एकल पालकत्व धोक्यात !
एका अविवाहित दिग्दर्शकाची एक मुलाखत नुकतीच वाचनात आली. त्यात त्याने स्वतःच्या मुलांविषयी भाष्य केले आहे. या दिग्दर्शकाने स्वतःला मुले हवीत, यासाठी ‘सरोगसी’ (अन्य महिलेच्या गर्भाशयाचा वापर करून मुलाला जन्म देणे) पद्धतीचा वापर केला. याद्वारे त्याला जुळी मुले आहेत. दिग्दर्शकाने एकल पालकत्व स्वीकारले आहे. मुले मोठी होत असल्याने त्यांना अनेक प्रश्न पडतात, जसे की, आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो आहोत ? इतरांच्या घरी आई-वडील दोघेही असतात. आमची आई कुठे आहे ? इत्यादी. मुलांच्या या प्रश्नांची उत्तरे देतांना त्या दिग्दर्शकाची वडील म्हणून पुष्कळ तारांबळ उडत आहे. हे सर्व निस्तरण्यासाठी त्याला मुलांच्या शाळेतील समुपदेशकाचे साहाय्य घ्यावे लागत आहे. यामुळे ‘हे सर्व सोपे नाही. पालक होणे कधीच सोपे नसते’, असे विधान त्याने या मुलाखतीत केले आहे. एकल पालकत्व स्वीकारण्याआधी दिग्दर्शकाकडून या गोष्टींचा विचार झाला नव्हता का ? हा प्रश्नच आहे.
मुलांना आई आणि वडील दोघेही लागतातच. दोघांचे दायित्व आणि मर्यादा वेगवेगळ्या आहेत; म्हणूनच हिंदु धर्मामध्ये विवाह हा संस्कार आहे. यामुळेच कुटुंबव्यवस्था सक्षम होते. विवाह संस्कारातून निर्माण झालेल्या मुलांचे संगोपन सर्वांगाने होते. कुटुंब व्यवस्थेमुळेच सामाजिक संतुलनही योग्य रहाते. दिग्दर्शकाने स्वीकारलेले ‘एकल पालकत्व’ हे विकृत विचारसरणीचे उदाहरण आहे, असेच म्हणावे लागेल; कारण धर्माच्या विरुद्ध जाऊन केलेली कोणतीच कृती कधीच यशस्वी होत नाही.
या मुलांना आईविषयी पडलेले प्रश्न स्वाभाविक आहेत. या प्रश्नांना उत्तरे देणे कठीणच आहे. जन्मलेल्या प्रत्येक मुलासाठी ‘आई’चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही. दिग्दर्शकाने घेतलेला एकल पालकत्वाचा निर्णय धर्माच्या विरुद्ध असल्यामुळे तो निभावणे सोपे नाही. मुले लहान असतांनाच आपण त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकत नाही, तर उद्या मुले मोठी झाल्यावर त्यांना त्यांच्या जन्माचे सत्य लक्षात आल्यावर हीच मुले निराशेची वा एकलकोंडेपणाची शिकार झाल्यास आपण काय करणार आहोत ? आपण जशी समुपदेशकांची कुबडी घेतली, तशीच ती त्यांनाही देऊ करणार का ? हे आयुष्य निभावणे आहे का ?
हिंदु धर्मानुसार जन्माला येऊन धर्माचरण करणार्या कुटुंबात मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी समुपदेशकाची आवश्यकताच भासत नाही, हेच हिंदु धर्माचे माहात्म्य आहे. याउलट दिग्दर्शकाने वापरलेला पर्याय किंवा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ सारख्या माध्यमांतून जन्मलेली मुले ही बर्याचदा एकल पालकत्वाची शिकार होतात. पाश्चात्त्य संस्कृतीच्या आहारी न जाता हिंदु धर्मशास्त्रानुसार आचरण करून आपल्यासह आपल्या कुटुंबालाही स्थैर्य, सौख्य मिळवून द्यावे आणि भारतीय संस्कृतीला पुढे न्यावे !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.