सकल हिंदु समाजाचे पुणे येथे आंदोलन !
शिवभक्तांवर पहिले सशस्त्र आक्रमण करणार्या मुसलमानांवर गुन्हे नोंद करून कारवाईची मागणी !
पुणे – ‘गर्व आहे मला शिवभक्त असल्याचा’, ‘विशाळगड अतिक्रमणमुक्त करा’, ‘अतिरेक्याला थारा शिवभक्तांना मारा’, अशा घोषणा देत विशाळगड घटनेचा निषेध करण्यात आला. विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आणि हिंदुद्वेषी खासदाराच्या निषेधासाठी ‘सकल हिंदु समाज, पुणे’ यांच्या वतीने २२ जुलै या दिवशी डेक्कन गुडलक चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. विशाळगड घटनेविषयी सखोल चौकशी करून खरी परिस्थिती काय होती ? ते प्रशासनाने जाणून घ्यावे आणि ज्या मुसलमान जमावाने शिवभक्तांवर पहिले सशस्त्र आक्रमण केले, त्यांच्यावर गुन्हे नोंद करून कारवाई करावी. दोन्ही बाजूंची सखोल चौकशी करून अन्वेषण करावे, तसेच खासदार शाहूंनी समस्त शिवप्रेमी आणि हिंदु समाज यांची क्षमा मागावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
आज जे अतिक्रमण प्रशासन काढत आहे, हेच जर आंदोलन होण्यापूर्वी काढले असते, तर शिवप्रेमींना हे आंदोलन करण्याची वेळच आली नसती. झाल्या प्रकाराला पूर्णपणे प्रशासन उत्तरदायी आहे. त्यामुळे उत्तरदायी अधिकार्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करावेत, असेही सकल हिंदु समाजाच्या वतीने या वेळी सांगण्यात आले.
या वेळी श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे, ‘हिंदु गर्जना प्रतिष्ठान’चे धीरज घाटे, विश्व हिंदु परिषदेचे किशोर चव्हाण, पतित पावन संघटनेचे श्रीकांत शिळीमकर, ‘शिव समर्थ प्रतिष्ठान’चे दीपक नागपुरे, धर्म जागरणाचे विवेक कुलकर्णी, गोरक्षक शिवशंकर स्वामी, पुण्येश्वर समितीचे किरण शिंदे, बजरंग दलाचे नितीन महाजन, ‘शिवशंभु ट्रस्ट’चे सम्राट चव्हाण आदी उपस्थित होते.
तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी !
शिवप्रेमींवर गंभीर कलमे नोंद करून जे गुन्हे नोंद केले जात आहेत, याचा सकल हिंदु समाज निषेध करत आहे. जर अशाच प्रकारे गुन्हे नोंद केले जात असतील, तर यापुढील काळात सकल हिंदु समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करील, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली.