देवभक्तिहून श्रेष्ठ असलेल्या गुरुभक्तीची महती सांगणारा पुणे येथील सनातनचा भक्तिमय गुरुपौर्णिमा महोत्सव !
संतांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यात ७ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !
पुणे, २६ जुलै (वार्ता.) : सध्या धर्मग्लानीचा काळ असल्याने ‘धर्मप्रसाराचे कार्य करणे’, ही काळानुसार सर्वश्रेष्ठ साधना आहे आणि हेच गुरूंना अपेक्षित आहे. गुरुपौर्णिमेला गुरूंप्रती एक दिवसाची कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी गुरूंना अपेक्षित असलेले कार्य वर्षभर आणि सातत्याने करत रहाणे, हीच खरी कृतज्ञता ठरते. गुरूंना अपेक्षित असलेले कार्य सातत्याने करण्याची प्रेरणा सनातनच्या साधकांसह समाजातील जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांनी यंदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी घेतली. ‘सनातन संस्थे’च्या वतीने २१ जुलै या दिवशी पुणे येथील जुन्नर, कर्वे रोड (एरंडवणे), तळेगाव, भोर, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, चिंचवड (रावेत) या ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला २ सहस्र ४४० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते. कार्यक्रम स्थळी उपस्थित संतांचा तसेच मान्यवर वक्ते, विद्यार्थी यांचा सन्मानही करण्यात आला.
या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर, स्वा. सावरकर युवा विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर, ब्रिगेडियर श्री. हेमंत महाजन, ह.भ.प. जाधव महाराज, श्री. दिलीप देशमुख, विश्व हिंदु परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारी सदस्य श्री. विवेक सिन्नरकर, अधिवक्त्या (सौ.) मृणाल व्यवहारे यांनी उपस्थित जिज्ञासूंना मार्गदर्शन केले.
मान्यवर वक्त्यांची भाषणे
अन्य देशांप्रमाणे घुसखोरीच्या विरोधात कठोर शिक्षेची तरतूद करून त्याची कार्यवाही करावी ! – हेमंत महाजन, ब्रिगेडियर (निवृत्त)
भारताचे गव्हर्नर फिल्ड मार्शल वेवेल यांनी वर्ष १९४६ मध्ये त्यांच्या ‘व्हाईसराय जर्नल’ या पुस्तकामध्ये ‘पूर्व पाकिस्तानचे (आताच्या बांगलादेशाचे) तत्कालीन पंतप्रधान हे त्यांच्या देशातील मुसलमानांना आसाममध्ये पाठवून आसामला पाकिस्तानचा करण्याचा प्रयत्न करत आहेत’, असे नमूद केले होते. त्याकडे भारतीय नेतृत्वाने पुरेसे लक्ष दिले नाही; परंतु त्या वेळचे आसामचे राष्ट्रभक्त मुख्यमंत्री गोपीनाथ बोरदोलोई यांनी आसामला पाकिस्तानमध्ये जाण्यापासून वाचवले. भारतात बांगलादेशींची संख्या ही ५-६ कोटी असावी’, असे समजले जाते. बांगलादेशी घुसखोरी हा भारताला लागलेला कर्करोग आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी देशातील सर्व राजकीय पक्षांनी कोणतेही राजकारण न करता घुसखोरी रोखण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे, तसेच अन्य देशांप्रमाणे घुसखोरीच्या विरोधात कठोर शिक्षेची तरतूद करून त्याची कार्यवाही केली पाहिजे असे परखड प्रतिपादन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. ते अश्वमेध हॉल, एरंडवणा येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते.
जात, पात, भाषा, प्रांत, संप्रदाय विसरून कट्टर हिंदु म्हणून संघटित होण्याची आवश्यकता ! – अधिवक्त्या (सौ.) मृणाल व्यवहारे (साखरे)
आतंकवाद ही जगासमोरील सगळ्यात मोठी समस्या आहे. काही वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये असलेली ही वाळवी आता महाराष्ट्र पुण्यापर्यंत पसरली आहे. ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवी. आतंकवादासमवेतच अर्बन नक्षलवादाची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे; पण खरी परिस्थिती पाहिली तर नक्षलवाद्यांचे लांगूलचालन आणि हिंदुत्वनिष्ठांचा छळ, असे चित्र पहायला मिळत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील फोलपणा उघडकीस आल्यावर याची खात्रीच पटली आहे. हिंदु किंवा हिंदुत्वनिष्ठ असणे या देशात अपराध आहे का ? असा प्रश्न सामान्यांना पडल्याविना रहाणार नाही. बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात हिंदूंची ही स्थिती असेल, तर भविष्य काय असेल ? याची कल्पनाच न केलेली बरी. ही सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी जात, पात, भाषा, प्रांत, संप्रदाय विसरून एक कट्टर हिंदु म्हणून संघटित होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अधिवक्त्या (सौ.) मृणाल व्यवहारे (साखरे) यांनी केले. सिंहगड रस्ता येथील धारेश्वर मंगल कार्यालयात आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात त्या बोलत होत्या.
