जीवन आनंदी करण्याचा गुरुमंत्र देणारी ‘सनातन संस्था’ !
‘सनातन संस्था’ म्हणजे केवळ कृतज्ञता, कृतज्ञता आणि कृतज्ञता !
‘माझ्या जीवनात ‘सनातन संस्थे’च्या रूपातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आले आणि जीवनच पालटून गेले. आज मी मागे वळून पहाते, तर माझ्या जीवनामध्ये ‘सनातन संस्था’ आल्यामुळे मनामध्ये केवळ ‘कृतज्ञता’ हा शब्द येतो. मला ओळखणारेही म्हणतात, ‘तुझे जीवन पुष्कळ चांगले आहे.’ ‘सनातनमुळे मला काय मिळाले ?’, हे शब्दबद्ध करणे कठीण आहे; कारण जे मिळाले, ते अनुभवण्यासारखेच आहे. हे विचार ‘केवळ माझे आहेत’, असे नाही, तर सनातनशी जोडलेल्या प्रत्येकाचेच आहेत; कारण संस्थेचा केंद्रबिंदू ‘वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती’ आहे. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, या अध्यात्माच्या मूलभूत सिद्धांतानुसार साधना सांगून प्रत्येकाकडून ती करवून घेतली जाते. भगवंताने परात्पर गुरुदेवांच्या रूपाने पृथ्वीवर जन्म घेऊन आम्हाला चरणांजवळ घेतले. याहून दुसरे भाग्य नाही; म्हणूनच ‘सनातन संस्था’ म्हणजे केवळ ‘कृतज्ञता, कृतज्ञता आणि कृतज्ञता…!’ हेच खरे !
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेशी जोडली जाणे
‘मी साधनेत यावे’, हे गुरुदेवांचेच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) नियोजन होते. सनातन संस्थेचा सत्संग आमच्या घरी चालू असतांनाही मी त्याचा लाभ घेत नव्हते. आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत साधनेचा विषय पोचला. ‘साधनेत आल्यानंतर बुद्धीचा निश्चय होईपर्यंत कुणीतरी साधना करवून घ्यावी लागते. ते सौ. नंदिनीताईंनी माझ्यासाठी केले’, असे मला वाटते; कारण त्या वेळी आम्ही दोघी एकाच रुग्णालयात नोकरीसाठी होतो. माझ्या जीवनात ‘सनातन संस्थेचे आगमन’ हीच जीवनासाठी कलाटणी ठरली. त्यामुळे गुरुदेव आणि सौ. नंदिनीताई यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
२. ‘धर्माचरण केल्यास आनंदी होता येते’, हे शिकवणे
परात्पर गुरुदेवांनी सनातनच्या माध्यमातून आमच्या जीवनात हिंदु धर्माचे बीज रोवले. हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व सांगून ‘कलियुगात धर्माचरण कसे करायचे ?’, हे शिकवले. माझ्या साधनेला नामजपापासून प्रारंभ झाला. गुरुकृपायोगानुसार साधनेद्वारे स्वभावदोष आणि अहं निर्मूलन, नाम, सत्संग, सत्सेवा, भावजागृती, त्याग आणि प्रीती या टप्प्यांनुसार अष्टांग साधना शिकवली. कलियुगात ‘हिंदु धर्म’ किंवा ‘सनातन’ हे शब्द ऐकल्यानंतर ‘नको, यापासून आपण दूर राहूया’, असे म्हटले जाते; पण ‘हिंदु धर्म ही जीवनप्रणाली असून त्यानुसार आचरण केल्यास आनंदी होऊ शकतो’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सोप्या भाषेत सांगितले.
३. साधनेचे जीवनातील महत्त्व समजणे
‘आनंदी जीवनासाठी साधना’, ही संकल्पना सनातनकडून समजली. ‘साधना काय करायची ?’, असे नसून ‘ती कशी करायची ? अडचणींवर उपाय कसे काढायचे ?’ याविषयीही समजले. ‘वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती हा संस्थेचा केंद्रबिंदू आहे’, हे गेल्या २५ वर्षांत अनुभवता आले. प्रत्येकाची प्रकृती, शिक्षण, आवड-निवड, स्वभाव यांसह प्रत्येक गोष्ट वेगळी असते. त्यातही ‘आपापल्या परिस्थितीत आपण कशी साधना करावी ?’, हे लक्षात आले. त्यातून गुरुदेवांची महती समजली. जीवनामध्ये व्यावहारिकदृष्ट्या स्वतःचे ध्येय जरी वेगळे असले, तरी आनंद हे ध्येय सामायिक असते. त्यामुळे साधनेचे महत्त्व मनावर बिंबले. याविषयी विकल्प वा शंका नाही आणि पुढेही कधी शंका येणार नाही, असे ज्ञान गुरुदेवांनी दिले.
