पुणे येथे ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत !
|
पुणे – शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वहात आहेत. रात्रभर चालू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत अक्षरश: छातीपर्यंत पाणी भरले आहे. सिंहगड रस्त्यावरील अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत, तर १४ वर्षांनंतर प्रथमच नारायण पेठेत पाणी शिरले असून स्थानिक प्रशासन याकडे कुठलेही लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. साहाय्यता आणि बचाव कार्यासाठी एन्.डी.आर्.एफ्.ची २ पथके एकतानगरमध्ये आणि एक पथक बालेवाडी येथे तैनात करण्यात आले आहे. पुणे शहरातील डेक्कन, सिंहगड रोड, एकतानगर, पुलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. पुलाची वाडी आणि एकतानगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून २५ जुलैला पुण्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. सतत चालू असलेल्या पावसामुळे पुण्यात अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाला आहे, तर मुसळधार पावसात चौघांना जीव गमवावा लागला आहे. पुण्याला मोठ्या प्रमाणात पुराचा तडाखा बसला असून विजेचा धक्का लागल्याने ३ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील भिडे पुलाजवळ ही घटना घडली आहे.
नागरिकांच्या घरात अचानक शिरले पाणी !
पुण्यात गेल्या २४ घंट्यांत ३७० मि.मी. पाऊस पडला. डेक्कन रोड येथील पुलाची वाडी परिसरात असलेल्या वस्त्यांमध्ये मध्यरात्री ३ वाजता पाणी शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली. खडकवासला धरणातून ४० सहस्र क्युसेक वेगाने पाणी सोडणार असल्याची कोणतीही कल्पना स्थानिक रहिवाशांना देण्यात आलेली नव्हती, असा त्यांनी आरोप केला. त्यामुळे रहिवाशांची चांगलीच धावपळ झाली. एकतानगर, सिंहगडरोड येथील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शामसुंदर या वसाहतींच्या वाहनतळांमध्ये पाणी शिरले आहे.
नदीपात्राजवळ रहाणार्या रहिवाशांची घरे अवघ्या काही मिनिटांमध्ये पाण्याने भरून गेली. पूर्वकल्पना देण्यात न आल्याने नागरिकांना घरात असलेले सामान वाचवण्यास वेळच मिळाला नाही. घरातील भांडी, अन्य वस्तू पाण्यावर तरंगू लागल्या. त्या वाहून जाऊ नये म्हणून अनेक जण दाराला कुलूप लावून घराबाहेर आले. अनेकांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, महत्त्वाची कागदपत्रे पाण्यात भिजल्याने मोठी हानी झाली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवडमध्ये पावसाने थैमान घातले आहे. पुण्यातील शाळांना सुटी घोषित करण्यात आली आहे.
पुण्यात एकतानगर परिसरात नौकेद्वारे बचावकार्य चालू !
पुण्यातील एकता नगर परिसरात छातीपर्यंत पाणी साचले आहे. पुण्यात एकतानगर परिसरात छोट्या नौकेद्वारे बचावकार्य चालू करण्यात आले आहे. परिसरात पाण्याची पातळी वाढत चालली आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने नौकेद्वारे बचावकार्य करण्याच्या प्रयत्नात अडथळे निर्माण झाले आहेत. शेकडो लोक एकतानगर भागात अडकले आहेत. अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठीचे प्रयत्न चालू आहेत. अनेक घरांत पाणी घुसल्याने अनेकांचे सामान पाण्यासोबत वाहून गेले आहे.
भिडे पूल, टिळक पूल पाण्याखाली !
२४ जुलैला रात्री भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. टिळक पूलही पाण्याखाली गेला आहे. गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्तीत पाणी शिरले आहे. संगम पुलासमोरील वस्तीत पाणी गेले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांचे अधिकार्यांना रस्त्यावर उतरण्याचे आदेश !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व अधिकार्यांना रस्त्यावर (फिल्डवर) उतरण्याचे आदेश दिले आहेत, तसेच सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. यासह पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, एन्.डी.आर्.एफ्. आणि सैन्याचे कर्नल यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्यांना नागरिकांना साहाय्य करण्याचे आवाहन केले आहे, तसेच वेळ पडल्यास बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरचे साहाय्य घेतले जाईल, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यासोबतच नागरिकांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी पुण्याच्या जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
अजित पवारांनी घेतला आढावा !
पुणे शहर आणि जिल्ह्यातील अतीवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अन् पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणेला बचाव अन् साहाय्य कार्यासाठी सतर्क रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुळशीत पावसाचा हाहा:कार; ताम्हिणी घाट वाहतुकीसाठी बंद !
मुळशी धरण परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून मुळशी धरण जलाशय सकाळी ७ वाजता ७० टक्के क्षमतेने भरले असून २५ जुलैला दुपारी २ वाजता धरणाच्या सांडव्यावरून २ सहस्र ५०० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. मुळशीतील ताम्हिणी घाट, मुळशी धरण परिसर, लवासा, मुठा खोरे, कोळवण खोरे, रिहे खोरे, भादस खोरे सर्वच भागांत पावसाचा रात्रभर जोर चालू आहे. आदरवाडी (ताम्हिणी) येथील ‘पिकनिक पॉईंट हॉटेल’वर दरड कोसळली असून त्यामध्ये २ व्यक्ती हॉटेल खाली दबले होते. त्यांना पोलिसांनी आणि तेथील लोकांनी बाहेर काढून पुणे येथे रुग्णालयामध्ये पाठवले असून त्यामधील शिवाजी बहिरट यांचा मृत्यू झाला आहे.