रेल्वेद्वारे प्रवाशांसाठी ‘अपघात विमा संरक्षण’ योजना
जून मासात बंगालमध्ये झालेला रेल्वे अपघात पुष्कळच भीषण होता. ‘कांचनजुंगा एक्सप्रेस’ला मालगाडीने पाठून धडक दिली. साहाय्य आणि बचाव कार्य लगेच चालू झाले, या घटनेत ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात कसा झाला ? चूक मानवी होती कि तांत्रिक ? हे चौकशी पूर्ण झाल्यावर कळेलच.
मनुष्याच्या जीवाची तुलना किंवा भरपाई कशानेच करता येणार नाही. १४० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात मूठभर लोक आहेत की, ज्यांनी आपल्यासाठी ‘अपघात विमा संरक्षण’ घेतलेले आहे. आपल्याकडे आर्थिक विषमता इतकी आहे की, विम्यासारख्या आवश्यक गोष्टीलाही पैसे भरणे कित्येकांना शक्य होत नाही, तर काही सुशिक्षित आणि सक्षम लोकांच्या उदासीनतेमुळे हा महत्त्वाचा विषय बर्याच वेळा दुर्लक्षित रहातो; पण घरातील कमावती व्यक्ती अपघाताने अचानक गेली किंवा अपंग होऊन जागेवर बसली, तर त्या घराची आर्थिक स्थिती एकदम गंभीर होते. कुठलाही विमा नसेल, तर अशा व्यक्तीचा वैद्यकीय आणि घरातील प्रतिदिनचे व्यय चालवणे कठीण होऊन बसते.
१. अपघात विमा संरक्षणामध्ये विमा कंपनीकडून मिळणारे पर्याय
रेल्वे प्रवाशांना अपघात विमा संरक्षण मिळावे; म्हणून भारतीय रेल्वेने नाममात्र दरात एक चांगली विमा योजना प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे. रेल्वे प्रवासाचे ऑनलाईन तिकीट काढतांना ‘अपघाती विमा संरक्षण’ निवडायचा पर्याय दिलेला असतो. बरेच प्रवासी या पर्यायाकडे दुर्लक्ष करतात. प्रति प्रवासी फक्त ४५ पैसे या विम्यासाठी आकारले जातात आणि त्या मोबदल्यात प्रवासाच्या कालावधीत अपघात झाला, तर विमा कंपनीकडून पुढील संरक्षण दिले जाते –
अ. अपघाती मृत्यू : १० लाख रुपये
आ. कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व : १० लाख
इ. कायमचे आंशिक अपंगत्व : ७ लाख ५० सहस्र रुपयांपर्यंत
ई. घायाळ व्यक्तींना वैद्यकीय व्ययासाठी : २ लाख रुपयांपर्यंत
उ. मृतदेह परत आणण्यासाठी व्यय : १० सहस्र रुपयांपर्यंत
२. ‘अपघात विमा संरक्षणा’चा विमा काढल्यावर नामनिर्देशित व्यक्तीला माहिती देणे महत्त्वाचे !
ऑनलाईन तिकीट काढतांना विम्याचा हा पर्याय निवडला असेल, तर प्रति प्रवासी ४५ पैसे आपल्या एकूण प्रवासी भाड्यात जोडले जातात आणि तिकिट काढून झाले की, जो इ-मेल (संगणकीय) पत्ता वापरून तिकीट काढले गेले, त्या इ-मेलवर विमा कंपनीचा मेल येतो. तिथे जाऊन आपल्या नातेवाईकाला नामनिर्देशित व्यक्ती (नॉमिनी) म्हणून नोंदवण्याचा पर्याय येतो. हे नामनिर्देशन करणे पुष्कळ आवश्यक आहे. काही कारणास्तव जर विमा कंपनीकडे दावा करायचा झाल्यास नामनिर्देशन झाले असेल, तर विमा कंपनीला दाव्याची प्रक्रिया सुलभरित्या पूर्ण करता येते. हे नामनिर्देशन करतांना ज्या नातेवाईकाला आपल्याला नामनिर्देशित करायचे आहे, त्याचे नाव, वय, संपर्क क्रमांक, इ-मेल पत्ता आणि आपल्याशी असलेले त्याचे नाते ही माहिती द्यावी लागते. यासह या इ-मेलमध्ये ‘अपघात विमा संरक्षण’ या विम्याची माहिती, या योजनेत काय अंतर्भूत आहे ? आणि काय अंतर्भूत नाही ? याविषयीची सगळी माहिती दिलेली असते. प्रवास चालू करण्यापूर्वी ही माहिती आपल्या नामनिर्देशित व्यक्तीजवळ देणे, ही स्वतःच्या प्रवास नियोजनातील महत्त्वाची गोष्ट आहे.
३. सरकारने दिलेल्या ‘अपघात विमा संरक्षणा’चा लाभ घेणे आवश्यक !
आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांकडे ‘अपघात विमा संरक्षण’ आणि वैद्यकीय व्ययासाठी ‘आरोग्य विमा’ असणे आवश्यक आहे; पण ज्यांना हे संरक्षण विकत घेणे शक्य नाही, ते किमान रेल्वे प्रवासाच्या कालावधीत सरकारने देऊ केलेल्या या अपघात विमा संरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. सगळेच अपघात पूर्णपणे टाळता येणे शक्य नसते, अशा वेळी त्यातील जोखमीचे व्यवस्थापन करून त्याची तीव्रता न्यून करण्यासाठी उपलब्ध पर्याय वापरणे आवश्यक आहे.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– श्री. अनिकेत विलास शेटे, प्रमाणित आर्थिक सल्लागार, चिंचवड, जिल्हा पुणे.