४. जीवन स्थिर होऊन आनंदी होणे
‘साधना म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी प्रतिदिन करावयाचे प्रयत्न’, ही व्याख्या समजल्यावर वेगळेच वाटले. अध्यात्मशास्त्रामध्ये सर्व लिहून ठेवले आहे. त्याप्रमाणे आचरण केल्यास आनंद मिळतो’, असे कधी ऐकले किंवा वाचले नव्हते. त्यातील ‘साधनेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे नामस्मरण आहे’, हे समजले. त्याप्रमाणे कृती केल्यानंतर मन स्थिर झाले. ‘जे हवे होते, त्यातील काही तरी गवसले’, असे वाटून आनंद झाला. तो शब्दांत सांगता येत नव्हता. ‘प्रतिदिनचे प्रयत्न समजून घेऊन करूया’, असा निश्चय झाला.
५. अध्यात्माविषयीचे अमूल्य ज्ञान ग्रंथांद्वारे देणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्मशास्त्रातील एकेक विषय सोप्या आणि शास्त्रीय भाषेत ग्रंथांच्या रूपाने लिहून ठेवल्याने त्यातून पुष्कळ ज्ञान मिळाले. या ग्रंथांचे वर्णन शब्दांत करता येत नाही; कारण अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. ‘कलियुगामध्ये अध्यात्मातील कोणती सूत्रे समजून घेऊन ती कशी आचरणात आणायची ?’, हे त्यांनी सोप्या पद्धतीने लिहिले. हे ग्रंथ कोणत्याही वयोगटातील आणि शैक्षणिक वर्गातील जिज्ञासूंना उपयोगी आहेत.
६. कलियुगात आनंदी आणि सुरक्षित जीवन जगत असल्याचे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमुळे समजणे
जीवनात गुरूंची आवश्यकता असते. गुरु असतील, तर जीवनप्रवास सोपा होतो. ‘अध्यात्मात गुरु शोधणे कठीण आहे; परंतु ‘आपण योग्य पद्धतीने साधना करत असलो की, गुरु आपल्या जीवनात येतात’, हे शास्त्र समजले. धर्मातील सोपी; परंतु प्रायोगिक सूत्रे समजल्यामुळे आनंद झाला. आपण योग्य साधना करत असलो की, गुरुकृपा होतेच. अध्यात्मात गुरूंची कृपा म्हणजे गुरु ज्याच्या जीवनात येतात, त्याचा उद्धारच करतात. गुरुकृपा म्हणजे काय ? ती कशी अनुभवायची ? हे समजल्यामुळे जीवन आणखीन आनंदी आणि सुरक्षित झाले. घनघोर कलियुगात सुरक्षित जीवन जगायला मिळणे, याविना दुसरा आनंद नाही. हे केवळ गुरुदेवांमुळेच समजले.
७. अध्यात्मशास्त्र समजल्यामुळे त्याविषयी शंका नसणे
हिंदूंमध्ये ३३ कोटी देवता आहेत, आपण कोणत्या देवतेची उपासना करायची ? याचे शास्त्र समजल्याने अध्यात्मशास्त्र किंवा साधनेविषयी मनात शंका नाहीत. गुरुदेवांनी पुढच्या पुढच्या टप्प्याची साधना कशी करायची ? हेही सांगितले. त्यामुळे साधना करतांना कंटाळा येत नाही. ‘केवळ साधनाच आनंददायी आहे’, हे बिंबले.
८. दोष आणि अहं यांचे निर्मूलन ही जीवनाची संजीवनीच !
‘नामजपातील मुख्य अडथळे स्वभावदोष आणि अहं यांचे असतात. ‘त्यांचे निर्मूलन कसे करायचे ?’, हे समजले. याविषयी गुरुचरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे. दोष आणि अहं निर्मूलनामुळे व्यावहारिक जीवनात जगण्याच्या दृष्टीने आवश्यक दिशा मिळाली. त्याचा परिणाम चांगला झाला. ‘ईश्वरप्राप्तीसाठी दोष आणि अहं निर्मूलन महत्त्वाचे आहे, तसे जीवन चांगले जगण्यासाठी प्रक्रियेची आवश्यकता आहे’, हे लक्षात आले. अहंमुळेच जीवनात समस्या निर्माण होतात. ‘अहं नको’, हे सर्वांना समजते; परंतु तो दूर कसा करायचा ? हे कळत नाही. गुरुदेवांनी सांगितल्यामुळे स्वभावदोष आणि अहं निर्मूलनासाठी प्रयत्न होतात.
९. ‘भाव’, ‘कृतज्ञता’ गुरुदेवांच्या कृपेमुळेच लक्षात येणे
भाव म्हणजे काय ? तो कसा आणायचा ? कृतज्ञता म्हणजे काय ? त्या स्थितीला कसे जायचे ? हेही गुरुदेवांनी सांगितले; किंबहुना शिकवले. त्यामुळे देवाला अनुभवणे सोपे जाते. भाव आणि कृतज्ञता हे आंतरिक पालट त्यांच्या कृपेमुळेच होतात.
