देवगिरीच्या पायथ्याशी ‘स्वराज्य प्रेरणा स्तंभ’ उभारा ! – स्वराज्य तोरण प्रतिष्ठानची मागणी
छत्रपती संभाजीनगर – आतापर्यंत लोकांना देवगिरीचा इतिहास ठाऊक नव्हता. २५ जुलै १६२९ या दिवशी देवगिरी गडावर राजमाता जिजाऊ यांच्या कुटुंबातील वडील आणि भाऊ यांची निजामाने हत्या केली. त्याच्या दुसर्या दिवशी आई आणि २ भावजया सती गेल्या. भाचा यशवंतसुद्धा मारला गेला. दौलताबाद येथे झालेली घटना ही स्वराज्यासाठीची प्रेरणा होती. त्यामुळे या ठिकाणी ‘स्वराज्य प्रेरणा स्तंभ’ उभा करायला पाहिजे, असे मत स्वराज्य तोरण प्रतिष्ठानचे राहुल भोसले यांनी व्यक्त केले आहे.
स्वराज्य प्रेरणादिनानिमित्त देवगिरी गडाच्या पायथ्यापासून फेरी, तर माळीवाडा येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अगोदर काढण्यात आलेल्या वाहन फेरीत ४०० जणांचा सहभाग होता. यानंतर कार्यक्रमस्थळी अभिवादन झाले. या वेळी रवींद्र पाटीललिखित ‘देवगिरी’, कॅप्टन नीळकंठ केसरीलिखित ‘राजे लखोजीराव जाधव : देवगिरी गडाचे खरे वारसदार’, तसेच राहुल भोसलेलिखित ‘स्वराज्य प्रेरणास्थळ किल्ला देवगिरी’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले.
४४० फूट स्तंभासाठी जागा द्यावी !
‘स्वराज्य तोरण संयोजन समिती’चे कार्यवाह राहुल भोसले म्हणाले की, या ठिकाणी प्रथमच स्मृतीदिन साजरा होत आहे. येथे ४४० फुटांचा ‘स्वराज्य प्रेरणा स्तंभ’ उभा करण्यासाठी गडावर किंवा पायथ्याशी जागा द्यावी, अशी मागणी आहे. या वेळी फेरी काढून इतिहास पुरुषांना अभिवादन करण्यात आले. विहिंपचे प्रांताध्यक्ष संजय बारगजे यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.