Benjamin Netanyahu : गाझा कह्यात घेण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही ! – पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू
अमेरिकेच्या संसदेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची स्पष्टोक्ती !
वॉशिंग्टन (अमेरिका) – ज्या दिवशी आम्ही हमासचा पराभव करूए त्या दिवशी गाझामध्ये एक नवी पहाट उगवेल. विजयानंतरही आम्ही गाझावर काही काळ नियंत्रण ठेवू, जेणेकरून ही भूमी पुन्हा इस्रायलसाठी धोका निर्माण ठरू नये. आमची एकच मागणी आहे की, युद्ध संपल्यानंतर गाझामध्ये जे सरकार असेल, त्याने पुन्हा इस्रायलला हानी पोचवण्याचा प्रयत्नही करू नये. गाझा कह्यात घेण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही, अशी स्पष्टोक्ती इस्रायलचे पंतप्रधान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी २४ जुलै या दिवशी अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतांना केली. या वेळी ‘टेस्ला’ आस्थापनाचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) हेदेखील पाहुणे म्हणून उपस्थित होते.
१. नेतन्याहू पुढे म्हणाले की, इस्रायलचे युद्ध हे रानटीपणा आणि संस्कृती यांच्यातील लढाई आहे. एका बाजूला मृत्यूची पूजा करणारे लोक आहेत, तर दुसर्या बाजूला जीवनाला पवित्र मानणारे लोक आहेत. या लढाईत अमेरिका आणि इस्रायल यांनी एकत्र उभे रहाण्याची आवश्यकता आहे.
२. नेतन्याहू यांनी या वेळी इराणवरही टीका केली. ते म्हणाले की, जेव्हा आपण इराणशी लढतो, तेव्हा आपण एका खुनी देशाविरुद्ध उभे असतो. तो अमेरिकेचा सर्वांत मोठा शत्रू आहे. आम्ही केवळ आमचेच (इस्रायलचे) नाही, तर तुमचे (अमेरिकेचे) रक्षण करत आहोत. आम्ही मध्य-पूर्वेतील अरब देश यांचेही रक्षण करत आहोत. इस्रायलचा लढा हा अमेरिकेचा लढा आहे आणि इस्रायलचा विजय हा अमेरिकेचा विजय असेल. इराणला विश्वास आहे की, जर अमेरिकेला कमकुवत करायचे असेल, तर त्याला मध्य-पूर्व जिंकावे लागेल; पण इस्रायल हे मध्य-पूर्वेच्या मध्यभागी वसलेले आहे, जे इराणचे मनसुबे वारंवार हाणून पाडते. जेव्हा इस्रायल आणि अमेरिका एकत्र उभे रहातात, तेव्हा आपण जिंकतो आणि शत्रू हरतो.