Maulana Taukeer Raza : (म्हणे) ‘५ मिनिटांच्या अजानमुळे त्रास होतो म्हणणार्यांना महिनाभर कावड यात्रेचा मार्ग बंद असल्याने त्रास का होत नाही ?’ – मौलाना तौकीर रझा
मौलाना तौकीर रझा यांचे हिंदुद्वेषी विधान !
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)
बरेली (उत्तरप्रदेश) – ५ मिनिटांच्या अजानमुळे लोकांची झोप उडते. जर १० मिनिटांच्या नमाजासाठी मशिदीत जागा नसेल आणि कुणी बाहेर नमाजपठण करत असेल, तर तुम्हाला अडचण आहे; पण कावड यात्रेचे रस्ते महिनाभर बंद असतात, याने तुम्हाला त्रास होत नाही ? हा न्याय आहे कि अन्याय ?, असे विधान येथील इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदेचे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांनी केले.
मौलाना रझा पुढे असेही म्हणाले की, कावड यात्रेकरूंच्या सोयीसाठी जे काही केले जाईल ते केले पाहिजे. आम्हाला त्यात काही अडचण नाही; पण आमच्यावर लादलेल्या बंधनांची अडचण आहे. त्यावर आमचा आक्षेप आहे. मोहरमची मिरवणूक नेहमी ठरलेल्या ठिकाणाहून जाते. नवीन मार्गाने कधीही जात नाही. आम्ही नवीन परंपरा निर्माण करत नाही; पण तुम्ही लोक करा. तुमचा धर्म तुम्हाला अनुमती देतो ते तुम्ही करा; पण आमच्यावर बंधने लादणे हा अन्याय आहे.
मुसलमानांनी दुकानांवर स्वतःच्या नावाच्या पाट्या लावून व्यवसाय करावा !
मौलाना तौकीर रझा पुढे म्हणाले की, मुसलमानांनी त्यांची दुकाने आणि घरे यांच्यावर स्वतःच्या नावाच्या पाट्या लावाव्यात. जे असे करत नाहीत, त्यांचा हेतू फसवणूक करण्याचा आहे किंवा त्यांना भीती वाटते. स्वतःची ओळख लपवून व्यवसाय करणे योग्य नाही. जर तुम्ही स्वच्छता राखली आणि चांगला व्यवसाय केला, तर लोक तुमच्याकडूनच खरेदी करतील. जे लोक स्वतःची ओळख लपवतात ते कमकुवत असतात.
सरकारवर टीका करतांना रझा म्हणाले की, सरकारने मुसलमानांना त्रास देण्याच्या उद्देशाने हा आदेश दिला होता, ज्याला न्यायालयाने स्थगिती दिली होती. आता मुसलमानांनी स्वतःची ओळख का लपवायची ? याचा विचार करायला हवा. किंबहुना ते स्वतःची खरी ओळख हरवत आहेत. त्यांनी इतके स्वातंत्र्य मिळवले आहे की, ते दाढी किंवा टोपी घालत नाहीत आणि त्यांची जीवनशैली पालटली आहे. न्यायालयाने स्वेच्छेने नाव लिहिण्यास अनुमती दिली आहे, प्रत्येक दुकानदाराने स्वतःच्या नावाची पाटी लावावी, असे मला वाटते. मुसलमान म्हणून तुमची ओळख उघड करा. मुसलमान असल्याचा अभिमान वाटला पाहिजे.
संपादकीय भूमिका
|