शिक्षणाचा बाजार थांबवा !
पूर्वीच्या काळी भारतात ठिकठिकाणी ऋषिमुनींची गुरुकुले होती. त्यामध्ये प्रत्येक मुलाची आवड, गुण आणि कौशल्य पाहून त्याला १४ विद्या अन् ६४ कला यांपैकी योग्य ते शिक्षण देत धर्माचरणाचे संस्कार रुजवले जायचे. त्यामुळेच भारतीय समाज सुखी आणि समृद्ध जीवन जगत होता. १८ व्या शतकापासून इंग्रजांनी भारतीय समाजाला नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांनी येथील शिक्षणपद्धतीत आमूलाग्र पालट केला. गुणकौशल्यावर आधारित ज्ञान देणारी गुरुकुल शिक्षणपद्धत बंद करून कारकून निर्माण करणार्या इंग्रजी शाळा चालू केल्या. त्यामध्ये पाश्चात्त्य पद्धतीने शिक्षण देणे चालू केल्यामुळे भारतीय संस्कृतीचा र्हास होऊ लागला. इंग्रजी माध्यमाच्या आणि ख्रिस्त्यांची शिकवण देणार्या शाळा निर्माण झाल्या. नंतरच्या काळात शिक्षणक्षेत्रात येथील शिक्षणसम्राटांनी पैसे मिळवण्याचा व्यवसाय चालू केला.
इंग्रजी शिक्षणाचे स्तोम अवास्तव वाढवले गेले. इंग्रजी शिक्षण घेणे, इंग्रजीतून बोलणे मोठेपणाचे वाटू लागले. त्यामुळे मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्यासाठी चढाओढ चालू झाली. शहरात मुलांच्या शिक्षणासाठी, रहाण्या-जेवणासाठी प्रतिमास गावातील पालक काबाडकष्ट करून, स्वतःचे पोट मारून पैसे पाठवू लागले. मुलांना शिक्षण घेतांना अनेक स्पर्धांना तोंड द्यावे लागते. मध्यम बुद्धीची मुले स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडू लागली. अल्प गुणांमुळे त्यांच्या पुढील शिक्षणाच्या संधी गमावल्या जाऊ लागल्या. आई-वडिलांनी इतका पैसा खर्च करून मुलगा अपेक्षित पैसे मिळवण्यास असमर्थ ठरला. मागील १५ वर्षांत चांगल्या दर्जेदार मराठी शाळांत जाणारी मुलेही तिथे जाणे बंद होऊन ती आंतरराष्ट्रीय किंवा इंग्रजी माध्यमांतील शाळेत जाऊ लागली. शिक्षणक्षेत्रात सरकारी शाळा १० टक्के कार्यरत राहिल्या. त्यातही मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू लागल्या. तेथे विद्यार्थ्यांची उपस्थिती तुरळक झाली.
शिक्षणाचा बाजार थांबवायचा असेल, तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा कह्यात घेऊन चांगल्या संस्थांकडून मातृभाषेमध्ये शिक्षण देणे चालू केले पाहिजे. लहानपणापासूनच मुलांवर भारतीय संस्कार करणे चालू केले पाहिजे. धर्माचरणाचे धडे त्यांच्याकडून गिरवून घेतले पाहिजेत. भ्रमणभाष आणि वाहिन्या यांच्या अती अन् चुकीच्या वापरापासून लहान मुलांना दूर ठेवले पाहिजे. मुलाची आवडनिवड पाहून त्याला त्या त्या क्षेत्रातील ज्ञान, व्यवसाय शिक्षण दिले पाहिजे. शिक्षणक्षेत्रात धर्म-जातींवरचे आरक्षण बंद करून गुणवत्तेच्या निकषावर सर्वांना सर्वत्र प्रवेश दिला पाहिजे. केवळ पैसा आणि स्पर्धा या उद्देशाने नव्हे, तर ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे. अनावश्यक खर्च टाळून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी, त्यांचे चांगले संगोपन करण्यासाठी वेळ दिला पाहिजे, तरच भारत पुन्हा ‘विश्वगुरु’ बनण्यात सक्षम होईल ! – श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.