स्वा. सावरकर होते म्हणून अंदमान आपल्याकडे आहे, अन्यथा अंदमानचीही फाळणी झाली असती ! – विद्याधर नारगोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, महामंत्री
व्यष्टी साधनेत एकाच देवतेची उपासना असते आणि समष्टी साधनेत अनेक देवतांची उपासना असते. जसे सैन्यात पायदळ, रणगाडे, वायूदल, नावीकदल इ. अनेक विभाग असतात त्याचप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या समष्टी कार्यात अनेक देवतांची उपासना करावी लगते. यज्ञ, याग इ. करावे लागतात. प्रत्येकाच्या मनात एक शल्य असते. आजच्या काळात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले सांगत असलेली समष्टी मधील सात शल्य म्हणजे धर्मांतर, मंदिर सरकारीकरण, भूमी जिहाद, लव्ह जिहाद, हलाल सर्टिफिकेट, गजवाह हिंद आणि गोहत्या होय ! ही रोखण्यासाठी आपण सावरकरांप्रमाणे प्रयत्न करूया ! स्वातंत्र्यवीर सावरकर होते म्हणून अंदमान आपल्याकडे आहे, नाहीतर अंदमानचीही फाळणी झाली असती, असे मत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर यांनी व्यक्त केले. ते वाळवेकर लॉन्स, सातारा रस्ता या ठिकाणी आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते. या वेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे खंडणही केले.
हिंदूंनो, राष्ट्र आणि धर्म यांसाठी जागे व्हा ! – ह.भ.प. बाळासाहेब जाधव महाराज
प्रत्येक हिंदूने संस्कृती जपली पाहिजे. जगात कोणत्याही देशात २ कायदे नाहीत केवळ आपल्याच देशात २ कायदे आहेत. मंदिरांची सहस्रो एकर भूमी वक्फ बोर्डाने घशात घातली आहे, यासाठी हिंदूंनी जागृत व्हायला हवे. हिंदूंच्या मंदिरावर आघात होतात. मंदिरांचे सरकारीकरण केल्यामुळे भक्तांनी दान केलेले पैसे अन्य धर्मियांवर उधळले जातात, त्यासाठी सर्व हिंदूंनो राष्ट्र आणि धर्म यांसाठी जागे व्हा, असे आवाहन ह.भ.प. बाळासाहेब जाधव महाराज यांनी उपस्थितांना केले. ते अभिजित भवन मंगल कार्यालय, भोर या ठिकाणी संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते.
जिहादी प्रवृत्तीशी लढण्यासाठी सावरकरांच्या प्रखर विचारांची आवश्यकता ! – डॉ. नीलेश लोणकर, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सर्वात प्रथम हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडली. भारत हे हिंदु राष्ट्रच आहे. सावरकरांचे विचार आजच्या परिस्थितीतही तेवढेच लागू होतात. जिहादी प्रवृत्तीशी लढण्यासाठी आपल्याला सावरकरांच्या प्रखर विचारांची आवश्यकता आहे. सध्या राजरोसपणे धर्मांतर चालू आहे. देशाची फाळणी धर्माच्या आधारे झाली, तेव्हा सावरकरांच्या मते सर्व मुसलमान पाकिस्तानात जायला हवे होते; परंतु असे झाले नाही. परिणामी आज भारतात मुसलमानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा आपल्याला पुष्कळ मोठा धोका आहे. आपल्या राज्यघटनेत जाणूनबुजून ‘सेक्युलर’ शब्द घुसवला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशातील हिंदूंना अपेक्षित असा भारताचा एक राष्ट्रध्वजही सिद्ध केला होता; पण निधर्मी सरकारने तो नाकारला, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंचचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांनी केले. ते तुळजाभवानी सभागृह, जुन्नर या ठिकाणी आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते.
