कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या दिशेने !
सांगली, २३ जुलै (वार्ता.) – सांगली जिल्ह्याचा दुष्काळी पट्टा वगळता सर्वत्र पावसाने दमदार उपस्थिती लावली आहे. कृष्णा नदीला तर कोयनेचा विसर्ग नसतांनाही पाण्याने ३० फुटांपर्यंत पातळी गाठली आहे. गेल्या २४ घंट्यांत ही पाणीपातळी १० ते १२ फुटांनी वाढल्याचे दिसून येत आहे. परिणामी कृष्णा नदीच्या तीरावरील नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.
पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास कृष्णा नदीतील पाणी पात्राच्या बाहेर पडून शहरी भागासह ग्रामीण भागातील जवळच्या परिसरात येण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्याची सिद्धता चालू केली आहे. वर्ष २०१९ चा अनुभव लक्षात घेऊन आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी आणि अफवांवर विश्वास न ठेवता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
नागरिकांना स्थलांतराचे प्रशासनाचे आवाहन !
कृष्णा नदीची पाणीपातळी २६ फुटांवर पोचली असून सतर्क झालेल्या महापालिकेने पूरबाधित क्षेत्रातील रहिवाशांना स्थलांतराच्या सिद्धतेत रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिका प्रशासनाने संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व सिद्धता पूर्ण केली आहे. अधिकारी अन् कर्मचारी प्रशिक्षणासह आवश्यक त्या सोयी सुविधांसह सतर्क आहेत. ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण दला’चे पथक आणि महापालिका अग्नीशमन दल, अधिकारी, कर्मचारी, तसेच जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात येत आहे.