श्री गुरु कोण आहेत ?
१. श्री गुरु म्हणजे ज्ञानरूपी वाणी !
२. श्री गुरु म्हणजे ज्ञानाचे भांडार !
३. श्री गुरु म्हणजे चैतन्याचा महासागर आहे.
४. श्री गुरु म्हणजे शिष्याचा आध्यात्मिक पिता आहे.
५. श्री गुरु म्हणजे आपल्या जीवनातील चमत्कार आहे.
६. श्री गुरु हे एक तेज आहे. ते एकदा जीवनात आले की, अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो.
७. श्री गुरु म्हणजे एक बासरी आहे. तिच्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.
८. श्री गुरु ही एक अशी दीक्षा आहे की, ती ज्याला प्राप्त झाली, तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा !
९. श्री गुरु म्हणजे एक प्रसाद आहे. तो ज्याच्या भाग्यात असेल, त्याला काहीच मागण्याची इच्छा होत नाही.
१०. श्री गुरु म्हणजे सत्-चित्-आनंद ! तो आपल्याला आपली खरी ओळख करून देतो.
११. श्री गुरु आणि गुरूंचे जीवन एखाद्या समुद्राच्या विशालतेप्रमाणे आहे, ज्याचे वर्णन करता येणे असंभव आहे.
१२. आकाशाएवढा कागद, सर्व वनांतील लाकडांची लेखणी करून, समुद्राची शाई करून गुरूंचे गुणवर्णन केले, तरी तेही अपुरे पडेल.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी वर्णिलेला गुरुमहिमा !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात,
‘सद्गुरुवांचूनी सांपडेना सोय । धरावे ते पाय आधीं त्याचे ।।
आपणासारिखे करिती तात्काळ । नाहीं काळ वेळ मग त्यासी ।।
लोह परिसाची न साहे उपमा । सद्गुरुमहिमा अगाधचि ।।’
अर्थ : सद्गुरु लाभल्याविना (मोक्षाला जाण्याचा) मार्ग सापडत नाही; म्हणून प्रथम त्यांचे पाय धरावेत. (त्यांची कृपा प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत.) सद्गुरु त्यांच्या शिष्याला क्षणार्धात स्वतःसारखे (मोक्षाचे अधिकारी) करतात. त्यांना काळ, वेळ लागत नाही. सद्गुरूंचा महिमा एवढा अगाध आहे की, त्यांना लोखंडाचे सोने बनवणार्या परिसाचीही उपमा शोभत नाही.
गुरु हे शिष्यासाठी सर्वस्व आहेत !
‘गुरु’ हा शब्द उच्चारल्याबरोबर मनात एकदम एक आदरार्थी भावना निर्माण होऊन शरणागतभाव निर्माण होतो. गुरूंच्या चरणी शिष्य आपोआप नतमस्तक होतो. गुरूंचे स्थान हे शिष्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे; कारण गुरु हे त्याची माता, पिता, बंधू आणि सखाच नव्हे, तर त्याचे सर्वस्व आहेत.
– सौ. वैष्णवी बधाले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.