Bangladesh Mongla Port : बांगलादेशच्या मोंगला बंदराचे ‘टर्मिनल’ चालवण्याचे दायित्व भारताला मिळाले !
|
(‘टर्मिनल’ हा बंदरावर असलेला असा भाग असतो, जेथे नौकांची कसून पडताळणी केली जाते.)
नवी देहली – हिंद महासागरात चीनच्या कारवाया वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मोंगला बंदराच्या ‘टर्मिनल’ चालवण्याविषयी बांगलादेशाने भारताशी करार केला आहे. भारताने केलेल्या या कराराकडे ‘हिंद महासागरात चीनशी दोन हात करण्यासाठी केलेले प्रयत्न’ म्हणून पाहिले जात आहे. चीनही हा करार करण्यासाठी उत्सूक होता; मात्र बांगलादेशाने चीनला डावलून भारताशी हा करार केला. बांगलादेशातील चितगाव बंदरानंतर मोंगला बंदर हे दुसरे मोठे बंदर आहे.
१. देहलीस्थित ‘थिंक टँक सोसायटी फॉर पॉलिसी’चे संचालक आणि भारतीय नौदलाचे माजी अधिकारी उदय भास्कर यांच्या मते, हिंद महासागरात भारताने बंदराचे कामकाज हाताळण्याच्या क्षमतेचे प्रदर्शन करण्यासाठी मोंगला बंदराचे करार, ही एक चांगली संधी आहे.
२. या वर्षाच्या आरंभी भारताने म्यानमारसमवेत स्वेत बंदर आणि इराणसमवेत चाबहार बंदर यांसाठी करार केले आहेत. मोंगला बंदराच्या कराराविषयी सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. काही वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे टर्मिनल ‘इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड’द्वारे (‘आय.पी.जी.एल्.’द्वारे) चालवले जाईल.
मोंगला बंदर करार विशेष का आहे?संपर्काच्या दृष्टीने मोंगला बंदर करार भारतासाठी महत्त्वाचा आहे. या बंदरामुळे भारताला ईशान्येकडील राज्यांशी संपर्क वाढण्यास साहाय्य होईल. यामुळे ‘चिकन नेक’ किंवा सिलीगुडी कॉरिडॉरवरील दबाव अल्प होईल. ‘चिकन नेक’ हा बंगालमधील सिलीगुडी शहरातील २२ किलोमीटरचा भाग आहे. हा परिसर ईशान्येकडील ७ राज्ये आणि भारतातील अन्य राज्ये यांना जोडणारा भाग आहे. |