परात्पर गुरु डॉक्टरांचा लाभलेला दिव्य सत्संग, त्यांनी करून घेतलेले विविध प्रयोग आणि त्यातून त्यांच्या अवतारत्वाची आलेली प्रचीती !
‘वर्ष १९९४ पासून मला परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला. या ३० वर्षांत विष्णुस्वरूप गुरुदेवांनी कधीही स्वतःतील देवत्व साधकांसमोर स्वीकारले नाही. ‘जे घडते, ते श्री गुरूंमुळे’, याच शिष्यभावात ते सतत असतात. परात्पर गुरु डॉक्टरांनी जरी त्यांचे अवतारत्व मान्य केले नाही, तरी सहस्रो जिवांना त्यांच्या संदर्भात अनुभूती आल्या आहेत आणि त्यांचे अवतारत्व सिद्ध झाले आहे. त्यांचे अवतारत्व वर्णन करणे हे शब्दांच्या पलीकडले आहे.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगात जाणवलेला त्यांचा महिमा, त्यांनी केलेले विविध प्रयोग आणि त्यांचा संकल्प अन् त्यांचे अस्तित्व यांमुळे आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. २६ जुलै या दिवशी यातील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू. (भाग २)
या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/818259.html
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उच्च आध्यात्मिक अधिकाराची जाणीव करून देणारे प.पू. भक्तराज महाराज यांचे सूचक बोल !
परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘नामजपादी उपायांचा आध्यात्मिक त्रास असलेले साधक आणि गुरुदेवांनी वापरलेल्या वस्तू अन् वास्तू यांवर काय परिणाम होतो ?’, यांच्या नोंदी ठेवण्यास सांगितले. त्याच कालावधीत मला माझ्या वहीत लिहून ठेवलेले दोन प्रसंग दृष्टीस पडले.
४ अ. ‘योग्य वेळ आली की, डॉक्टरांच्या हातातील छडी प्रकट होईल’, असे प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगणे : वर्ष १९९५ मध्ये मी एका उत्सवाच्या वेळी प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या सेवेत होते. तेव्हा प.पू. बाबा मला म्हणाले, ‘‘माझ्या हातात छडी असते. ती सर्वांना दिसते. डॉक्टरांच्या (प.पू. भक्तराज महाराज परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘डॉक्टर’ असे संबोधायचे.) हातातही छडी आहे; पण ती दिसत नाही. योग्य वेळ आली की, समाजासमोर त्यांची छडी प्रकट होईल.’’
४ आ. ‘५०० वर्षांपूर्वी झालेल्या मागच्या जन्मातही डॉक्टर संतच होते आणि ‘आता त्यांचे सर्वांत अधिक शिष्य होतील’, असे प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगणे : वर्ष १९९४ मध्ये पू. पृथ्वीराज हजारे (सनातनचे २५ वे संत) कांदळी येथील आश्रमात प.पू. बाबांच्या दर्शनासाठी गेले होते. तेव्हा प.पू. बाबा त्यांना म्हणाले, ‘‘डॉक्टरांचा आधीचा जन्म ५०० वर्षांपूर्वी झाला होता. तेव्हाही ते संतच होते; पण त्यांची धर्मप्रसाराची इच्छा अपूर्ण राहिली; म्हणून त्यांनी पुन्हा जन्म घेतला. आतापर्यंत झालेल्या सगळ्या संतांमध्ये आता त्यांचे सर्वांत अधिक शिष्य होतील !’’
५. परात्पर गुरु डॉक्टरांचे अवतारत्व सहस्रो साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांनी स्थुलातून अनुभवले असणे अन् गुरुदेवांनी सूक्ष्मातूनही असंख्य साधकांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार केला असणे
गुरुदेवांचे गुणसंकीर्तन करण्यास पृथ्वीतलावरील सर्व लेखण्या आणि शब्द अपुरे आहेत. त्यांचे अवतारत्व शब्दांच्या पलीकडले आहे. ते केवळ अनुभवण्यासाठीही अनेक जन्मांची पुण्याई लागते. त्यांच्या या दैवी अस्तित्वाचा महिमा शब्दबद्ध करतांना माझे शब्दच थिटे पडत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारत्व सहस्रो साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांनी स्थुलातून अनुभवले आहेच; पण ‘त्यांनी सूक्ष्मातून असंख्य साधकांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार केला’, हे तर आपल्याला ज्ञातही नाही.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक अधिकाराची प्रचीती येणारे काही प्रयोग
परात्पर गुरु डॉक्टरांनी करून घेतलेले काही प्रयोग उदाहरणासाठी पुढे देत आहे.
६ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प आणि अस्तित्व यांमुळे पंचतत्त्वांशी संबंधित अनुभूती येणे
६ अ १. परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीरामाचा नामजप करणे आणि याविषयी ठाऊक नसलेल्या अन् कुलदेवीचा नामजप करणार्या सर्व साधकांना श्रीरामाचे दर्शन होणे : एप्रिल २००१ मध्ये सनातन संस्थेच्या वतीने एकमेवाद्वितीय असे सूक्ष्म जगतावरील संशोधन चालू झाले. त्या वेळी गुरुदेवांनी पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, म्हणजे सूक्ष्मातील कळणार्या काही साधकांची निवड केली अन् त्यांना विविध प्रयोगांद्वारे स्पंदनशास्त्राचे प्रशिक्षण दिले. फोंडा, गोवा येथील ‘सुखसागर’ आश्रमात हे संशोधन चालू असे. पहिल्या प्रयोगात गुरुदेव आमच्या समोर बसले आणि डोळे मिटून त्यांनी आम्हाला आमच्या कुलदेवीचा नामजप करायला अन् ‘काय जाणवते ?’, याकडे लक्ष द्यायला सांगितले. त्यांनी स्वतःही ध्यान लावले.
साधारण १५ मिनिटांनी त्यांनी आम्हा सर्वांना ‘काय जाणवले ?’, असे विचारले. तेव्हा आम्ही दहाही साधकांनी श्रीरामाचे दर्शन झाल्याचे सांगितले. काही साधकांना सिंहासनारुढ श्रीरामाचे, तर काहींना श्रीरामाच्या काही भागाचे दर्शन झाले होते. येथे हे वैशिष्ट्यपूर्ण होते की, प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी होती आणि प्रत्येक जण स्वतःच्या कुलदेवीचा नामजप करत होता, तरीही दाही जणांना श्रीरामाशी संबंधित अनुभूती आली.
गुरुदेवांनी सर्वांना आलेल्या अनुभूती ऐकून त्यानंतर सांगितले, ‘‘मी श्रीरामाचा नामजप करत होतो.’’ याविषयी कुणालाच ठाऊक नव्हते. गुरुदेवांनी श्रीरामाचा नामजप केल्यावर ‘त्या नामजपातील चैतन्य आणि गुरुदेवांमधील देवत्व’ यांमुळे श्रीरामाचे शब्द अन् रूप समोर बसलेल्या साधकांना दिसले. (‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, या आध्यात्मिक सिद्धांताची अनुभूती साधकांना आली.’ – संकलक)
६ अ २. आश्रमात, तसेच परात्पर गुरु डॉक्टरांच्या देहाला विविध प्रकारचे दैवी सुगंध येणे : वर्ष २००३ मध्ये ‘सुखसागर’, फोंडा, गोवा येथील आश्रमात विविध प्रकारचे सुगंध येत असत. कधी चंदनाचा, कधी कुंकवाचा, तर कधी विविध फुलांचा सुगंध येत असे. ‘वाईट शक्तींच्या विरुद्ध चालू असलेल्या सूक्ष्म युद्धात देवता आपल्या पाठीशी आहेत’, याची ही अनुभूती होती. गुरुदेवांच्या देहालाही विविध प्रकारचे दैवी सुगंध येत. ते जवळून गेले, तरीही हे सुगंध येत आणि दीर्घकाळ टिकून रहात असत.
६ अ ३. परात्पर गुरु डॉक्टरांनी वाटीतील पाण्यात त्यांच्या हाताची बोटे बुडवल्यावर पाण्याला चंदन आणि अष्टगंध यांचा, तसेच फुलांप्रमाणे गोडसर सुगंध येणे : एक दिवस त्यांनी मला प्रयोगासाठी बोलावले. तेव्हा त्यांच्या हाताच्या पाचही बोटांना वेगवेगळे सुगंध येत होते आणि त्यांच्या तळहाताला आणखीन वेगळाच सुगंध येत होता. त्यांनी त्यांचे एकेक बोट समोरच्या वाटीतील पाण्यात बुडवले. तेव्हा त्या पाण्यालाही त्यांच्या बोटांचा गंध आला. त्या पाण्याला चंदन आणि अष्टगंध यांचा, तसेच फुलांप्रमाणे गोडसर सुगंध येत होता.
(सुगंध येण्यामागील शास्त्र : अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांमुळे जशी दुर्गंधी येते, त्याप्रमाणे दैवी तत्त्वात वाढ झाली की, दैवी सुगंध येऊ लागतात, तसेच शरिरावर दैवी चिन्हेही उमटू लागतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्व वस्तूंना सुगंध येतो, तसेच त्यांच्या देहावर दैवी चिन्हेही उमटली आहेत.)
– सौ. मंगला पांडुरंग मराठे, फोंडा, गोवा. (१७.११.२०२१) (क्रमशः)
या लेखातील मागील पुढील वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/819063.html
|