श्री. वीरेंद्र मराठे यांनी त्यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आज मी जो काही आहे, तो तुमच्या कृपेमुळेच ! मी आज ६० व्या वर्षात पदार्पण केले. आज सकाळी ६ वाजता मला जाग आली. त्या वेळी मला आपोआपच तुमचे स्मरण झाले आणि त्यानंतर सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त होऊ लागली. अशी स्थिती असणे, हीपण तुमचीच कृपा ! त्या वेळी व्यक्त झालेली कृतज्ञता तुमच्या चरणी अर्पण करत आहे.
१. गुरु, कुटुंबीय, आप्तेष्ट आणि साधक यांच्याविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता !
अ. मला साधनेत गेली २५ वर्षे टिकवून ठेवले, याबद्दल गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कृतज्ञता !
आ. माझे जन्मदाता आई-वडील ज्यांनी अपार कष्ट सोसून आणि त्याग करून आमचे पालनपोषण केले अन् आमच्यावर चांगले संस्कार केले, त्यांच्याप्रती कृतज्ञता !
इ. शिक्षक, मित्र, शालेय जीवनातील सवंगडी, ज्यांनी मला सामावून घेतले, समजून घेतले, त्यांच्याप्रती कृतज्ञता !
ई. नोकरीतील सहकारी, वरिष्ठ ज्यांच्याकडून व्यवहारातील अनेक गोष्टी शिकता आल्या, त्यांच्याप्रती कृतज्ञता !
उ. नातेवाइक, सगेसोयरे ज्यांनी वेळोवेळी मला सहकार्य केले आणि आधार दिला, त्यांच्याप्रती कृतज्ञता !
ऊ. माझी पत्नी आणि मुले यांच्याशी भांडलो, चिडलो; पण ते कधी दुरावले नाहीत, त्यांच्याप्रती कृतज्ञता !
ए. मला साधना सांगणारे साधक, साधनेत आल्यावर माझ्या प्रकृतीशी जुळवून घेणारे, माझा राग आणि द्वेष सहन करणारे साधक, मला मार्गदर्शन करणारे संत या सर्वांप्रती कृतज्ञता !
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनापथावर आणून अपार प्रीतीने श्री. वीरेंद्र मराठे यांचे जीवन घडवणे
माझ्या जीवनात अनेक बरे-वाईट प्रसंग घडले आणि सुख-दुःखे आली. त्यांना सामोरे जाण्यासाठी गुरुदेवांनीच मला बळ दिले. जीवनातील अनेक प्रसंगांतून गुरुदेवांनी माझे मन घडवले आणि मला साधनेकडे वळवले. ‘दुःखी जिज्ञासू होवोत । होवोत जिज्ञासू मुमुक्षू । मुमुक्षू होवोत साधक । अन् साधक जावोत मोक्षासी ।।’, या गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) सुवचनाप्रमाणे माझ्या साधनेला प्रारंभ झाला. दुःखाचे कारण सनातनच्या सत्संगात समजल्यावर ‘दुःखी जिज्ञासू होवोत ।’ प्रमाणे ‘दुःख निवारणासाठी तरी साधना करायलाच हवी’, हे माझ्या मनावर ठसले. शेवटच्या मोक्षाचा कधी विचारच केला नाही. सुवचनातील आधीचे टप्पे पार करण्यातच कितीतरी वर्षे गेली. मी केवळ जिज्ञासू होतो, तरीही गुरुदेवांनी मला त्यांच्या कार्यात सामावून घेतले. कधी प्रेमाने, तर कधी परखडपणे कार्यातील त्रुटी आणि साधनेला हानीकारक चुका सांगून त्यांनी मला घडवण्यास प्रारंभ केला. चुका सांगण्यातही प्रेमच होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर, म्हणजे प्रीतीचा सागरच ! साधनेतील अ, आ, इ, ई… मधील ‘अ’ जरी वेडावाकडा गिरवला, तरी ते त्या साधकाचे कौतुक करतात.
३. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ‘चांगला साधक’ म्हणून घडवतील’, याविषयी श्री. मराठे यांना शंका न वाटणे
मला घडवायचे; म्हणजे एका दगडाचा माणूस घडवायचा होता त्यांना ! हा दगड पाषाणाप्रमाणे कडकही नव्हता की, ज्याच्यावर ते मोकळेपणाने घाव घालून त्याला आकार देऊ शकतील. हा दगड ठिसूळ होता. ‘जरा जोरात घाव पडल्यास फुटेल कि काय ?’, अशी भीती होती; परंतु कारागीर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तितकेच कुशल होते. त्यांनी हा दगड फुटणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. ते या दगडाचा माणूसच नाही, तर मूर्ती घडवतील (म्हणजे त्याला चांगला साधक बनवतील) याबद्दल कोणतीही शंका नाही. त्यांच्याप्रती शब्दांतून मी कृतज्ञता कशी व्यक्त करू ?
मोक्षाची लालसा नको । प्रगतीची अपेक्षा नको ।
केवळ गुरुचरणांची सेवा घडो । हीच प्रार्थना तुमच्या चरणी ।
या देहाच्या वाढदिनी आणि गुरुपौर्णिमेदिनी ।।
गुरुदेव, तुम्ही मला आपला मानले. अधिकाराने काही गोष्टी सांगितल्या. माझ्यावर तुमचाच अधिकार आहे. त्यामुळे मला कसलीही चिंता नाही. ‘जे कधी कुणी ना केले । ते तू प्रेम मज दिधले ।।’, हे प.पू. रामजीदादा यांच्या वाणीतील शब्द आठवून माझा कंठ दाटून येतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला जन्माला घातले आणि तेव्हापासूनच तुम्ही माझे कल्याण करत गेलात, याबद्दल कोटीशः कृतज्ञता !
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था