छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखावर आक्षेप घेणार्या पोलीस अधिकार्याची न्यायालयाकडून कानउघाडणी !
मुंबई – सातारा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आला. याविषयी काही विद्यार्थ्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून साहाय्यक पोलीस अधिकारी आर्.एस. गर्जे यांनी कार्यक्रमाच्या आयोजक इंग्रजीच्या प्राध्यापिका डॉ. मृणालिनी अहेर यांची विभागीय चौकशी करण्यात यावी, यासाठी महाविद्यालयाला पत्र पाठवले. याविरोधात अहेर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली. या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने पोलीस अधिकारी गर्जे यांचीच कानउघाडणी केली.
१. २६ जुलै या दिवशी न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. कॉ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता ?’, या पुस्तकाचा संदर्भ देऊन महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी प्राध्यापकांवर कारवाई करून त्यांची विभागीय चौकशी करण्यासाठी महाविद्यालयाला पत्र पाठवणे, ही कोणती लोकशाही ?, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.
२. या प्रकरणी पोलिसांनी विशेषाधिकाराची परिसीमा गाठल्याचाही उल्लेख करत पोलीस अधिकारी गर्जे यांनी पाठवलेले पत्र मागे घेण्याचा आदेश दिला आहे. यावर सरकारच्या वतीने अधिवक्ता हितेन वेणेगावकर यांनी पत्र मागे घेण्याचे आश्वासन दिले. कॉ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता ?’, या पुस्तकावर यापूर्वीही अनेक शिवप्रेमींनी आक्षेप घेतले आहेत.
काय आहे प्रकरण ?
ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमात प्रा. डॉ. विनायकराव जाधव यांनी राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. कार्यक्रमाला उपस्थित काही विद्यार्थ्यांनी याला विरोध केला. या वेळी प्रा. डॉ. विनायकराव जाधव यांनी कॉ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता ?’, या पुस्तकाचा संदर्भ दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असलेल्या पुस्तकाचा संदर्भ दिल्यामुळे विद्यार्थी अधिकच संतप्त झाले. त्यामुळे या कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
संपादकीय भूमिकाराष्ट्रपुरुषांचा एकेरी उल्लेख करणार्यांवर कठोर कारवाई करणारा कायदा आता सरकारनेच करावा, अशी समस्त राष्ट्रप्रेमींची मागणी आहे ! |