सनातनच्या आश्रमांप्रमाणे मंदिरांचे व्यवस्थापन असावे ! – दिलीप देशमुख, माजी धर्मदाय आयुक्त
मंदिरांचे व्यवस्थापन जर अयोग्य असेल, मंदिरांच्या विश्वस्तांचे अंतर्गत वाद, मंदिरांच्या चल-अचल संपत्तीची नोंद नसणे इत्यादी कारणे असतील, तर मंदिरे सरकारला कह्यात घेण्याची संधी मिळते; म्हणून मंदिरांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करा. शेगाव येथील श्रीगजानन महाराज मंदिर, सनातन संस्थेचा ‘रामनाथी’ येथील आश्रम हे यासाठी उत्तम उदाहरण आहे. मंदिरांचे वाद आपसी सामंजस्याने सोडवा, त्यांना न्यायालयापर्यंत नेऊ नका. असे केल्याने मंदिर सरकारीकरण होणार नाही, असे प्रतिपादन माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख यांनी केले. ते जी.एम्.के. बँक्वेट, रावेत चौपाटी समोर, पुणे-मुंबई हायवे येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते.
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटिबद्ध होऊन स्वभाषा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगण्याचे ध्येय घेऊया ! – विवेक सिन्नरकर, विश्व हिंदु परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारी सदस्य
वेद, धर्मग्रंथ सुरक्षित रहाण्यासाठी तसेच हिंदु धर्माचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी राज्यकर्ता सात्त्विक असायला हवा. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आपण कटिबद्ध होऊया आणि स्वभाषा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगण्याचे ध्येय घेऊया, असे प्रतिपादन वर्ष १९९० पासून श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनात सक्रिय सहभागी असलेले विश्व हिंदु परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारी सदस्य श्री. विवेक सिन्नरकर यांनी केले. ते अपूर्वा गार्डन मंगल कार्यालय, तळेगाव दाभाडे येथे झालेल्या महोत्सवात बोलत होते.
उपस्थित संत
रावेत (पुणे) येथे सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) संगीता पाटील, पू. श्रीमती सुलभा जोशी, पू. (श्रीमती) पार्वती ननावरे आणि पू. (सौ.) मनीषा पाठक, वाळवेकर लॉन्स येथे सनातनच्या ११० व्या संत पू. उषा कुलकर्णी आणि सनातनचे १११ वे संत पू. गजानन साठे यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
संत सन्मान
१. सनातन संस्थेच्या संत पू. उषा कुलकर्णी यांचा सन्मान सौ. वैशाली खानेकर यांनी आणि सनातनचे संत पू. गजानन साठे यांचा सन्मान श्री. संभाजी मोरे यांनी केला.
२. सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) संगीता पाटील, पू. (श्रीमती) सुलभा जोशी, पू. (श्रीमती) पार्वती ननावरे यांचा सन्मान सौ. सुमती गिरी आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांचा सन्मान सौ. रश्मी शर्मा यांनी केला.
या वेळी गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आले, तसेच ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’ दाखवण्यात आली. विविध विषयांवरील आध्यात्मिक आणि धार्मिक ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात आले होते. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यावर स्वतःमध्ये झालेले पालट आणि आलेल्या अनुभूतींचे कथन आणि ‘सनातन प्रभात’च्या वाचकांचा सत्कार हे या वेळचे विशेष आकर्षण ठरले.
विशेष सहकार्य
१. कार्यालयाचे मालक श्री. हर्षद जयंत नातू यांनी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले.
२. श्री. सुरेश गोपाळ रानडे यांनी कनात आणि सतरंजी विनामूल्य उपलब्ध करून दिले.
३. वाळवेकर सभागृहाचे मालक श्री. अरविंद वाळवेकर, यांनी कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून दिले
४. काळेमंडपचे श्री. विकास काळे, अभिजित साऊंड सर्व्हिसचे श्री. अभिजित चव्हाण, माजी नगरसेवक श्री. किशोर धनकवडे, भापकर मंडपचे श्री. सचिन भापकर आणि सुनंदा मंगल केंद्र यांचे सहकार्य लाभले.
