जगासमोरील समस्या आणि काळाच्या पार्श्वभूमीवर हिंदु धर्म अन् हिंदु राष्ट्र यांचे महत्त्व !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, गोव्यातील हिंदूंचा धार्मिक छळ करणार्या सेंट झेवियरने ब्राह्मणांवर केलेली टीका, हिंदुस्थान आणि राजसत्ता, हिंदु-मुस्लिम ऐक्य हे गांधींच्या जीवनाचे साध्य होते, गांधी आणि बॅ. जीना यांच्या विचारांचे सार, अखंड भारतातील द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आजही देशाला भोवणे अन् स्वाभिमानी सत्तेने देशावर राज्य केल्यास काय झाले असते ?, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदुत्वाचा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(लेखांक २४)
या आधीचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक का : https://sanatanprabhat.org/marathi/816470.html
प्रकरण ४
१. भारतीय जनता पक्ष हा हिंदूंसाठी आशेचा किरण !
भारताचे राष्ट्रजीवन आज अधांतरी आहे. स्वत्वहीन, स्वाभिमानशून्य, इतिहासातून शहाणपण न शिकलेला आणि परधार्जिणेपणा हाच राष्ट्रीय मोठेपणा समजणारा, गेल्या ६० वर्षांचा अत्यंत महत्त्वाचा कालखंड या देशाचे राष्ट्रीय जीवन कायमचे भ्रष्ट करून टाकणारा ठरला आहे. तथापि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेला भारतीय जनता पक्ष हा हिंदूंसाठी आशेचा किरण आहे. राजकारणासाठी आपल्या विचारप्रणालीत हिंदु राष्ट्र जरी त्याने उद्घोषिले नसले, तरी ते त्याचे निश्चितपणे साध्य आहे आणि तसे खरोखर नसेल, तर त्याची काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही.
२. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे धाडस दाखवणारा नेता आज हिंदुस्थानात नाही !
महाराष्ट्रात हिंदुतेजाचा जळजळीत निखारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने भडकलेला आहे. त्यांनी हिंदुतेज प्रज्वलित केले आहे. रामजन्मभूमी प्रकरणानंतर मुंबईत जी दंगल उसळली, त्या वेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नसती, तर जातीयवादी मुसलमानांनी संपूर्ण मुंबई जाळून टाकली असती. त्यांना ठाकरेप्रणीत शिवसैनिकांनी ‘ठोशास ठोसा’, या न्यायाने अशी जरब बसवली की, युती सरकारच्या राज्यात मुसलमान जातीयवाद डोके वर काढू शकला नाही, हे सत्यच आहे. श्रीकृष्ण आयोग जर त्यांना दोष देत असेल, तर देवो; पण असे धाडस दाखवणारा नेता आज हिंदुस्थानात दुसरा कोण आहे ?
३. देशातील अनेक समस्या
संपूर्ण देशात अनेक समस्या गंभीर स्वरूप धारण करून बसल्या आहेत.
अ. विरोधी पक्ष भिन्न भिन्न पक्षांचा असंघटित आहे.
आ. मोठमोठे गुन्हेगार आणि त्यांची गुन्हेगारी जगजाहीर असून त्यांना कुणीच शिक्षा करू शकत नाही, हा त्यांचा माज आहे.
इ. बंदी घातलेल्या ‘सिमी’सारख्या संघटना देशभर दहशत निर्माण करत आहेत.
ई. केंद्र सरकार मदरशांना कोट्यवधी रुपये देत आहे.
उ. स्वाभिमानी हिंदुत्वाची जागृती होत असली, तरी अजूनही हिंदू संघटित नाहीत.
ऊ. अन्य मुसलमान राष्ट्रे मुसलमानांसाठी वाटेल तेवढा पैसा ओतायला सिद्ध आहेत.
या सर्व गोष्टी एक प्रकारे गळू पिकल्याचे लक्षण आहे. चांगले पिकल्याविना गळू फुटत नाही अन् त्यातील घाणीचा निचरा होत नाही, त्याप्रमाणे हे गळू आता फुटण्याच्या जवळ आले आहे. (क्रमशः)
– भारताचार्य आणि धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)