येत्या १५ दिवसांत ४५८ धर्मादाय रुग्णालयातील गरिबांसाठीच्या खाटांची उपलब्धता ऑनलाईन कळणार !
‘बोगस’ रुग्ण दाखवून सरकारची फसवणूक करणार्या धर्मादाय रुग्णांना चाप बसणार !
मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – राज्यातील काही धर्मादाय रुग्णालयांमध्ये ‘बोगस’ रुग्ण दाखवून सरकारची फसवणूक चालू आहे. ही फसवणूक रोखण्यासाठी, तसेच धर्मादाय रुग्णालयात गरीब आणि निर्धन रुग्णांसाठी असलेल्या राखीव खाटांचा लाभ त्यांना व्हावा, यासाठी येत्या १५ दिवसांमध्ये राज्यातील ४५८ धर्मादाय रुग्णालयांत गरीब आणि निर्धन रुग्णांसाठी राखीव खाटांची माहिती ऑनलाईन करण्यात येणार आहे, अशी माहिती विधी आणि न्याय विभागातील एका अधिकार्यांनी दिली. ऑनलाईन माहितीमुळे ‘बोगस’ रुग्ण दाखवून सरकारची फसवणूक करणार्या धर्मादाय रुग्णालयांना आळा बसणार आहे.
मंत्रालयातील विधी आणि न्याय विभागाच्या कक्षामध्ये कार्यरत असलेल्या राज्यस्तरीय विशेष साहाय्य कक्षाद्वारे स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करून धर्मादाय रुग्णालयातील उपलब्ध खाटांची माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सद्यःस्थितीत राज्यात ४५८ धर्मादाय रुग्णालये आहेत. यांमध्ये एकूण १२ सहस्र २८५ खाटा उपलब्ध आहेत. या सर्व खाटांची उपलब्धता या संकेतस्थळावरून समजणार आहे. धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन आणि गरीब रुग्णांसाठी राखीव असलेल्या प्रत्येकी १० टक्के खाटांचा लाख खरोखरच त्यांना होत आहे ना ? याची माहिती या संकेतस्थळावरून कळणार आहे.
बोगस नोंदी रुग्ण दाखवून होत आहे सरकारची फसवणूक !
राज्यातील काही मोठ्या रुग्णालयांमध्ये गरीब आणि निर्धन रुग्णांसाठी असलेल्या खाटा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. काही रुग्णालयांमध्ये रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नातेवाइकांना गरीब आणि निर्धन रुग्ण म्हणून दाखवून सरकारची फसवणूक केली जात आहे. हे रोखण्यासाठी राज्यस्तरीय विशेष साहाय्य कक्षाच्या पथकाद्वारे धर्मादाय रुग्णालयांची पहाणी करण्यात येत आहे. यामुळे सरकारला न जुमानणार्या रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला आळा बसणार आहे.