शाम मानव यांची चौकशी आणि नार्काे चाचणी करा ! – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
‘लाडकी बहीण योजने’वरील अर्थ विभागाचा आक्षेप फेटाळला !
नागपूर – उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांची पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची ‘नार्को टेस्ट’ (व्यक्तीला अंशत: अचेतन अवस्थेत नेऊन करण्यात येणारी चौकशी) करावी, अशी मागणी भाजपचे नेते तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २६ जुलै या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केली. शाम मानव यांच्याकडे पुरावे असतील, तर त्यांनी ते द्यावेत; मात्र उगीच आरोप करू नयेत, असेही ते म्हणाले. शाम मानव यांनी नुकतेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ‘ईडी’च्या कारवाईपासून वाचण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापुढे काही गोष्टी (ऑफर) ठेवण्यात आल्या होत्या. यानुसार उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार अनिल परब यांना कारागृहात डांबण्यात येणार होते; पण देशमुख यांनी असे करण्यास ठाम नकार दिला. त्यांनी त्यासंबंधीच्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. यामुळे हे नेते वाचले; पण देशमुख यांना तब्बल १३ महिने कारागृहात जाण्याची वेळ आली, असे त्यांनी सांगितले होते.
मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘‘लाडकी बहीण योजने’वर अर्थ विभागाने आक्षेप घेतले आहेत. अर्थ विभागाने चिंता व्यक्त करण्याची आवश्यकता नाही. कुठलीही धारिका वित्त विभागाकडून येते. १७-१८ लाख कर्मचार्यांच्या वेतनाचा भार येत नाही. मग दोन-अडीच कोटी महिलांना लाभ देतांनाच अडचण येण्याचे कारण नाही.’’