अध्यात्मप्रचाराच्या सेवेला सर्वतोपरी साहाय्य करणारे महाबळेश्वर (जिल्हा सातारा) येथील कै. वामन रामचंद्र आगरकर (वय ८३ वर्षे ) !
‘२८.४.२०२४ या दिवशी दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचक वामन रामचंद्र आगरकर यांचे पहाटे निधन झाले. कै. आगरकर हे महाबळेश्वर येथील ‘केदार रिजन्सी’ या हॉटेलचे मालक होते. ते वर्ष १९९९ पासून सनातनच्या संपर्कात होते. त्यांना सनातनचे कार्य पुष्कळ प्रमाणात आवडत होते आणि त्यांची आश्रमात राहून सेवा करण्याची इच्छा होती; परंतु त्यांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी कुणी नसल्यामुळे ते शक्य झाले नाही.
१. कै. वामन आगरकर यांनी सनातनला केलेले सहकार्य
अ. ‘महाबळेश्वर येथे प्रचाराला आरंभ केल्यानंतर माझा त्यांच्याशी पहिला संपर्क झाला. त्याच वेळी त्यांनी मला सनातनला संपूर्णपणे सहकार्य करण्याचे वचन दिले.
आ. कै. आगरकर यांनी आमच्या समवेत महाबळेश्वर येथे प्रचार करून दैनिक ‘सनातन प्रभात’, तसेच साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवण्यासाठी सहकार्य केले. त्यांनी तेथील अनेक हिंदुत्वनिष्ठ व्यक्तींशी आमची ओळखसुद्धा करून दिली.
इ. महाबळेश्वर येथे सनातनचे सेवाकेंद्र नव्हते. त्या वेळी त्यांनी पर्यायी जागा मिळेपर्यंत आपल्याला त्यांच्या हॉटेलमधील काही खोल्या विनामूल्य उपलब्ध करून दिल्या. ते साधकांना भोजनसुद्धा विनामूल्य देत असत.
ई. महाबळेश्वर येथे गुरुपौर्णिमा करण्याचे निश्चित झाल्यानंतर त्यांनी गुरुपौणिमेसाठी त्यांच्या हॉटेलमधील सभागृह विनामूल्य दिले होते. त्यांनी त्या वेळी आमच्या समवेत प्रचारही केला होता. ती महाबळेश्वरमधील पहिली गुरुपौर्णिमा होती आणि पुष्कळ पाऊस असूनही ३०० लोकांची उपस्थिती होती.
उ. ‘ते प्रत्येक गुरुपौर्णिमेला कधी स्मरणिकेसाठी, तर कधी दैनिक ‘सनातन प्रभात’साठी विज्ञापन देत असत. त्यांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ ग्रंथासाठीही विज्ञापन दिले होते. त्यांची ‘सनातन संस्थेचे कार्य वाढायला हवे’, अशी इच्छा होती. त्यांच्यामुळेच सनातनचे कार्य महाबळेश्वर येथे चालू होण्यास साहाय्य झाले.
‘कै. वामन रामचंद्र आगरकर यांना पुढील सद्गती मिळो’, ही ईश्वरचरणी प्रार्थना !’
– होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता (वय ६८ वर्षे), फोंडा, गोवा. (५.५.२०२४)