परात्पर गुरु डॉक्टरांचा लाभलेला दिव्य सत्संग, त्यांनी करून घेतलेले विविध प्रयोग आणि त्यातून त्यांच्या अवतारत्वाची आलेली प्रचीती !
‘वर्ष १९९४ पासून मला परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला. या ३० वर्षांत विष्णुस्वरूप गुरुदेवांनी कधीही स्वतःतील देवत्व साधकांसमोर स्वीकारले नाही. ‘जे घडते, ते श्री गुरूंमुळे’, याच शिष्यभावात ते सतत असतात. परात्पर गुरु डॉक्टरांनी जरी त्यांचे अवतारत्व मान्य केले नाही, तरी सहस्रो जिवांना त्यांच्या संदर्भात अनुभूती आल्या आहेत आणि त्यांचे अवतारत्व सिद्ध झाले आहे. त्यांचे अवतारत्व वर्णन करणे हे शब्दांच्या पलीकडले आहे.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगात जाणवलेला त्यांचा महिमा, त्यांनी केलेले विविध प्रयोग आणि त्यांचा संकल्प अन् त्यांचे अस्तित्व यांमुळे आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. (भाग – १)
१. साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांमधील अवतारत्वाची प्रचीती येऊ लागणे आणि सूक्ष्म जगतातील काही अनिष्ट शक्तीही गुरुदेवांना शरण येऊन साधनेकडे वळू लागणे
परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारत्वाच्या संदर्भातील अनुभूती प्रथम सूक्ष्मातील जाणणार्या आणि आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांना येऊ लागल्या. काही अनिष्ट शक्ती गुरुदेवांना घाबरून पळून जात असत. काही त्यांना मान देत असत. काही शरण येत असत, तर काही गुरुदेव सांगतील, तशी सेवा आणि साधना करत असत. साम, दंड आणि भेद या नीती वापरून गुरुदेवांनी त्रास देणार्या शक्तींना साधना करण्यास उद्युक्त केले. कनवाळू गुरुदेवांनी अनिष्ट शक्तींना कधीच दुय्यम लेखले नाही. त्यांनी अनिष्ट शक्तींवरही प्रीतीच केली. ज्या अनिष्ट शक्तींची तपश्चर्या आणि साधना होती, त्यांना गुरुदेवांनी यथोचित आदर आणि सन्मान दिला.
२. परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व, संकल्प आणि त्यांनी केलेले नामजपादी उपाय यांचा अनिष्ट शक्तींवर प्रभावी परिणाम होणे; पण गुरुदेवांनी याचे कर्तेपण देवाला देणे
वर्ष २००० मध्ये मी आध्यात्मिक संशोधनाची सेवा करू लागले. मी तेथील साधकांना ‘गुरुदेवांचे अस्तित्व, संकल्प आणि त्यांनी केलेले नामजपादी उपाय यांचा अनिष्ट शक्तींवर कोणता परिणाम होतो ?’, हे सांगत असे. त्या वेळी गुरुदेव पुष्कळ हसत आणि ‘स्वतःच्या अस्तित्वाने असे काही होते’, हे ते स्वीकारत नसत. ते मला नेहमी म्हणत, ‘‘माझ्यामुळे काही होत नाही. देवच सर्व करतो.’’ त्या वेळी मीही एखाद्या बालकाप्रमाणे हट्ट करत असे की, तुमच्यामुळेच हे झाले आहे. मी त्यांना वर्षभर हे सातत्याने सांगत होते.
३. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘नामजपादी उपायांचा आध्यात्मिक त्रास असलेले साधक आणि गुरुदेवांनी वापरलेल्या वस्तू अन् वास्तू यांवर काय परिणाम होतो ?’, यांच्या नोंदी ठेवण्यास सांगणे
त्यानंतर जवळ जवळ एक वर्षाने तो स्वर्णिम दिवस उगवला. एक दिवस परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘त्यांनी केलेल्या नामजपादी उपायांचा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर कोणता परिणाम होतो ? गुरूंचे अस्तित्व आणि संकल्प यांचा त्या साधकांच्या शरिराच्या ऐच्छिक आणि अनैच्छिक हालचाली यांवर, तसेच गुरुदेवांनी वापरलेल्या वस्तू आणि वास्तू यांवर काय परिणाम होतो ?’, यांच्या वेळोवेळी नोंदी ठेवायला सांगितल्या. ते म्हणाले, ‘‘हे आपल्यासाठी नाही, तर समाजातील व्यक्ती आणि येणार्या पिढ्या यांच्यासाठी आवश्यक आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी आपण हे संशोधन करत आहोत.’’ (क्रमशः)
– सौ. मंगला पांडुरंग मराठे, फोंडा, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |