सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करून स्वतःत पालट घडवून आणणारे सांगली येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दत्तात्रय कुलकर्णी (वय ८० वर्षे) !

आषाढ कृ. पंचमी (२५.७.२०२४) या दिवशी सांगली येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांचा ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांना ८० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

श्री. दत्तात्रेय कुलकर्णी

१.  सौ. सुलभा दत्तात्रय कुलकर्णी (श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांची पत्नी), आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ७४ वर्षे), गावभाग, सांगली.

सौ. सुलभा दत्तात्रय कुलकर्णी

१ अ. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्याने झालेले पालट : ‘आज मी जीवनाकडे मागे वळून पहातांना माझ्या डोळ्यांसमोर अनेक आठवणी येत आहेत. वर्ष १९७५ मध्ये आमचा विवाह झाला. पूर्वी श्री. कुलकर्णी यांच्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे घरात अनेक अडचणींचे प्रसंग घडत असत. त्यामुळे  घरातील वातावरण बिघडत असे. आमच्या दोघांतील संघर्ष आणि मतभेद यांमुळे मुलींवरही ते संस्कार होत राहिले. यजमानांच्या भरकटलेल्या मनाला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनीच चांगल्या वळणावर आणले. वर्ष १९९७ मध्ये सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यामुळे हळूहळू त्यांच्यात पालट होऊ लागले.

१ आ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने स्वभावात पालट होणे : श्री. कुलकर्णी यांनी सत्संगाला जाणे, सत्सेवा करणे आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे हे सर्व करण्यास (म्हणजे साधनेस) आरंभ केल्यामुळे त्यांच्यात पालट होऊन घरातील वातावरणात सुधारणा होऊ लागली. सत्संग आणि आढावा यांमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांचा कृती करण्याचा प्रयत्न होऊ लागला. वर्ष २०१८ मध्ये गुरुदेवांनी श्री. कुलकर्णी यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करून त्यांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केले. तेव्हापासून त्यांनी जोमाने व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न चालू केले. त्यामुळे माझ्याही व्यष्टी साधनेची घडी नीट बसण्यास साहाय्य झाले. आता त्यांनी सत्संग आणि आढावा यांमध्ये सांगितलेली सूत्रे गुणात्मक होण्यासाठी मागील २ – ३ मासांपासून प्रयत्न चालू केले आहेत. त्यांनी निरनिराळे भावप्रयोग करून आठवड्याला भावजागृतीचे एक सूत्र आणि गुणवृद्धीसाठी २ गुण घेऊन त्यांवरच प्रयत्न करण्याचे ध्येय ठरवले. त्यासाठी ते नियमित स्वयंसूचना देऊ लागले. स्वतःमधील दोष शोधू लागले. त्यामुळे त्यांचे गुण वाढून दोष अल्प व्हायला साहाय्य होऊ लागले.

१ इ. कृतीच्या स्तरावर प्रयत्न केल्याने झालेले पालट : त्यांच्यामध्ये ‘उतावळेपणा, रागीटपणा, कर्तेपणा, मनाप्रमाणे व्हावे, इतरांचा विचार नसणे’, हे स्वभावदोष आणि अहंचे पैलू प्रबळ होते. त्यांनी या दोषांवर सूचना देऊन कृतीच्या स्तरावर प्रयत्न केल्यामुळे आता त्यांच्यात चांगले पालट झाल्याचे जाणवत आहे.

केवळ गुरुदेवांच्या कृपेने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया, गुणसंवर्धन आणि आज्ञापालन यांमुळे त्यांच्यात पालट दिसू लागले आहेत.

१ ई. त्यांच्यातील सकारात्मकता वाढत असून त्यांच्या चेहर्‍यावर तेज आणि चैतन्य जाणवत आहे.

