Russia Recruit Soldiers : रशियामध्ये सैन्यात भरती होण्यासाठी तेथील सरकार नागरिकांना देत आहे विविध सवलती !
वॉशिंग्टन – रशिया-युक्रेन युद्ध चालू होऊन अडीच वर्षे झाली आहेत. अमेरिकेतील वृत्तवाहिनी सी.एन्.एन्.ने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाला सैनिकांची कमतरता भासत आहे. त्यामुळे अधिकाधिक रशियन लोकांनी सैन्यात भरती व्हावे, यासाठी रशिया सरकारने नागरिकांना वेगवेगळ्या सवलती दिल्या आहेत. रशिया सरकारने सादर केलेल्या एका नवीन प्रस्तावानुसार, एखाद्या नागरिकाने सैन्यात भरती होण्याची इच्छा व्यक्त केल्यास, तो भरती होण्यापूर्वीच त्याला १८ लाख रुपये दिले जाणार आहेत.
१. या वृत्तानुसार, मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी निवेदन प्रसारित केले असून शहराच्या रहिवाशांना सैन्यात भरती होण्यासाठी १.९ दशलक्ष रूबल (अंदाजे १८ लाख ४१ सहस्र ६९७ रुपये) देण्याचे घोषित केले आहे.
२. रशियाच्या सैन्यात भरती झाल्यानंतर सैनिकांना पहिल्या वर्षी एकूण ४९ लाख रुपये पगार देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
३. एवढेच नाही, तर युद्धात घायाळ झाल्यास त्याच्या उपचारांसाठी ४ ते ९ लाख रुपये रोख दिले जाणार आहेत. युद्धात लढतांना सैनिक हुतात्मा झाल्यास त्याच्या कुटुंबाला २८ लाख रुपये दिले जाणार आहेत.
४. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने १२ जुलै या दिवशी सांगितले होते की, या वर्षी मे ते जून या कालावधीत युक्रेन युद्धात रशियाचे ७० सहस्रांहून अधिक सैनिक मारले गेले आहेत, तर अनेक जण घायाळ झाले आहेत.
रशियाला भेडसावत आहे सैनिकांचा तुटवडा !
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी डिसेंबर २०२३ मध्ये ‘देशाच्या सैन्यात १ लाख ७० सहस्र सैनिक वाढवायचे आहेत’, असे सांगितले होते. रशियाला सैन्यात २२ लाखांहून अधिक सक्रीय सैनिक हवे आहेत. युक्रेनसमवेतच्या युद्धानंतर रशियाने त्याच्या सैन्यात १५ टक्के सैनिकांची भरती केली. आता सैन्य दलाचा विस्तार करण्याचा हा दुसरा मोठा टप्पा आहे. यासाठी रशिया मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. या अंतर्गत रशियाने १५ सहस्र नेपाळींची भरती केली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका नेपाळी सैनिकाने सांगितले की, सध्या अफगाणिस्तान, भारत, काँगो आणि इजिप्त देशांतील सैनिक रशियन सैन्यात प्रशिक्षण घेत आहेत.