सध्याच्या काळात हिदूंना संघटित करून दबावतंत्राचा वापर केला पाहिजे ! – भगवंत जांभळे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष, मनसे
सांगली, मिरज आणि तासगाव येथे भावपूर्ण अन् उत्साही वातावरणात ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ साजरा !
सांगली, २४ जुलै (वार्ता.) – सध्याचा काळ हा कोणत्याही माध्यमाद्वारे हिंदूंना विरोध करणे असा आहे. यासाठी हिंदूंनीही दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीनेच विरोध केला पाहिजे. ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदु मुलींचे बळजोरीने धर्मांतर केले जात आहे. ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी हिंदूंनी पीडित हिंदु तरुणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून रोखठोक भूमिका घेतली पाहिजे, तसेच हिंदूंना संघटित करून त्याद्वारे दबावतंत्राचा वापर केला पाहिजे, असे परखड मत मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंत जांभळे यांनी येथे व्यक्त केले. २१ जुलै या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने येथील खरे मंगल कार्यालय येथे आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘लव्ह जिहाद’ या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याचसमवेत सनातन संस्थेच्या वतीने सांगली जिल्ह्यातील मिरज आणि तासगाव येथे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. सांगली येथील सोहळ्याला २०० जिज्ञासूंची उपस्थिती होती.
या वेळी सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती मधुरा तोफखाने यांनीही उपस्थितांना संबोधित केले. या वेळी सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य श्री. दिलीपतात्या भोसले, माजी नगरसेवक श्री. लक्ष्मण नवलाई, उद्योजक श्री. अण्णासाहेब उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
सांगली, मिरज आणि तासगाव येथे महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. या ३ शहरांत झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांत ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात आले होते.
तासगाव – किर्लाेस्करवाडी, पलूस येथील सनातनचे साधक श्री. रमेश लुकतुके यांनी त्यांच्या साधनेतील प्रवासाविषयी माहिती दिली. या वेळी दैनिकाच्या वितरकांचा सत्कार करण्यात आला. सनातन संस्थेचे साधक श्री. राहुल कदम यांचे ‘आनंदप्राप्ती आणि रामराज्याची स्थापना’ या विषयावर मार्गदर्शन झाले. तासगाव आणि विटा येथील ३०१ जिज्ञासूंची सोहळ्याला उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवर : तासगाव तालुक्यातील उपळावी येथील सरपंच सौ. आशा राणी कदम, पलूस तालुक्यातील पुणदी गावाच्या सरपंच सौ. पूनम पाटील, निमणी गावाचे माजी सरपंच श्री. रवींद्र दादासो पाटील, विटा येथील प्रसिद्ध उद्योजक डॉ. शंकर बुधवानी, तासगाव तालुक्यातील सावर्डे येथील शिवसेना तालुकाप्रमुख श्री. प्रदीप माने पाटील आणि निमणी येथील सरपंच सौ. रेखा पाटील, किर्लाेस्करवाडी, पलूस येथील उद्योजक श्री. सुदर्शन खोत.
गुरु-शिष्य परंपरेच्या पुनरुज्जीवनासाठी भारत हिंदु राष्ट्र बनणे आवश्यक ! – दिगंबर कोरे, धर्माभिमानी उद्योजक
मिरज – धर्माधिष्ठित राज्यप्रणाली असली, तरच समाजामध्ये एकोपा, सामंजस्यादी दैवी गुणांचा विकास आणि आचरण होते. लोकांमध्ये धर्मप्रेम रुजवण्याचे कार्य गुरु (संत) करत असतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, समर्थ रामदासस्वामी आदी अनेक संत होऊन गेले, ज्यांनी त्यांच्या सात्त्विक वाणीने लोकांमध्ये धर्मप्रेम पर्यायाने राष्ट्रप्रेम जागृत केले. गुरु शिष्याच्या केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर त्याच्या व्यावहारिक उन्नतीचीही काळजी घेतात. त्यामुळे राष्ट्राची उभारणी करण्यासाठी गुरु-शिष्य परंपराच आवश्यक आहे. गुरु-शिष्य परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी भारत पुनःश्च हिंदु राष्ट्र बनणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन येथील धर्माभिमानी उद्योजक श्री. दिगंबर कोरे यांनी केले. सांगली रस्त्यावरील तुळूनाड भवन येथे सनातन संस्थेच्या वतीने २१ जुलै या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते.
सोहळ्यात सनातनचे गुणवंत साधक आणि वितरक यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला २०० जिज्ञासूंची उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवर…
बांधकाम व्यावसायिक आणि काशीविश्वेश्वर देवस्थानचे विश्वस्त श्री. किशोर पटवर्धन, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. माधवराव गाडगीळ, व्यापारी सेनेचे पंडित तात्या कराडे, जत येथील डॉ. सचिन वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.