‘सत्पात्रे दान’ केल्यावर आलेल्या अनुभूती आणि साधनेमुळे स्वतःत झालेले पालट यांविषयी कृतज्ञ असलेले वडूज, सातारा येथील श्री. विनोद भंडारे !
१. सनातनच्या नामदिंडीत सहभागी झाल्यावर पुष्कळ उत्साह आणि आनंद जाणवून मन सकारात्मक होणे
‘वर्ष २००२ मध्ये रामनवमीच्या दिवशी मी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करू लागलो. तेव्हा आमच्या गावात रामनामाची दिंडी काढली होती. मला नामदिंडीसाठी बोलावल्यावर आधी वाटले, ‘आता सनातनने हे काय काढले आहे ? यांच्या कार्यक्रमाला कोण येणार ?’ मी दिंडीच्या ठिकाणी गेलो, तर तेथे अजून कुणीच आले नव्हते. थोड्या वेळाने पुन्हा जाऊन पाहिले, तर तेथे पुष्कळ धर्मप्रेमी आणि संतही आले होते. दिंडीत सहभागी झाल्यावर मला पुष्कळ उत्साह आणि आनंद जाणवून डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले. दिंडीत रामनाम घेत असतांना माझ्या संपूर्ण शरिरातून मुंग्या येत होत्या आणि अंगावर रोमांच येत होते. तो सोहळा पाहून माझे मन सकारात्मक झाले.
२. साधनेचा कालावधी वाढून धनाचा त्याग होऊ लागल्यावर व्यवसायात झालेली भरभराट !
२ अ. साधना आणि धनाचा त्याग यांमुळे व्यवसायाची स्थिती पालटणे : वर्ष २००२ मध्ये मी छपाईच्या व्यवसायात आलो. तेव्हा आमची आर्थिक स्थिती बेताची होती आणि आम्हाला पुष्कळ कर्जही होते. त्यामुळे व्यापार्यांचे सतत दूरभाष यायचे. प्रत्येक मासात व्यापार्यांना रक्कम देणे शक्य होत नव्हते. नंतर साधनेचा कालावधी जसजसा वाढत गेला आणि धनाचा त्याग होऊ लागला, तसतशी व्यवसायाची स्थिती पालटू लागली. ज्या दिवशी व्यापारी येणार असतील, त्या दिवशी त्यांना कर्जफेडीपोटी द्यावयाचे पैसे आपोआप जमू लागले. हळूहळू कर्जाचा बोजा न्यून होऊ लागला. त्या वेळी ‘गुरूंच्या चरणी धन अर्पण केल्यावर कोणते लाभ होतात ?’, हे माझ्या लक्षात आले. नंतर गुरूंच्या कृपेने छपाईची मिळेल ती सेवा करण्याची इच्छा होऊ लागली.
२ आ. एका प्रसंगानंतर ‘आता आपला छपाईचा व्यवसाय संपला’, असे वाटून ताण येणे आणि ‘गुरुपौर्णिमेला धन अर्पण करावे’, असे मनात येऊन उसने पैसे घेऊन ते अर्पण करणे : वर्ष २०१५ मध्ये सर्व ग्रामपंचायतींना संगणक पुरवण्यात आले. तेव्हा मला वाटले की, आता आपला छपाईचा व्यवसाय संपला. ही गोष्ट मी सनातनचे साधक श्री. रमेश गोडसे यांना सांगितली. ते म्हणाले, ‘‘भंडारे, तुम्ही काहीही काळजी करू नका. आपले गुरु समर्थ आहेत. तुम्ही केवळ काय होते ते बघा !’’ गुरुपौर्णिमेला एक ते दीड मासाचा अवधी होता. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘आपली व्यष्टी साधना होत नाही, तर आपण निदान धनाच्या माध्यमातून तरी सेवेत सहभागी होऊया. आपण या गुरुपौर्णिमेला १० सहस्र रुपये अर्पण करूया.’ प्रत्यक्षात मला तेवढी रक्कम जमवता आली नाही; म्हणून मी एका व्यक्तीकडून पैसे घेऊन ते गुरुपौर्णिमेला अर्पण केले; पण मनात व्यवसायाची भीती होतीच.
२ इ. गुरुपौर्णिमेला धन अर्पण केल्याने सहस्र पटींनी फळ मिळून कर्जमुक्त होता येणे आणि ‘कर्ते-करविते गुरुदेवच आहेत’, असे वाटून गुरूंप्रती कृतज्ञताभाव दाटून येणे : गुरुपौर्णिमेनंतर साधारण एक ते दीड मासाने सर्व ग्रामपंचायतींना महाराष्ट्र शासनाचा आदेश आला, ‘आता जुने सर्व नमुने रहित करून नवीन नोंदवह्या (रजिस्टर्स) घालायच्या आहेत.’ त्या वेळी आम्हाला प्रथम २ तालुक्यांची कामे मिळाली. नंतर इतर तालुक्यांतील ‘रजिस्टर्स’चीही मागणी येऊ लागली. तेव्हा गुरूंना केलेल्या अर्पणाचे महत्त्व माझ्या प्रकर्षाने लक्षात आले. ‘गुरुपौर्णिमेला आपण एक रुपया अर्पण केला, तरी आपल्याला त्याचे एक सहस्र पटींनी फळ मिळते. माझ्याकडून साधारण १० सहस्र रुपये अर्पण झाले होते; म्हणून गुरूंनी या वेळी २५ लाख रुपयांचे काम मिळवून दिले आणि आम्हाला कर्जातून मुक्त केले.’ मला काही वेळा आई-वडिलांच्या औषधांच्या व्ययाची काळजी वाटायची; पण त्याचीही काळजी गुरुमाऊलींनी घेतली. तेव्हा मनामध्ये ‘कर्ता-करविता गुरुदेवच आहेत’, असे वाटून गुरूंप्रती कृतज्ञताभाव दाटून येऊ लागला.
