सध्या प्रत्येकाला आपला धर्म किंवा देव सर्वोच्च आहे, हे सांगायचे असते ! – मुंबई उच्च न्यायालय
धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून दोघांविरुद्ध नोंदवलेला गुन्हा फेटाळल्याचे प्रकरण
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले, ‘‘सध्या लोक त्यांच्या धर्मांविषयी पूर्वीपेक्षा जास्त संवेदनशील झाले आहेत. प्रत्येकाला आपला धर्म किंवा देव कसा सर्वोच्च आहे, हेच सांगायचे असते.’’ व्हॉट्सॲप गटामध्ये धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून दोन जणांविरुद्ध नोंदवलेला गुन्हा फेटाळतांना मुंबई उच्च न्यायालयाने ही टिपणी केली.
न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपिठाने वर्ष २०१७ मध्ये लष्करी अधिकारी आणि एक आधुनिक वैद्य यांच्या विरुद्ध धार्मिक भावना दुखावणे, जाणूनबुजून शांतता भंग करणे आणि धमक्या देणे या प्रकरणी नोंदवलेला गुन्हा रहित केला. तक्रारदार शाहबाज सिद्दीकी यांनी लष्करातील सैनिक प्रमोद शेंद्रे आणि डॉक्टर सुभाष वाघे यांच्यावर व्हॉट्सॲप गटावर मुसलमान समाजाविरोधात अपमानास्पद संदेश पोस्ट केल्याचा आरोप केला होता. तक्रारदार हेही त्या गटाचा भाग होते. आरोपींनी महंमद पैगंबर यांच्याविषयी प्रश्न उपस्थित करून ‘वन्दे मातरम्’ न म्हणणार्यांनी पाकिस्तानात जावे’, असे सांगितले होते. या प्रकरणी सिद्दीकी यांनी तक्रार केली होती.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने सांगितले की, व्हॉट्सॲपचे संदेश हे ‘एनक्रिप्टेड’ असल्याने ते तिसर्या व्यक्तीद्वारे मिळवले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे भारतीय दंड संहितेअंतर्गत धार्मिक भावना दुखावण्याचा परिणाम होऊ शकतो का ? हे पहावे लागेल. भारत हा धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश आहे. तेथे प्रत्येकाने इतरांचा धर्म आणि जात यांचा आदर केला पाहिजे; परंतु त्याच वेळी लोकांनी कोणतीही प्रतिक्रिया घाईघाईने व्यक्त करणे टाळले पाहिजे.