सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त राबवलेल्या उपक्रमाला वरळी, मुंबई येथे मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !
१. वरळीतील हनुमान मंदिर कोळीवाडा
१ अ. आरती झाल्यावर भाविक लगेच निघून जात असल्याने मंदिरातील विश्वस्तांनी श्रीरामजन्माचा सोहळा झाल्याबरोबर साधकांना ‘देवाला साकडे’ घालण्याचा कार्यक्रम करण्यास सांगणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरात देवतांना साकडे घालणे, साधनेविषयी प्रवचने करणे, दिंड्या काढणे इत्यादी उपक्रम सर्वत्र चालू करण्यात आले होते. आम्ही मुंबईतील वरळी येथे रामनवमीपासून या उपक्रमांना प्रारंभ केला. आम्ही वरळीतील हनुमान मंदिर कोळीवाडा येथील विश्वस्तांना संपर्क केला. तेव्हा विश्वस्तांना प्रथमच भेटत असूनही ‘आमची पूर्वीपासून ओळख आहे’, असे आम्हाला वाटत होते. त्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाचा आम्हाला पुष्कळ चांगला लाभ झाला. मंदिरातील श्रीरामजन्माचा सोहळा झाल्याबरोबर त्यांनी आम्हाला ‘देवाला साकडे घालण्याविषयीची प्रार्थना करूया’, असे सांगितले. त्याचे कारण सांगतांना ते म्हणाले, ‘आरती झाल्यावर मंदिरातील भाविक लगेच निघून जातात.’’ त्यामुळे त्यांनी साकडे घातल्यानंतरच आरतीचे नियोजन केले. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आधीच सर्व नियोजन करून ठेवले होते’, असे मला जाणवले.
१ आ. मंदिराचे पुरोहित श्री. प्रसाद पुराणिक यांनी देवतेला भावपूर्ण प्रार्थना करून साकडे घालणे, तेव्हा भाव जागृत होऊन मंदिरात चैतन्य जाणवणे आणि देवतेचे अस्तित्व अनुभवायला मिळणे : मंदिराचे पुरोहित श्री. प्रसाद पुराणिक म्हणाले, ‘‘आपल्याला आज परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र लवकर स्थापन व्हावे, यासाठी या जागृत देवतेला साकडे घालायचे आहे. आपण सर्वांनी जागेवर उभे राहून माझ्या मागोमाग ही प्रार्थना म्हणायची आहे.’’ नंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत भावपूर्ण प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून आमचाही भाव जागृत झाला. प्रार्थना झाल्यावर आम्हाला मंदिरात चैतन्य जाणवले आणि देवतांचे अस्तित्व अनुभवायला मिळाले. त्या वेळी आम्हाला आतून आनंद जाणवत होता.
१ इ. मंदिराच्या विश्वस्तांनीही सकारात्मक प्रतिसाद देणे : मंदिराचे विश्वस्त श्री. उल्हास भाह्ये म्हणाले, ‘‘यापुढे तुम्ही मंदिरात कोणतेही कार्यक्रम घेऊ शकता.’’ याप्रमाणे त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तेव्हा ‘गुरुमाऊलीला तळमळीने प्रार्थना केल्यावर देवच सर्व जुळवून आणतो आणि लोकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळतो’, हे आम्हाला अनुभवायला मिळाले.
२. ‘जगभरातील सर्व हिंदूंसाठी प्रार्थना करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘एकमेव गुरु’ आहेत !’ – एका मंदिरातील पुजार्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !
अशा प्रकारे आम्हाला सर्व मंदिरांतून चांगला प्रतिसाद मिळत होता. एका मंदिरातील पुजार्यांनी सांगितले, ‘‘आतापर्यंत मी पुष्कळ वेळा पौरोहित्य केले; परंतु ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या महान विभूतीसाठी साकडे घालण्यासाठी देवीला प्रार्थना करण्याची मला संधी मिळाली’, हे मी माझे भाग्य समजतो. जगभरातील सर्व हिंदूंसाठी प्रार्थना करणारे हे एकमेव गुरु आहेत.’’ गुरुदेवांविषयी त्यांचे हे गौरवोद्गार ऐकताच आमची पुष्कळ भावजागृती झाली.
साकडे घालण्याच्या सेवेतून आम्हा सर्वांना पुष्कळ आनंद मिळाला. त्याविषयीचे चलचित्र (‘व्हिडीओ’) ‘सोशल मिडिया’वरून प्रसारित केल्यावर ‘लाईक’ आणि ‘शेअर’ या माध्यमांतून त्याला पुष्कळ प्रतिसाद मिळाला. गुरुमाऊलीने आम्हाला ही सेवा देऊन आमच्यावर कृपा केली, याविषयी आम्ही गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– श्री. उदय आणि सौ. उर्मिला उदय खानविलकर, वरळी, मुंबई. (जुलै २०२२)