परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा असलेल्या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या यवतमाळ येथील सौ. शांताबाई घोंगडे (वय ६४ वर्षे) !
‘१३.२.२०२४ या दिवशी माझ्या पुतण्याचे लग्न होते. लग्न यवतमाळमधील ढुमणापूर येथील श्री हनुमान मंदिरात होते. त्या वेळी ४०० जणांना पुरेल एवढा महाप्रसाद बनवला होता; परंतु दुप्पट पाहुण्यांनी महाप्रसाद ग्रहण करूनही स्वयंपाक शिल्लक राहिला. याविषयी मला आलेली अनुभूती पुढे दिली आहे.
१. लग्नाच्या दिवशी दुप्पट पाहुणे आल्याचे पाहून ताण येणे, प्रार्थना केल्यावर हनुमंताने एका मुलाच्या रूपात येऊन जेवण मागणे आणि जेवल्यानंतर आशीर्वाद देऊन निघून जाणे
लग्नाच्या दिवशी ४०० जणांसाठी स्वयंपाक बनवला होता; मात्र पाहुणे दुप्पट , म्हणजे ८०० जण जेवायला होते. त्यामुळे माझ्या मुलाला (श्री. देवानंद घोंगडे याला) ताण आला. ‘आता कसे होणार ?’, असा त्याला प्रश्न पडला. तेव्हा मी त्याला म्हटले, ‘‘आपण प्रार्थना करूया. गुरुदेव पाठीशी आहेत !’’ त्यानंतर मी नैवेद्याचे ताट बनवले आणि ते हनुमंताला देतांना भावपूर्ण प्रार्थना केली. तेव्हा एक मुलगा आला आणि त्याने माझ्याकडे जेवायला मागितले. मी त्याला पूर्ण ताट वाढून दिले. त्या मुलाने जेवण ग्रहण केले. त्यानंतर ‘‘तुझी भरभराट होईल’’, असे म्हणून मागच्या मागे तो निघून गेला. तो पुन्हा दिसला नाही.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर त्यांचे चरण दिसणे, तसेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ उभ्या असल्याचे दिसणे आणि त्यांच्या चरणांजवळ गोल प्रकाश दिसणे
परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केली आणि त्यांना सांगितले, ‘हा मुलगा कोण आहे ?’, ते मला ठाऊक नाही.’ तेव्हा मला परात्पर गुरुदेवांचे चरण दिसले आणि माझी पुष्कळ भावजागृती झाली. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोन्ही माता उभ्या असलेल्या दिसल्या. त्यांचे चरण दिसले आणि त्यांच्या चरणांजवळ गोल प्रकाश दिसला. नमस्कार केल्यावर परात्पर गुरुमाऊली हसत असल्याचे दिसले. मी लगेच त्यांचे चरण धरले आणि पुष्कळ आळवले. तेव्हा माझी भावजागृती झाली.
३. लग्नात ४०० पाहुण्यांसाठी बनवलेला स्वयंपाक ८०० जणांना पुरूनही शिल्लक रहाणे
त्यानंतर मी मुलांना सांगितले, ‘‘आता काळजी करू नका. सर्वकाही ठीक होईल.’’ ४०० पाहुण्यांसाठी बनवलेल्या स्वयंपाकामध्ये ८०० जणांनी भोजन करूनही स्वयंपाक शिल्लक राहिला. तो स्वयंपाक घरी आणल्यावर सर्वांचे जेवण होऊनही पुन्हा शिल्लक राहिला. त्यानंतर शिल्लक राहिलेला स्वयंपाक मी गायीला दिला. ‘श्री गुरुदेवांनी अशी अनुभूती दिली’, याबद्दल त्यांच्याप्रती मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
‘गुरुदेवांनी लग्नाला आलेल्या पाहुण्यांना श्री कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व सांगून घेतले’, त्यासाठी श्री गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. शांताबाई घोंगडे (वय ६४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), यवतमाळ (१३.२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |