कर्करोगामुळे तीव्र शारीरिक त्रास होऊनही, तसेच प्रतिकूल स्थिती अनुभवूनही कृतज्ञताभावात रहाणारे सनातनचे संत !
सनातन संस्थेतील साधकांचा संतपदापर्यंतचा आध्यात्मिक प्रवास आपण दैनिक ‘सनातन प्रभात’मधून वाचला आहे. संतपद प्राप्त होईपर्यंतच्या वाटचालीत साधकांना प्रतिकूल परिस्थिती, अडथळे, अडचणी आणि संकटे यांचा सामना करावा लागतो. सकारात्मक राहून गुरुकृपेच्या बळावर ते या सर्वांवर मात करतात. या वेळी त्यांच्या अंतरी असते केवळ कृतज्ञता ! सनातनच्या काही संतांनी कर्करोगासारख्या गंभीर आजारपणात अनुभवलेली कृतज्ञता, तसेच प्रतिकूल प्रसंगांत गुरूंप्रती व्यक्त झालेली कृतज्ञता यांविषयीचे लिखाण येथे देत आहोत. हे लिखाण ते साधक ‘संत’ होण्यापूर्वीचे आहे. ज्या कृतज्ञतेच्या बळावर साधकांनी अध्यात्मात वाटचाल करून संतपद गाठले, ज्या कृतज्ञतेमुळे तीव्र प्रारब्ध त्यांना सुसह्य झाले, ती कृतज्ञता आपणही अनुभवूया !
१. प्रत्येक संकटातून देवानेच मला तारले, यासाठी कृतज्ञता ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी
वर्ष २००२ मध्ये पावसाळ्याच्या दिवसांत एकदा मी इमारतीच्या आगाशीत उभा असतांना सोलर यंत्र (पाणी गरम करायचे यंत्र) माझ्या अंगावर पडले. यातून मी मरता मरता वाचलो. ‘केवळ गुरुमाऊलीनेच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच) मला वाचवले’, अशी माझी दृढ श्रद्धा आहे. अपघातानंतर ज्यांनी आगाशीत जाऊन हे दृश्य बघितले, त्यांना ‘यात सापडलेली व्यक्ती जिवंत असेल’, असे वाटले नव्हते. काही वर्षांपूर्वी माझ्या गळ्यात कर्करोगाच्या गाठी झाल्या होत्या. त्यावरही सर्व उपचार केले. ईश्वर मला सकारात्मक ठेवून माझे प्रारब्ध किंवा कर्मभोग भोगायला साहाय्य करत होता. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला भीती वाटत नव्हती. मला हे आयुष्य देवाने, म्हणजे गुरुमाऊलीने दिले आहे. देव माझे प्रारब्ध आणि कर्मभोग संपवत होता. प्रत्येक वेळी संकटातून तोच मला तारत होता. त्यामुळे माझी ईश्वरावरील श्रद्धा अधिक दृढ होऊन पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
२. शस्त्रकर्मानंतर होणार्या त्रासांतून गुरुदेवांनीच वाचवले ! – (कै.) पू. प्रभा मराठेआजी
वर्ष १९९७ मध्ये माझे कर्करोगाचे शस्त्रकर्म झाले. त्या कालावधीत मी झोपूनच होते. एकदा मला आकाशात एक तेजस्वी तारा दिसला. पहाटे लक्षात आले की, तो तेजःपुंज तारा म्हणजे परात्पर गुरुदेवच आहेत. त्यांनीच मला शस्त्रकर्मानंतर होणार्या तीव्र त्रासांतून वाचवले; म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.
३. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘कृतज्ञता’ हा शब्दच अपुरा आहे ! – (कै.) पू. (डॉ.) नंदकिशोर वेद
वर्षभर अत्यंत वेदनादायक ‘एँकीलोजिंग स्पाँडिलाइटिस’च्या (मणक्यांची झीज होण्याचा आजार) तीव्र आणि असह्य वेदना, रक्ताचा कर्करोग अन् त्याच्या उपचारांचा त्रास आणि दुष्परिणाम यांमुळे मी प्रतिकूल स्थिती अनुभवत होतो. या कालावधीत परात्पर गुरुदेवांनी माझ्यासाठी हे प्रारब्ध केवळ सुसह्य केले, असे नाही, तर त्याच्या जोडीला मलाही सतत आनंदात ठेवले. त्यासाठी ‘कृतज्ञता’ शब्द अपुरा आहे !
४. तारणहार परात्पर गुरुदेवांनीच सूक्ष्मातून सांभाळले ! – (कै.) पू. (सौ.) शालिनी मराठे
वर्ष २०२२ मध्ये मला गर्भाशयाचा कर्करोग झाला होता. तेव्हा ‘रेडिएशन’द्वारे (किरणोत्सर्गाद्वारे) माझ्यावर २५ वेळा उपचार झाले; पण सुधारणा होत नव्हती. तीव्र शारीरिक त्रासातच मी परात्पर गुरुदेवांनाच प्रार्थना केली. परात्पर गुरु डॉ. आठवले हेच माझे तारणहार असल्याने त्यांनी मला या सर्व प्रसंगांतून सांभाळले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे माझ्यासारख्या एका सामान्य जिवाचे जीवन कृतार्थ झाले. यासाठी त्यांच्या चरणी अनंत कृतज्ञता !
|