१ उ.‘श्री. कुलकर्णीकाका आनंदी आहेत’, असे पू. दीपाली मतकर यांनी सांगणे : अलीकडेच त्यांना सांगली येथे पू. दीपालीताई (पू. दीपाली मतकर, सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संत, वय ३५ वर्षे) यांच्या सत्संगाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. पू. दीपालीताईंनी सांगितले, ‘‘काका आनंदी दिसत आहेत. त्यांची तळमळ आणि श्रद्धा यांमुळेच ते विपरित प्रसंगांतही स्थिर आहेत’, असे जाणवत आहे.’’ खरेतर गुरुमाऊलीनेच त्यांना आजपर्यंत सांभाळले. ‘असेच यापुढेही गुरुमाऊलीने त्यांना सांभाळावे आणि आपल्या चरणांजवळ घ्यावे’, अशी शरणागतभावाने आर्त प्रार्थना !’

२. सौ. कविता बेलसरे (श्री. कुलकर्णी यांची मोठी मुलगी), कुडाळ

२ अ. प्रसंगांचा दीर्घकाळ रहाणारा परिणाम अल्प होणे : ‘पूर्वी बाबांवर कुठल्याही प्रसंगाचा दीर्घकाळ परिणाम जाणवायचा. लहानसहान प्रसंगात त्यांचे मन अस्थिर होऊन त्यांना ताण यायचा. अलीकडे मात्र ते प्रत्येक प्रसंगात स्थिर रहातात.

२ आ. दत्तात्रय नावाचा जाणवलेला अर्थ

द : ‘देवाच्या अनुसंधानात सतत रहाणारे

त्ता : तळमळीने गुरुकार्य करणारे

त्र : त्रासांवर मात करून प्रगती करणारे

य : याच जन्मी गुरुकृपेने जीवन्मुक्त होणारे.’

३. सौ. प्रकृती कुलकर्णी (श्री. कुलकर्णी यांची मधली मुलगी), भाग्यनगर, तेलंगाणा.

३ अ. पाहुण्यांपेक्षा साधनेला प्राधान्य देणे : ‘पूर्वी आम्ही माहेरी गेलो की, ते अधिक वेळ नातवंडे आणि आमच्यासाठी काहीतरी करण्यासाठी वेळ देत असत. त्यामुळे त्यांची व्यष्टी साधना परिपूर्ण होत नसे; परंतु ‘या वेळी त्यांचे साधनेकडे अधिक लक्ष आहे’, हे प्रकर्षाने जाणवले. ते आपला नामजप, उपाय, सत्रे, बैठका यांच्या वेळा पाळत होते. त्यांची मायेतील आसक्ती अल्प झालेली जाणवली.

३ आ. त्यांचा चेहरा पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी आणि आनंदी जाणवतो.

३ इ. ‘अतीकाळजी करणे आणि मायेची आसक्ती असणे’, हे स्वभावदोष अल्प होणे : पूर्वी आम्हा मुलींना होणारा शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास यांविषयी त्यांना पुष्कळ चिंता वाटत असे; परंतु आता ते त्यावर उपाय सांगतात; पण पूर्वीसारखी काळजी करत नाहीत. त्यांची ‘अतीकाळजी करणे आणि आसक्ती असणे’, हे दोन्ही स्वभावदोष पुष्कळ अल्प झाले आहेत.’

४. सौ. गौरी कुलकर्णी (श्री. कुलकर्णी यांची धाकटी मुलगी), मिनिआपोलिस, अमेरिका.

‘मार्च २०२४ मध्ये मी भारतात आल्यावर मला बाबांमध्ये पुढील पालट जाणवले.

अ. ‘बाबांचे आता वय झाले असूनही ते उत्साहीच आहेत’, असे लक्षात आले.

आ. आम्ही सगळे घरी असलो, तरी त्यांची नामजपाची वेळ झाली की, ते सर्व थांबवून लगेच नामजप चालू करतात. त्या वेळी तिथे बसून माझाही नामजप चांगला होत असे.’ (सर्व सूत्रांचा दिनांक : २५.४.२०२४)