US should wipe Iran : …तर अमेरिका इराणला जगाच्या नकाशावरून पुसून टाकेल ! – डोनाल्ड ट्रम्प
वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणे आक्रमण झाले होते. या प्राणघातक आक्रमणातून ते थोडक्यात बचावले होते. ट्रम्प यांच्यावर झालेल्या आक्रमणामागे कुणाचा हात आहे ?, हे अजून स्पष्ट झालेले नाही; पण ट्रम्प यांच्यावरील आक्रमणामागे इराणचा हात असल्याचे अनेक अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांवर याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ‘इराणने माझी हत्या केली, तर अमेरिका इराणला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकेल ’, असे ट्रम्प म्हणाले. या प्रकरणी इराणने त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत.
ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर असतांना वर्ष २०१८ मध्ये त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कार्यकाळात इराणसमवेत झालेला आण्विक करार रहित केला होता. त्याचा इराणच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. वर्ष २०२० मध्ये अमेरिकेने ड्रोनद्वारे आक्रमण करून इराणच्या सैन्यदलाचे प्रमुख कासिम सुलेमानी यांची हत्या केली होती. त्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील मतभेद आणखी वाढले. इराणने सुलेमानी यांच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातील सदस्यांना अनेक धमक्या दिल्या. जानेवरी २०२२ मध्ये इराणचे माजी राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी ट्रम्प यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला चालवण्याची मागणी केली होती.