५. अभिजित भवन मंगल कार्यालयाचे मालक प्राध्यापक श्री. रामदास सुरवसे यांनी सभागृह उपलब्ध करून दिले.
६. श्री. कुणाल सागळे यांनी ध्वनिक्षेपक यंत्रणा उपलब्ध करून दिली.
७. श्री. धीरज गुजर, तुळजाभवानी खानावळ, श्री. विजय गुजर आणि सोनाली गार्डनचे श्री. मंगेश टिळेकर यांनी न्याहरी, महाप्रसाद यासाठी सहकार्य केले.
८. तिळवण तेली समाज जुन्नर यांनी श्री तुळजाभवानी सभागृह उपलब्ध करून दिले.
विविध ठिकाणच्या कार्यक्रम स्थळी झालेले हितचिंतक सत्कार !
१. १२ वर्षांपेक्षा अधिक काळापासून सनातन संस्थेच्या कार्याशी जोडलेले आणि सनातन संस्थेला मोलाचे सहकार्य करणारे उगम कॉपीयर्सचे श्री. उदय गाडगीळ आणि सनातन संस्थेच्या कार्यात नियमितपणे सहभागी असणारे अभिजित साऊंड सर्व्हिसचे मालक श्री. अभिजीत माणिक चव्हाण यांचा सत्कार श्री. विद्याधर नारगोलकर यांच्या हस्ते करण्यात आला.
२. श्री क्षेत्र बनेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव श्री. अनिल गयावळ यांचा सत्कार ह.भ.प. श्री. बाळासाहेब जाधव महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.
३. भोर येथील हिंदुत्वनिष्ठ व्यावसायिक श्री. किरण अंबिके यांचा सत्कार ह.भ.प. श्री. बाळासाहेब जाधव महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.
विविध ठिकाणी कार्यक्रम स्थळी उपस्थित मान्यवर
राजस्थान आघाडी भाजपाचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री. जयसिंग पुरोहित, संस्थापक अध्यक्ष राधाकृष्ण मंदिर हडपसरचे श्री. अंकुश राजाराम जगताप, तुकाईनगर ट्रस्ट गणेश मंदिरचे विश्वस्त श्री. दत्तात्रय लक्ष्मण कुलकर्णी, शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष कोलवडी गावचे श्री. शुभम गायकवाड, अजिंक्य सभागृहाचे मालक श्री. अप्पासाहेब तावरे, पुणे येथील उद्योजक श्री. राजेंद्र नारायणपुरे, श्री. अमर ओसवाल आणि मोहरी खुर्द गावचे सरपंच श्री. सागर पांगारकर, भोर येथील चालक मालक संघटनेचे अध्यक्ष श्री. संतोष भोसले, वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष श्री. मधुकर पांडुरंग काजळे, माजी खासदार श्री. किसनराव बाणखेले यांचे पुत्र श्री. विकास बाणखेले, कळंबादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मार्तंड डेरे, विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री श्री. रमेश कर्पे, जुन्नर येथील माजी नगराध्यक्ष सौ. भारती मेहेर, भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष श्री. शंकरशेठ जगताप, भाजपचे माजी नगरसेवक अधिवक्ता मोरेश्वर शेडगे.
वैशिष्टपूर्ण घटना
१. आळंदेवाडी, आळंदे, गोकवडी, गवडी, शिंद, शिरवळ, नसरापूर, कापूरहोळ, खेड शिवापूर, भोर शहर आदी गावांमधील जिज्ञासू शेतातील कामे आणि पाऊस असूनही उपस्थित राहिले.
२. सौ. मोहिनी तुषार तारू (२४ वर्षे) यांची गुरुपौर्णिमेच्या आदल्या रात्री दुचाकी चोरीला गेली. सर्वसामान्य कुटुंबातील असूनही ताई एवढ्या ताण-तणावांमध्येही गुरुपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या.
३. कार्यक्रमानंतर अनेकांनी ‘हिंदु राष्ट्राविषयी’ शंकांचे निरसन वक्त्यांकडून करून घेतले.
४. जिज्ञासू श्री. शाहूराज मोरे यांनी, ‘कार्यक्रम खूप नियोजनबद्ध आणि छान झाला, अशा मार्गदर्शनाची समाजाला आवश्यकता आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
५. दोन वयस्कर आजी कार्यक्रमासाठी जिना चढून वर आल्या आणि त्यांनी शेवटपर्यंत कार्यक्रम पाहिला.