बोरीवली (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना सौ. मनीषा पात्रीकर आणि त्यांच्या शिष्या यांनी सादर केलेल्या कथ्थक नृत्याचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘७.१०.२०२३ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने फोंडा (गोवा) येथील संशोधन केंद्रात बोरीवली (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना सौ. मनीषा पात्रीकर आणि त्यांच्या शिष्या यांच्या कथ्थक नृत्याचा प्रयोग आध्यात्मिक त्रास असलेल्या अन् नसलेल्या साधकांवर करण्यात आला. पहिल्या प्रयोगात सर्व कलाकारांनी नृत्य सादर करण्यापूर्वी नामजप केला नव्हता. त्यानंतर दुसर्या प्रयोगाच्या वेळी कलाकारांनी थोडा वेळ श्रीकृष्णाचा नामजप करून नृत्य सादर केले. त्या प्रयोगांचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
१. प्रयोग क्र. १ – कलाकारांनी नामजप न करता नृत्यातून ‘विष्णुस्तुती’ सादर करणे
अ. नृत्याला आरंभ होताच माझ्या मनाला आनंद जाणवू लागला.
आ. गीतात ‘भज मन नारायण…’ या पुनःपुन्हा येणार्या ओळींच्या वेळी माझ्या मनाला आणखी आनंद होऊ लागला.
इ. गीतातील ‘नारायण बिन नर अज्ञानी…’, या ओळीवर नृत्य चालू असतांना माझा भाव जागृत झाला.
ई. वातावरणात कार्यक्रमाच्या ठिकाणापासून काही उंचीवर ‘सूक्ष्मातून २ अप्सरा नृत्य करत आहेत’, असे दृश्य मला दिसले.
उ. या नृत्याचा सकारात्मक परिणाम माझ्या अनाहतचक्रावर होत होता.
ऊ. नृत्य करतांना नृत्य-कलाकार विविध भावमुद्रा करत होत्या आणि त्यानुरूप त्या त्या रंगाचे दैवी कण, उदा. हास्यमुद्रेच्या वेळी गुलाबी रंगाचे दैवी कण, शरण जाऊन नमस्काराची मुद्रा केल्यावर निळ्या रंगाचे दैवी कण वातावरणात प्रक्षेपित होत होते. (प्रत्यक्षातही नृत्याच्या कार्यक्रमानंतर भूमीवर विविध रंगांचे दैवी कण दिसून आले.)
ए. नृत्याच्या शेवटी कलाकारांनी ‘महाभारतातील युद्धाच्या वेळी रथात अर्जुन युद्ध करण्यात व्यस्त आहे आणि तो रथ श्रीकृष्ण चालवत आहे’, हा प्रसंग सादर केला. तेव्हा ‘वातावरणात सूक्ष्मातून गुलाबी रंगाच्या दैवी फुलांची निर्मिती होऊन ती खाली येत आहेत’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले.
२. प्रयोग क्र. २ – कलाकारांनी श्रीकृष्णाचा नामजप करून नृत्यातून ‘विष्णुस्तुती’ सादर करणे
अ. ‘सर्व नृत्य-कलाकारांच्या मनावर कुठलाही ताणतणाव नसून सर्वांचे मन आनंदी आहे’, असे मला जाणवले.
आ. कलाकार थोड्याफार प्रमाणात श्रीकृष्णाला अनुभवत नृत्य करत होत्या.
इ. गीतामध्ये ‘श्रीमन्नारायण’, हा शब्द पुनःपुन्हा येत असतांना आणि त्यावर नृत्य चालू असतांना वातावरणात सोनेरी रंगाच्या दैवी कणांची उधळण होत होती.
ई. वातावरणातील अनिष्ट शक्तींना नृत्याचा काही प्रमाणात त्रास होऊ लागला.
उ. कु. गौरी जथे यांनी श्रीकृष्णाला अनुभवत भावाच्या स्तरावर नृत्य केले.
ऊ. वातावरणात दैवी निळ्या रंगाचा प्रकाश निर्माण झाला. त्या वेळी माझ्या मनाला शांतता जाणवत होती.
ए. नृत्य पहातांना मला माझ्या विशुद्धचक्राच्या ठिकाणी चांगल्या संवेदना जाणवत होत्या.
ऐ. नृत्य संपल्यावरही नृत्यातील सात्त्विकता काही वेळ वातावरणात टिकून होती.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१०.२०२३)
|