एका शिबिराच्या वेळी साधिकेने अनुभवलेली गुरुकृपा !
‘२ ते ५.८.२०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात शिबिर झाले. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. साधिकेच्या मनात ताणाचे विचार असतांना वहीमध्ये दैवी कण दिसणे आणि भावजागृती होऊन मनातील ताणाचे विचार दूर होणे
‘२.८.२०२३ या दिवशी शिबिर चालू असतांना एका विषयासंदर्भात माझ्या मनावर ताण आला होता. त्यासंदर्भात माझ्या मनात विचार चालू होते. त्या वेळी माझे मन ५ मिनिटे अस्थिर झाले. शिबिर चालू असतांना एका विषयातील सूत्र माझ्या वहीत लिहून घेतांना मला वहीच्या पानावर २ दैवी कण दिसले. ते कण पाहून मला गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची) आठवण आली आणि माझी भावजागृती झाली. त्यानंतर लगेचच माझ्या मनातील ताणाचे विचार दूर झाले. त्यानंतर शिबिरातील पूर्ण सत्रामध्ये मला आनंद जाणवला.
२. ‘प.पू. गुरुदेव’, हा नामजप चालू होणे आणि कुणीतरी हाक मारल्याचा भास झाल्यावरही ‘गुरुदेव सतत समवेत आहेत’, असे जाणवणे
८.८.२०२३ या दिवशी शििबरामध्ये महाप्रसाद ग्रहण करत असतांना मला ‘पाठीमागून कुणीतरी हाक मारली आहे’, असा भास झाला. मला असा भास होण्याच्या ५ मिनिटे आधी माझा ‘प.पू. गुरुदेव’, हा नामजप आपोआप चालू झाला होता. काही वेळा असा भास झाल्यावर मी दचकत असे; परंतु या वेळी माझा नामजप चालू होता. त्यामुळे ‘गुरुदेव माझ्या समवेत आहेत’, हा विचार माझ्या मनात सतत होता. त्यामुळे मी दचकले नाही.
३. गुरुदेवांचे स्मरण झाल्यामुळे विचित्र चेहरा दिसूनही त्याची भीती न वाटणे
शिबिरातील गटचर्चेच्या सत्रात प्रार्थना करण्यासाठी मी डोळे बंद केले. त्या वेळी मला विचित्र (भीतीदायक) चेहरा दिसला. अन्य वेळी असे कधी झाले, तर माझे मन अस्थिर होत असे. या वेळी लगेचच गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) स्मरण होऊन माझे मन एकाग्र झाले. गुरुदेवांच्या चैतन्याचे संरक्षककवच माझ्या भोवती सतत असल्यामुळे मला कोणताही त्रास झाला नाही.
‘गुरुकृपेमुळे मला हे सर्व अनुभवता आले’, त्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता.’
– कु. वैदेही मनोज खाडये (वय १७ वर्षे), कुडाळ, सिंधुदुर्ग. (४.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्या या कणांचे ‘भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात. |