Budget 2024 : मध्यवर्गीय नोकरदारांना अल्प दिलासा देणारा केंद्रीय अर्थसंकल्प सादर
|
नवी देहली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी २३ जुलै या दिवशी सकाळी ११ वाजता लोकसभेत वर्ष २०२४-२५ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. नेहमीप्रमाणे कररचनेकडे लक्ष लागलेल्या देशवासियांसाठी या अर्थसंकल्पात अल्प प्रमाणात दिलासा देण्यात आला. नव्या करप्रणालीत (आयकरामध्ये) ‘स्टँडर्ड डिडक्शन’ ५० सहस्रांवरून ७५ सहस्र रुपये करण्यात आले आहे. तसेच ३ लाख रुपयांपर्यंत कोणताही कर नसलेली नवीन कररचना सादर केली. जुन्या करणप्रणालीनुसार कर भरणार्या नोकरदारांसाठी कोणताही पालट करण्यात आलेला नाही; मात्र नव्या करप्रणालीनुसार कर भरणार्या नोकरदारांचे १७ सहस्र ५०० रुपये वाचणार आहेत.
सरकारपुढे ९ प्राधान्य !
अर्थमंत्री निर्मल सीतारामन् अर्थसंकल्प मांडतांना म्हणाल्या की, विकसित भारतासाठी आमची पहिली प्राथमिकता कृषी क्षेत्रातील उत्पादकता आहे. दुसरे प्राधान्य म्हणजे, रोजगार आणि कौशल्य. तिसरे प्राधान्य सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय आहे. चौथे प्राधान्य उत्पादन आणि सेवा आहे. पाचवे प्राधान्य शहरी विकासाला चालना देणे आहे. सहावे प्राधान्य ऊर्जा सुरक्षा आहे. सातवे प्राधान्य म्हणजे, पायाभूत सुविधा, त्यानंतर आठवे प्राधान्य नवकल्पना, संशोधन आणि विकास असून नववे प्राधान्य म्हणजे, पुढच्या पिढीतील सुधारणा. या प्राधान्यांच्या आधारे आगामी अर्थसंकल्प बनवण्यात आला आहे.
नवी करप्रणाली (वार्षिक उत्पन्नानुसार)
० ते ३ लाख रुपये | कुठला कर नाही |
३ ते ७ लाख रुपये | ५ टक्के |
७ ते १० लाख रुपये | १० टक्के |
१० ते १२ लाख रुपये | १५ टक्के |
१२ ते १५ लाख रुपये | २० टक्के |
१५ लाख रुपयांपेक्षा अधिक | ३० टक्के कर |
#Budget2024 : Little relief to #middleclass employees
• No Tax for Income Upto Rs 3 Lakhs
• Standard deduction for salaried employees increased to Rs 75,000
• Gold, Cancer drugs and mobiles to become cheaper
• Temple corridor projects announced for Mahabodhi and Vishnupad… pic.twitter.com/y1I1761UlM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 23, 2024
स्वस्त | महाग |
चामड्याचे बूट | सिगारेट |
सोने आणि चांदी | प्लास्टिकच्या वस्तू |
भ्रमणभाष संच | पेट्रोकेमिकल |
भ्रमणभाष चार्जर | |
इलेक्ट्रिक वाहन | |
कर्करोगावरील औषधे | |
प्लॅॅटिनम | |
विद्युत् तारा | |
एक्स-रे मशीन | |
सौर संच |
गया (बिहार) येथील महाबोधी आणि विष्णुपद मंदिरांसाठी सुसज्ज मार्ग बांधणार
अर्थसंकल्पात बिहारच्या गया येथील महाबोधी मंदिर आणि विष्णुपद मंदिर यांसाठी सुसज्ज मार्ग (कॉरिडोर) बांधण्याची घोषणा करण्यात आली. हा मार्ग काशी विश्वनाथ धाम येथे बांधण्यात आलेल्या सुसज्ज मार्गाच्या धर्तीवर बांधण्यात येणार आहे. यासह राजगीर येथील बौद्ध आणि जैन धर्मियांच्या तीर्थक्षेत्रांचाही विकास केला जाणार आहे. नालंदाला ‘पर्यटन केंद्र’ म्हणून लौकिक मिळवून देण्यासाठी तेथेही विकास केला जाणार आहे.
४ कोटी रोजगार देणार
अर्थसंकल्पात पुढील ५ वर्षांसाठी ४ कोटी १० लाख तरुणांना रोजगार देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यासाठी अर्थमंत्र्यांनी २ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, याकरता नागरिकांना कौशल्य निर्माण करण्यासाठी १ लाख ४८ सहस्र कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. ५ वर्षांच्या कालावधीत २० लाख तरुणांचा कौशल्य विकास केला जाईल. एकूण १ सहस्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था अद्ययावत केल्या जाणार आहेत.
एक कोटी तरुणांसाठी इंटर्नशिप
देशातील प्रमुख ५०० आस्थापनांमध्ये १ कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक योजना चालू करण्यात येणार आहे. यामध्ये ५ सहस्र रुपये प्रतिमहा इंटर्नशिप भत्ता आणि ६ सहस्र रुपये एकरकमी देण्यात येणार आहे.
सोने, चांदी आणि प्लॅटिनम स्वस्त होणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी अर्थसंकल्पात सोने आणि चांदी यांवरील सीमाशुल्क ६ टक्क्यांनी अल्प करण्याची घोषणा केली. तसेच प्लॅटिनमवरील सीमाशुल्कही ६.४ टक्क्यांनी अल्प होणार आहे. यामुळे यांचे दर अल्प होणार आहेत.
सीतारामन् यांनी स्टील आणि तांबा यांवरील उत्पादन खर्च न्यून करण्याची घोषणा केली आहे.
बिहार आणि आंध्रप्रदेश राज्यांसाठी विशेष योजना
आंध्रप्रदेशाला १५ सहस्र कोटी रुपये आणि बिहारला ४१ सहस्र कोटी रुपये देण्याचे प्रावधान अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. तसेच बिहार, झारखंड, बंगाल, ओडिशा आणि आंध्रप्रदेश राज्यांसाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहेत. बिहारच्या रस्ते जोडणी प्रकल्पांसाठी २६ सहस्र कोटी देण्यात येणार आहेत. ‘पाटणा-पूर्णिया एक्स्प्रेस वे’, ‘बक्सर-भागलपूर एक्स्प्रेस वे’ बनवला जाईल. बिहारमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये बांधली जातील. त्याचबरोबर नवीन विमानतळही बांधण्यात येणार आहे. आंध्रप्रदेशाची नवीन राजधानी असलेल्या अमरावती शहराच्या विकासासाठी १५ सहस्र कोटी रुपये देण्यात येणार आहेत. बोधगया, राजगीर, वैशाली आणि दरभंगा रस्ते जोडणी प्रकल्पही विकसित केले जातील. बक्सरमधील गंगा नदीवर अतिरिक्त द्विपदरी पूल बांधण्यात येईल. बिहारमध्ये २१ सहस्र ४०० कोटी रुपये खर्चून ऊर्जा प्रकल्प चालू करण्यात येणार आहेत. बिहारमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये बांधण्यासह क्रीडांसाठी पायाभूत सुविधाही केल्या जातील.
अर्थसंकल्पातील ठळक सूत्रे
- प्रथमच नोकरी करणार्यांचे वेतन १ लाख रुपयांपेक्षा अल्प असल्यास, तसेच प्रथमच ‘इपीएफ्ओ’मध्ये नोंदणी करणार्या लोकांना ३ हप्त्यांमध्ये १५ सहस्र रुपयांचे साहाय्य करण्यात येणार आहे.
- ज्यांना सरकारी योजनांतर्गत कोणताही लाभ मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना देशभरातील संस्थांमध्ये प्रवेशासाठी कर्ज मिळेल. सरकार कर्जाच्या ३ टक्के रक्कम देईल. यासाठी ई-व्हाऊचर चालू केले जातील, जे प्रतिवर्षी १ लाख विद्यार्थ्यांना दिले जातील.
- ६ कोटी शेतकर्यांची माहिती भूमी नोंदणीवर आणली जाईल. ५ राज्यांमध्ये नवीन ‘किसान क्रेडिट कार्ड’ जारी केले जातील.
- तरुणांसाठी मुद्रा कर्जाची रक्कम १० लाख रुपयांंवरून २० लाख रुपये करण्यात आली.
- महिला आणि मुली यांना लाभ देणार्या योजनांसाठी ३ लाख कोटी रुपयांचे प्रावधान
- ‘सूर्या घर विनामूल्य वीज योजने’मध्ये १ कोटी घरांना प्रतिमहा ३०० युनिटपर्यंत विनामूल्य वीज.
- ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँके’च्या १०० हून अधिक शाखा ईशान्येकडील भागात चालू करण्यात येणार.