मुंबई, ठाणे आणि रायगड येथे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत !
|
मुंबई – येथे २४ जुलैच्या रात्रीपासून कोसळणार्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. परिसरात ६ ते ७ फूट पाणी साचल्यामुळे अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सागरी किनारा रस्त्यावर अपघात झाल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली होती. ठिकठिकाणी वाहने आणि बस बंद पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले.
१. ठाणे, कल्याण, डोंबिवली उल्हासनगर, अंबरनाथ या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत होता. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ (धोकादायक परिस्थितीची चेतावणी) दिला आहे. मुंबईभोवती पाणीच पाणी साचले आहे. मिठी आणि उल्हास नद्या दुथडी भरून वहात असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
२. कल्याण रेल्वेस्थानकाजवळील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कपोते वाहन तळासमोर गुडघाभर पाणी साचले होते. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
३. मुंबईतील लोकलगाड्यांवरही पावसाचा परिणाम झाल्याने बर्याच गाड्या विलंबाने धावत होत्या.
४. पालघर जिल्ह्यातील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सुटी घोषित केली होती.
५. कळवा, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, शहापूर या परिसरातही पाऊस पडला.
६. नागोठणे शहरातील आंबा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली. या परिसरातील संपूर्ण भातशेती पाण्याखाली गेली.
७. बदलापूर – वांगणी या परिसरात पाणी वाढण्याची शक्यता असल्याने बर्याचशा एक्सप्रेस रहित करण्यात आल्या आहेत.
८. रोहा येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडे पाणीच पाणी साठले आहे. नागरिकांची पुष्कळ हानी झाली असून नागरिक घराबाहेर पडू शकत नव्हते.
मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली !
मुंबईला पाणीपुरवठा करणार्या सातपैकी तुळशी, तानसा आणि विहार ही धरणे ओसंडून वहात आहेत. सध्या पाणीसाठा ६६.७७ टक्क्यांवर पोचला आहे. मुंबईकरांना पुढील २४१ दिवस म्हणजेच मार्च २०२५ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध आहे. मोडक सागर धरणही ९८ टक्के भरले आहे.