यापुढे शासकीय कार्यालयांत निरोपांची देवाण-घेवाण होणार ‘संदेश’ ॲपद्वारे !

मुंबई, २७ जुलै (वार्ता.) – यापुढे शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजाविषयी धारिका, निरोप यांची देवाण-घेवाण करण्यासाठी ‘संदेश इन्स्टंट मेसेजिंग’ या ॲपचा उपयोग केला जाणार आहे. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने सिद्ध केलेल्या या ॲपचा उपयोग सर्व शासकीय कार्यालयांमध्ये करावा, असा अधिकृत आदेश राज्यशासनाकडून काढण्यात आला आहे.
सद्य:स्थितीत राज्यातील २०० हून अधिक शासकीय संस्था, तसेच ३५० हून अधिक ‘ई-गव्हर्नन्स ॲप्लिकेशन्स’मध्ये संदेश पाठवण्यासाठी ‘संदेश’ ॲपचा उपयोग केला जात आहे. याची फलनिष्पत्ती लक्षात घेऊन राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये या ॲपचा उपयोग करण्याचे शासनाने ठरवले आहे.