अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडचा पाकिस्तान केल्यानंतरही छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती ! – अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर – सरकारने राज्याचे अल्पसंख्यांक विकास आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद दिले आहे. यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपच्या नेत्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर सिल्लोडचा पाकिस्तान केल्याची टीका केली होती; पण त्यानंतरही त्यांच्या नाकावर टिच्चून सत्तार यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदाचे दायित्व देण्यात आले आहे, असे दानवे यांनी २५ जुलै या दिवशी म्हटले आहे.
अंबादास दानवे यांनी २४ जुलै या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून छत्रपती संभाजीनगरला पालकमंत्री देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या पत्रानंतर अवघ्या काही घंट्यांतच शासनाने मंत्री अब्दुल सत्तार यांची छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वीच अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडचा पाकिस्तान केल्याची टीका केली होती; पण त्यांच्या शब्दाला कोणतीही किंमत न देता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने अब्दुल सत्तार यांना छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद देण्यात आले.