरविंद पानसरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२१.७.२०२४)