Kargil War Anniversary : पाकपुरस्कृत आतंकवाद्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत ! – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी यांची कारगिल येथून चेतावणी
कारगिल (लडाख) – मी आतंकवाद्यांना सांगू इच्छितो की, त्यांचे ‘नापाक’ मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत, अशी चेतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिली. कारगिल युद्धाच्या २५ व्या विजय दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमाच्या वेळी पाकपुरस्कृत आतंकवाद्यांना चेतावणी देतांना पंतप्रधान मोदी यांनी हे वक्तव्य केले.
पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली सूत्रे
१. ‘कारगिल विजय दिवस’ आम्हाला सांगतो की, राष्ट्रासाठी दिलेले बलीदान देणारे अमर होतात. दिवस, महिने, वर्षे, शतके जातात, परिस्थिती पालटते; पण राष्ट्राच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावणार्यांची नावे कायम अमर रहातात. हा देश आमच्या सैन्याच्या पराक्रमी महानायकांचा सदा सर्वदा ऋणी आहे. हा देश त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे.
२. कारगिलमध्ये आम्ही केवळ युद्ध जिंकले नव्हते, तर आम्ही सत्य, संयम आणि सामर्थ्य यांचे अद़्भुत उदाहरण जगासमोर ठेवले होते.
३. तुम्हाला ठाऊक आहे की, भारत तेव्हा शांततेसाठी प्रयत्न करत होता. त्या बदल्यात पाकिस्तानने पुन्हा एकदा त्याचा अविश्वासू चेहरा दाखवला; परंतु सत्याच्या समोर असत्य आणि आतंकवाद्यांचा पराभव झाला. असे असले, तरी पाकिस्तानने इतिहासातून काहीच धडा घेतला नाही. आज मी अशा जागेतून बोलत आहे, जेथून आतंकवाद्यांना माझा आवाज थेट ऐकू जात आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, त्यांचे नापाक मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत.
‘अग्नीवीर’ योजनेवरून काही लोक देशातील तरुणांची दिशाभूल करत आहेत !
पंतप्रधान मोदी यांनी सैनिकांसाठीच्या ‘अग्नीवीर’ योजनेविषयी म्हटले की, आज भरती झालेल्या व्यक्तीला आजच पेन्शन द्यावी लागेल का ? ३० वर्षांनंतर पेन्शन द्यावी लागेल. तेव्हा मोदी यांचे वय १०५ वर्षे असेल. तेव्हा देशात मोदी सरकार येणार का? सरकारने पेन्शनचे पैसे वाचवण्यासाठी योजना आणल्याचा गैरसमज पसरवला जात आहे. तरुणांची दिशाभूल करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत.
‘शिंकुन ला टनेल’ प्रकल्पाचे उद़्घाटन
पंतप्रधान मोदी यांनी या वेळी शिंकुन ला बोगदा प्रकल्पाचे उद़्घाटन केले. या प्रकल्पात ४.१ कि.मी. लांबीचा बोगदा आहे. खराब हवामान असल्यास लेहशी संपर्क तुटतो. या बोगद्यामुळे खराब हवामान असतांनाही लेहशी संपर्क ठेवण्यास साहाय्य होईल. हा जगातील सर्वांत उंच बोगदा असेल.
काय आहे कारगिल युद्ध ?
२६ जुलै १९९९ या दिवशी भारतीय सैनिकांनी ‘टायगर हिल’वर तिरंगा ध्वज फडकावला आणि कारगिल युद्धात पाकिस्तानचा पराभव केला. ८४ दिवस चाललेल्या या युद्धात भारतीय सैन्याच्या ५२७ सैनिकांना वीरमरण आले, तर १ सहस्र ३६३ सैनिक घायाळ झाले. यात पाकिस्तानचे ४०० हून अधिक सैनिक मारले गेले. पाकिस्तानी सैन्य आणि आतंकवादी यांनी भारतीय क्षेत्रात घुसखोरी केली होती. त्यांना हाकलून लावण्यासाठी हे युद्ध झाले होते.