३. सनातन संस्थेच्या पत्रकांची छपाई करण्याची सेवा
३ अ. पत्रक छपाईची सेवा करतांना अंगात कणकण जाणवणे : कधी कधी मला सनातन संस्थेच्या पत्रकांची छपाई करण्याची सेवा मिळत असे. ही सेवा करतांना मला ताप यायचा. त्या वेळी ‘कोणता त्रास होत आहे’, हे समजत नसे. मी याविषयी साधकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘तुम्ही सत्ची सेवा करत आहात. सत्मध्ये असल्यामुळे तुम्हाला वाईट शक्ती त्रास देत आहेत.’’ त्यांच्या सांगण्यावर माझा लगेचच विश्वास बसला. पत्रक छपाईची सेवा करतांना मला नेहमी कणकण यायची आणि दुसर्या दिवशी ठीक वाटायचे. प्रथम पत्रके छापण्याची सेवा मी केवळ सातारा जिल्ह्यापुरतीच करत असे. नंतर मला सहा जिल्ह्यांची पत्रके छापण्याची सेवा मिळाली.
३ आ. छपाईची सेवा विनामूल्य करूनही प्रेसची घडी सुधारणे : सातार्यातील श्री. राजेंद्र सांभारे यांनी मला एकदा सांगितले, ‘‘दादा, मनात कोणताही नकारात्मक विचार न आणता केवळ कागदाचे पैसे घेऊन पत्रक छपाईची सेवा करून पहा.’’ मी काही मास या पद्धतीने सेवा केली, तर मुद्रणालयाची परिस्थिती आणखीच सुधारल्याचे लक्षात आले. ‘कामे कुठून आणि कशी येत होती ?’, हे आम्हालाच समजत नव्हते. नंतर मी ठरवले, ‘सर्व जिल्ह्यांच्या पत्रकांची छपाई विनामूल्य करूया आणि ‘पार्सल’चा व्यय त्या त्या जिल्ह्यांना करायला सांगूया.’ गेली ३ वर्षे आम्ही अशी विनामूल्य छपाई करत आहोत. या ३ वर्षांत मुद्रणालयाची सर्व घडी बसली. कामगारांना किंवा आम्हाला कोणताही त्रास झाला नाही. व्यवसायातील स्पर्धकांनी मुद्रणालय बंद पाडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले; पण त्यांना यश मिळाले नाही.
४. सत्कार्याला निष्कामभावाने धन अर्पण करण्याचे महत्त्व लक्षात येणे
हे सर्व होत असतांना मनात ‘हे सर्व गुरुच करत आहेत’, अशी एकच जाणीव होती. त्यांच्याच कृपेने आज मुद्रणालयाची स्थिती चांगली आहे. माझ्या लक्षात आले, ‘गुरुचरणी, म्हणजेच सत्कार्यासाठी जेवढ्या निष्काम भावाने त्याग करू, तितक्या पटींनी गुरु आपल्याला त्याचे फळ देतात.’
५. साधनेमुळे झालेले पालट
५ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा आई-वडिलांच्या सेवेविषयी दृष्टीकोन’, याविषयीचे लिखाण वाचल्यावर वडिलांची सेवा मनापासून होऊ लागणे : मी लहानपणापासून वडिलांचे पाय दाबण्याची, तर कधी कधी पायांना तेलाने मर्दन करण्याची सेवा करायचो. नंतर महाविद्यालयात गेल्यावर मी त्याचा कंटाळा करू लागलो. वर्ष २०१६ मध्ये मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा आई-वडिलांच्या सेवेविषयी दृष्टीकोन कसा होता ?’, याविषयीचे लिखाण वाचले. ‘वृद्ध आई-वडिलांची सेवा करण्याचे भाग्य सर्वांच्याच भाग्यात नसते.’ हे गुरुवचन वाचल्यानंतर मी वडिलांची सेवा नियमित करायला लागलो. मी कधी परगावहून रात्री १२ वाजता घरी आलो, तरी मला त्यांचे पाय चेपण्याचा कंटाळा येत नाही.
५ आ. साधनेमुळे चित्रपटातील गाण्यांऐवजी भावगीते अन् भक्तीगीते आवडू लागणे : ११ वी नंतर माझ्यात गायनाची आवड निर्माण झाली. मागील एक ते दीड वर्षामध्ये मला भक्तीगीते म्हणायला आवडू लागले. सद्गुरु जाधवकाकांनी गायलेली भावगीते, वीरश्रीयुक्त गीते आणि भक्तीगीते मला पुष्कळ आवडतात. चित्रपटातील गाणी आणि भावगीते अन् भक्तीगीते यांतील भेद लक्षात येऊ लागला आहे. भावगीते अन् भक्तीगीते ऐकतांना भावजागृती होऊन दीर्घकालीन आनंद मिळतो, तर चित्रपटांतील गाण्यांमुळे क्षणिक सुख मिळते. केवळ गुरुकृपेनेच गायनाच्या माझ्या आवडीत पालट झाला आहे. श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञता !’
– श्री. विनोद प्रकाश भंडारे, मु.पो. वडूज, ता. खटाव, जि. सातारा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद् गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |