Islamic Centre Hamburg : जर्मनीमध्ये ‘इस्लामिक सेंटर हॅम्बर्ग’ आणि त्याच्याशी संलग्न संघटन यांच्यावर बंदी !

ब्लू मशीद

हॅम्बर्ग (जर्मनी) – जर्मनीने ‘इस्लामिक सेंटर हॅम्बर्ग’ आणि त्याच्याशी संलग्न संघटन यांच्यावर बंदी घातली आहे. जर्मनीच्या गृहमंत्रालयाने सांगितले, ‘या संघटना कट्टर इस्लामी विचारसरणीला प्रोत्साहन देतात.’ गृहमंत्री नॅन्सी फेसर म्हणाल्या की, आज आम्ही जर्मनीमध्ये कट्टर इस्लामी विचारसरणीला प्रोत्साहन देणार्‍या ‘इस्लामिक सेंटर हॅम्बर्ग’वर बंदी घातली आहे. ही कट्टरपंथी विचारधारा मानवी प्रतिष्ठा, महिलांचे अधिकार, मुक्त समाज आणि न्यायव्यवस्था यांच्या विरोधात आहे.

‘इस्लामिक सेंटर हॅम्बर्ग’ ही संघटना वर्ष १९५३ मध्ये इराणमधील स्थलांतरितांनी स्थापन केली होती आणि जर्मनीच्या शिया मुसलमानांंमध्ये इराणी सरकारचे धोरण रेटत असल्याचा आणि शिया आतंकवादी संघटना ‘हिजबुल्ला’ हिला पाठिंबा देत असल्याचा आरोप तिच्यावर आहे. या संघटनेत किती सभासद किंवा समर्थक आहेत ?, याची निश्‍चित संख्या उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

ही संघटना हॅम्बर्गमधील ‘इमाम अली’ मशीद चालवते. ही जर्मनीतील सर्वांत जुन्या मशिदींपैकी एक आहे. ही मशीद तिच्या नीलमणी रंगाच्या बाहेरील भिंतींसाठी प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच तिला ‘ब्लू मशीद’ म्हणूनही ओळखले जाते. आता या मशिदीसह इतर ४ शिया मशिदी बंद करण्यात येणार आहेत. याखेरीज फ्रँकफर्ट, म्युनिक आणि बर्लिन येथही या संघटनेची संबंधित गटांवर बंदी घालण्यात आली आहे.

‘इस्लामिक सेंटर हॅम्बर्ग’च्या ५३ ठिकाणांवर घातल्या धाडी !

गृह मंत्रालयाने सांगितले की, २४ जुलैला सकाळीच न्यायालयाच्या आदेशानुसार जर्मनीच्या ८ राज्यांमधील इस्लामिक सेंटर हॅम्बर्गशी संबंधित ५३ ठिकाणांवर धाडी घालण्यात आल्या. या संघटनेवरील बंदी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केलेल्या ५५ मालमत्तांच्या शोधानंतर सापडलेल्या पुराव्यांवर आधारित आहे.‘इस्लामिक सेंटर हॅम्बर्ग’ ही संघटना इराणच्या सर्वोच्च नेत्याचे प्यादे म्हणून काम करते आणि जर्मनीमध्ये इस्लामी क्रांती घडवून आणू इच्छिते, त्याद्वारे धार्मिक शासन स्थापन करू इच्छितेे.

संपादकीय भूमिका

युरोपमध्येही जिहादी संघटनांनी प्रस्थ निर्माण केले आहे. त्याचे परिणाम फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, स्पेन आदी देशांमध्ये दिसू लागले आहेत. भविष्यात काश्मीरसारखी स्थिती या देशांमध्ये येणार आहे, हे स्पष्ट दिसत आहे. काश्मीरच्या हिंदूंविषयी सहानुभूती व्यक्त न करणार्‍या या देशांना नियतीने दिलेली ही शिक्षा असेल !