Opposition Demands Discussion Against Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरील घोटाळ्यांच्या आरोपाप्रकरणी विधानसभेत चर्चेची विरोधकांची मागणी !
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर ‘म्हैसुरू अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (मुडा) घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. या ‘मुडा’ घोटाळा प्रकरणी विधानसभेत चर्चा करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली आहे. या सूत्रावरून भाजप आणि ‘जेडीएस्’ या पक्षांच्या आमदारांनी विधानसभेत रात्रभर धरणे आंदोलन केले.
१. ‘मुडा’ घोटाळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य यांची नावे असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
२. चर्चेची अनुमती न मिळाल्याने विरोधकांनी काँग्रेस सरकार, मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या विरोधात घोषणा देत आंदोलन केले.
३. या प्रकरणाच्या तपासात अनियमितता असल्याचा आरोपही विरोधकांनी केला.
मुख्यमंत्र्यांसह ९ जणांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !
यापूर्वी ‘मुडा’कडून हानीभरपाईसाठी बनावट कागदपत्रे सिद्ध केल्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतर ९ जण यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्त्या स्नेहमोयी कृष्णा यांनी सिद्धरामय्या, त्यांची पत्नी पार्वती, मेहुणा मल्लिकार्जुन स्वामी, जमीनदार देवराज आणि इतर ६ जण यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट केली आहे.