पुणे येथे मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत !
पूर्वकल्पना न मिळाल्याने खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने नागरिकांच्या सामानाची अपरिमित हानी !
पुणे – जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस चालू आहे. गेल्या २४ तासांत ३७० मि.मी. पाऊस पडला. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. वसाहती, वस्त्या यांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची हानी झाली आहे. घरातील सामान पाण्यावर तरंगत असल्याने दयनीय स्थिती झाली आहे. खडकवासला धरणातूनही पाणी सोडण्यात येत आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवडमध्ये पावसोथैमान घातले आहे. पुण्यातील शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. पुढील काही घंटे मुसळधार पाऊस कायम राहण्याची चेतावणी दिली आहे.
नागरिकांच्या घरात अचानक शिरले पाणी !
डेक्कन रोड येथील पुलाची वाडी परिसरात असलेल्या वस्त्यांमध्ये रात्री ३ वाजता पाणी शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली. खडकवासला धरणातून ४० सहस्र क्युसेक वेगाने पाणी सोडणार असल्याची कोणतीही कल्पना स्थानिक रहिवाशांना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे रहिवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. एकतानगर, सिंहगडरोड येथील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शामसुंदर या वसाहतींच्या वाहनतळामध्ये पाणी शिरले आहे.
नदीपात्राजवळ रहाणार्या रहिवाशाची घरे अवघ्या काही मिनिटांमध्ये पाण्याने भरून गेली. पूर्वकल्पना देण्यात न आल्याने नागरिकांना घरात असलेले सामान वाचवण्यास वेळच मिळाला नाही. घरातील भांडी, अन्य वस्तू पाण्यावर तरंगू लागल्या. त्या वाहून जाऊ नये म्हणून अनेक जण दाराला कुलूप लावून घराबाहेर आले. अनेकांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, महत्त्वाची कागदपत्रे पाण्यात भिजल्याने मोठी हानी झाली आहे.
मुळा-मुठावरील जुना पूल पाण्याखाली !
आदरवाडी गाव परिसरात डोंगराचा कडा ‘हार्ड रॉक’पासून तुटून थेट रस्त्यापर्यंत आला आहे. रस्ता ते डोंगर यामधील अंतर अंदाजे ५०० मीटर आहे. १० ते १२ फूट उंचीचा मातीचा स्तर रस्त्यापर्यंत आला आहे. रस्ता मोकळा करण्यासाठी किमान ५-६ घंटे तरी लागतील. मांजरी खुर्द येथील मुळा मुठा नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेला आहे.
पुण्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा !
१. एन्.डी.आर्.एफ.्ला (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक) पाचारण करण्यात आले असून, बोटीही बचाव कार्यासाठी आल्या आहेत.
२. घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
३. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची जिल्हाधिकार्यांशी चर्चा झाली असून साहाय्य कार्याला गती देण्याचे, तसेच नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
४. पाणी असलेल्या सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्याचा सूचना करण्यात आल्या आहेत.
५. पावसाचा जोर लक्षात घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये आणि इतर आस्थापनांना सुटी देण्याचे जिल्हाधिकार्यांनी निर्देश दिले आहेत.
६. पुणे महानगरपालिकेच्या ८ बोटी आणि बचाव पथक मदातकार्यासाठी नियुक्त करण्यात आल्या आहेत.
७. विद्युत धक्का लागल्याने नदीपात्रात स्टॉल्स काढण्यासाठी गेलेल्या ३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
८. पुरात अडकलेल्या नागरिकांना खाद्यपदार्थ आणि पिण्याच्या पाणी देण्याच्या जिल्हाधिकार्यांनी सूचना दिल्या आहेत.
९. मुसळधार पावसामुळे २६ जुलैला निगडी येथे होणारी ‘फळे आणि भाजीपाला निर्यात परिषद’ पुढे ढकलण्यात आली आहे.