१०. कुटुंबावरील गुरुकृपा प्रत्येक टप्प्याला अनुभवणे
गुरुदेवांनी पुढच्या पुढच्या टप्प्याची साधना सांगून करवून घेतल्याने गुरुकृपा अनुभवता येते. ‘गुरुकृपा म्हणजे सातत्याने गुरूंचे आपल्यावर लक्ष असणे आणि त्यांनी प्रत्येक टप्प्याला साहाय्य करणे’ ! गुरुकृपेमुळे जीवनात कोणतेही संकट आले नाही आणि जे काही थोडेफार कटू अनुभवले, त्यातून त्यांनी मला सहजपणे बाहेर काढले. कुटुंबातील एक जण जरी साधनारत असला, तरी त्याच्या कुटुंबावर गुरुदेवांची कृपा होते, हे अनुभवता आले. ‘जीवनात आनंद, शांती, समाधान, सुरक्षितता असणे, हीच गुरुकृपा असते’, असे वाटते.
११. कलियुगात साधनेद्वारे भगवंताला अनुभवता येणे
‘कलियुगात साधना करून भगवंताला अनुभवणे काय असते ?’, हे गुरुदेवांच्या कृपेमुळे अनुभवता येते. कुणी मला ‘देव आहे का ?’, असे विचारल्यास ‘हो’ असेच उत्तर येते. तो चराचरात व्यापून आहे, हे समजणेच किती आनंददायी आहे ! ‘कृतज्ञता’, ‘प्रार्थना’ या शब्दांची अंतरंगातील खोली गुरुदेवांनी लक्षात आणून दिली, तेथपर्यंत कसे पोचायचे ?, हेही ते शिकवत आहेत.
१२. जीवनाचे सार्थक झाले आहे, असे वाटणे
‘मी जीवनात काय मिळवले ?’, असे मागे वळून पहातांना ‘जीवनाचे सार्थक झाले आहे’, असे वाटते. हे केवळ गुरुदेवांमुळे अन् सनातन संस्थेमुळे झाले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे जीवनात आले नसते, तर जीवन व्यर्थ गेले असते. व्यावहारिकदृष्ट्या पुष्कळ काही मिळवले असते; परंतु जे जन्मोजन्मी समवेत रहाणार आहे, तेच मिळवले नसते. गुरु जीवनात आल्यानंतरच जीवनाचे सार्थक होते; कारण अध्यात्मातील सर्व सिद्धांत कुठे ना कुठे वाचलेले असतात; परंतु ते अंतरंगात गुरूंच्या कृपेमुळेच रुजतात.
१३. ‘सनातन संस्थे’विषयी (गुरुदेवांविषयी) कृतज्ञता !
‘सनातन संस्थेमुळे जीवन किती सुंदर आणि आनंदी झाले’, हे शब्दांत सांगणे कठीण आहे. ‘काय मिळाले ?’ हे सांगणे जसे कठीण आहे, तसेच कृतज्ञता व्यक्त करणेही कठीण आहे. गुरुदेवांच्या कृपेमुळे जे पुष्प मिळाले, त्याची पाकळीही लिखाणाच्या माध्यमातून अर्पण करू शकत नाही. ‘गुरुदेव, तुम्हीच मला कृतज्ञताभाव द्या. शेवटच्या श्वासापर्यंत अंतरात तुमच्याविषयीचा कृतज्ञताभाव अखंड राहू दे. तुमची कृपा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे’, अशी तुमच्या कोमल चरणी शरणागतभावाने प्रार्थना !’
– वैद्या सुश्री (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.३.२०२४)
‘तुझा मार्ग योग्य आहे’, असे सर्वांनी सांगणे !ज्या वेळी मी पूर्णवेळ साधनेचा निर्णय घेतला, त्या वेळी तो बर्याच जणांना आवडला नाही. ‘वैद्यकीय मार्ग सोडून अध्यात्म करण्याची काय आवश्यकता ?’, असा प्रश्न सर्वांना होता. आज ‘सर्व जण तुझाच मार्ग योग्य आहे’, असे सांगतात. माझ्या समवेत शिक्षण घेतलेले वैद्य किंवा कुटुंबीय यांना असेच वाटते. माझी वैद्या मैत्रीण म्हणाली, ‘‘आम्ही संसार आणि ‘प्रॅक्टिस’ (व्यवसाय) करून काय मिळवले ? आणि ते ते न करता काय गमावलेस ?’, अशी तुलना केल्यावर ‘तू काहीच गमावले नाहीस. उलट तुलाच आमच्यापेक्षा अधिक मिळाले’, असे म्हणू शकतो.’’ हे ऐकून मलाही वाटले, ‘खरंच आहे.’ तेव्हा ‘तिच्या मुखातून गुरुदेवांनीच ‘मी काय मिळवले’, हे सांगितले’, असे मला जाणवले. – वैद्या सुश्री (कु.) माया पाटील |